Home » ‘38 कृष्ण व्हिला’ लवकरच रंगभूमीवर, गिरीश ओक यांचे 50 वे नाटयपुष्प

‘38 कृष्ण व्हिला’ लवकरच रंगभूमीवर, गिरीश ओक यांचे 50 वे नाटयपुष्प

by Team Gajawaja
0 comment
38 कृष्ण व्हिला
Share

करोना निर्बंध शिथील झाल्यानंतर वैविध्यपूर्ण विषयांवरील नवीन अनेक नाटके दाखल झाली आहेत. काही येऊ घातली आहेत. नाटकाचा विषय कोणताही असो, विनोदी, गंभीर, सस्पेन्स, आपल्या अनोख्या शैलीत ते नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा ज्यांचा हातखंडा आहे अशा दिग्दर्शकांमध्ये विजय केंकरे हे नाव अग्रस्थानी आहे. ‘38 कृष्ण व्हिला’ हे नवं नाटक घेऊन ते रंगभूमीवर येत आहेत आणि विशेष म्हणजे त्यांच्या या नाटकात अभिनयाचा हुकमी एक्का असलेले अभिनेते डॉ. गिरीश ओक आणि संवेदनशील लेखिका आणि अभिनेत्री डॉ.श्वेता पेंडसे दिसणार आहेत.

डॉ. गिरीश ओक यांचे हे 50 वे नाटयपुष्प आहे. या त्रिवेणी संगमामुळे ‘38 कृष्ण व्हिला’ हे नाटक प्रेक्षकांसाठी रंजनाची दर्जेदार मेजवानी असणार यात शंका नाही. मल्हार आणि रॉयल थिएटर निर्मित या नाटकाचा शुभारंभ शनिवार 19 मार्चला होणार आहे.

‘ओळखीचा चेहरा की चेहऱ्याची ओळख’? नाटकाची ही टॅगलाइन त्यातील गर्भित अर्थ दाखवून देणारी आहे. प्रत्येकजण येथे आपापले मुखवटे सांभाळून असतो. प्रसंगी त्यांना जपत असतो. मुखवट्याआडचा खरा-खोटा, असेल तसा चेहरा दिसू नये म्हणून काळजी घेत असतो. अंदाज आरशाचा वाटे खरा असावा बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा… गझलकार इलाही जमादार यांच्या या ओळीतुन चेहऱ्यामागचं खरं गुपित उलगडून दाखवलयं ‘38 कृष्ण व्हिला’ या नाटकातूनही चेहऱ्यामागचा माणूस शोधण्याचा प्रयत्न असणार आहे.

====

हे देखाल वाचा: महिला कला महोत्सवात मकरंद देशपांडे सांगतायत ‘सर, प्रेमाचं काय करायचं’

====

‘38 कृष्ण व्हिला’ नाटकामध्ये डॉ.गिरीश ओक ‘देवदत्त कामत’ या भूमिकेत आपल्यासमोर येणार आहेत. देवदत्त कामत ह्या प्रथितयश व्यक्तीवर नंदिनी चित्रे, ही अनोळखी स्त्री एक गंभीर आरोप करते आणि त्यांच्यापुढे उभे राहते एक नवे आव्हान, स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचे! 38, कृष्ण व्हिला ह्या घरात भरला जातो एक आगळा वेगळा खटला, सुरू होते आरोप प्रत्यारोपांची मालिका, वाद प्रतिवादांच्या फैरी झडतात आणि समोर येते एक धक्कादायक वास्तव! या पार्श्वभूमीवर बेतलेले हे नाटक अनेक रंजक वळणांनी प्रेक्षकांच मनोरंजन करणार असणार आहे.

====

हे देखील वाचा: महिला दिन विशेष ‘अनन्या’चे पोस्टर रिलीज, हृता दुर्गुळेचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस

====

डॉ. श्वेता पेंडसे लिखित, विजय केंकरे दिग्दर्शित तसेच डॉ. गिरीश ओक, डॉ. श्वेता पेंडसे अभिनीत 38 कृष्ण व्हिला’ या नाटकाचा शुभारंभ शनिवार 19 मार्चला दीनानाथ नाटयगृह पार्ले येथे दुपारी 4.15 वा. होणार आहे. तसेच रविवार 20 मार्चला दुपारी 4.30 वा. गडकरी रंगायतन येथे प्रयोग असणार आहे. या नाटकाची निर्मीती मिहीर गवळी यांनी केली असून सहनिर्माते उत्कर्ष मेहता, ऋतुजा शिदम आहेत. नेपथ्य संदेश बेंद्रे तर वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे. संगीत अजित परब तर प्रकाशयोजना शितल तळपदे यांची आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.