Home » असं काय घडलं होतं त्या रात्री की, आतंकवादी कसाब म्हणाला भारतमाता की जय!

असं काय घडलं होतं त्या रात्री की, आतंकवादी कसाब म्हणाला भारतमाता की जय!

by Team Gajawaja
0 comment
26/11 attack
Share

२६ नोव्हेंबर २००८ च्या त्या काळरात्री भीषण नरसंहार घडवल्यावर कसाब पोलिसांच्या तावडीत सापडला होता. त्याच्या चौकशीची जबाबदारी राकेश मारिया यांच्याकडे सोपवली होती. मारियांनी त्याच्याशी पंजाबी भाषेत संवाद साधला तेव्हा कसाब चकित झाला आणि तो त्यांच्याशी मोकळेपणाने बोलू लागला. तो मारियांना ‘जनाब’ असे संबोधू लागला. (26/11 attack)

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त श्री राकेश मारिया कसाबची कसून चौकशी करत होते. मारियांनी त्याला विचारले की, एवढ्या मोठ्या कटात सामील होताना तुला काय प्रेरणा मिळाली. त्याने सांगितले, पाकिस्तानमध्ये त्याला सांगण्यात आले होते की, तू अशा पवित्र कार्यात शाहिद झालास, तर स्वर्गात अल्ला तुझी वाट पाहत असेल. तुझ्या अंगाला सुगंध सुटेल व देह प्रकाशमान होईल. स्वर्गात गेल्यावर सुंदर स्त्रिया तुझी सेवा करण्यासाठी आतुर झालेल्या असतील वगैरे वगैरे. हे ऐकून मारिया यांना आश्चर्य वाटले आणि त्यांच्या मनात एक विचार चमकून गेला. 

एका मध्यरात्री त्यांनी कसाबला पूर्ण सुरक्षेत जे जे रुग्णालयात नेलं. तेथील शवागारात कसाबच्या इतर मारल्या गेलेल्या सहकाऱ्यांचे मृतदेह ठेवलेले होते. तेथील दृश्य भीषण होते. सर्व दहशतवाद्यांचे चेहरे भेसूर दिसत होते. काहींचे शरीर भाजल्यामुळे मांस लोंबत होते. एका दहशतवाद्याचा डोळा बंदुकीची गोळी लागल्यामुळे बाहेर आला होता. दुर्गंधी तर इतकी येत होती की, एक क्षण सुद्धा तिथे उभे राहणे मुश्किल होते. (26/11 attack)

 Image Credits : www.mid-day.com

मारियांनी कसाबला विचारले, “कुठे आहे तुझा अल्ला? कुठे आहे सुगंध आणि प्रकाश? कसाबचा चेहरा समोरचे दृश्य बघून पांढरा फटफटीत पडला होता. त्याचा स्वतःवरच विश्वास बसत नव्हता. त्याला परत कारागृहात घेऊन जात असताना मारियांच्या स्मृतीपटलावर २६/११ च्या आठवणी जाग्या झाल्या. (26/11 attack)

त्या रात्री मारिया जरा लवकरच आपल्या मलबार हिलवरील सरकारी निवासस्थानात परत आले होते. त्यांचा मुलगा एका स्पर्धेसाठी रात्री गावाला जाणार होता. त्याच्याबरोबर जेवण करून थोडा वेळ टी व्ही बघून झोपण्याचा त्यांचा विचार होता. जेवण्यापूर्वी ते स्नान करायला गेले. ते बाहेर येतात तोच त्यांच्या पत्नीने अत्यंत तणावपूर्ण स्वरात सांगितले की, हॉट लाईनवर फोन आला होता आणि तुम्हाला तातडीने संपर्क साधण्यास सांगितले आहे. 

मारियांनी लगेच फोन केला आणि त्यांना दहशतवाद्यांनी मुंबईत घातलेल्या थैमानाची कल्पना आली. ते गणवेश चढवून लगेच निघाले. त्यांनी ताजमहाल हॉटेलकडे जाण्याचे ठरवले. वाटेत आपली शस्त्रास्त्रे घेण्यासाठी ते शस्त्रागारात जाणार  होते. दरम्यान त्यांना मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त हसन गफूर यांचा फोन आला आणि त्यांनी मारियांना कंट्रोल रूमचा चार्ज घेण्यास सांगितले.

कंट्रोल रूममध्ये पाऊल टाकल्यापासूनचा मिनिटामिनिटाचा वृत्तांत त्यांनी आपल्या ‘लेट मी से इट नौ’ या आपल्या आत्मचरित्रात दिला आहे. कसाब व त्याचा सहकारी अबू इस्माईल छत्रपती शिवाजी टर्मिनस, कामा हॉस्पिटल येथे हत्याकांड करून पायीच निघाले. सेंट झेवियर कॉलेजच्या गल्लीत त्यांनी एका पोलीस जीपवर तुफान गोळीबार केला. त्यात हेमंत करकरे,अशोक कामटे आणि विजय साळसकर हे वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत शहीद झाले. कसाब व इस्माईल यांनी सर्व प्रेतं बाहेर फेकली व गाडीचा ताबा घेऊन ती मंत्रालयाच्या दिशेने पळवली. पण त्यांना माहित नव्हते की कॉन्स्टेबल जाधव गंभीर जखमी अवस्थेत गाडीतच पडले होते. वाटेत पळवलेल्या जीपचे टायर फुटले.

==== 

हे ही वाचा: पाकिस्तानमध्ये नवा इतिहास रचणाऱ्या आयशा मलिक नक्की आहेत तरी कोण?

====

मंत्रालयाच्या जवळ त्यांना एक स्कोडा गाडी दिसली. त्या गाडीतील प्रवाशांना बंदुकीच्या धाकाने गाडीतून उतरवून दोघांनी (कसाब व इस्माईल) गाडी चौपाटीच्या दिशेने पळवली. कॉन्स्टेबल जाधव यांनी जवळच पडलेल्या वॉकीटॉकीवरून ही माहिती कळवली. गाडी वेगात चौपाटीजवळ आली असता अडथळे लावले असल्याने ती थांबली. 

That Picture Of Ajmal Kasab: How Photo Journalist Sebastian D'Souza – The  Unsung Hero Of 26/

गाडीची तपासणी करण्यासाठी पोलीस जसजसे पुढे येऊ लागले, तसे इस्माईलने हेड लाईट्स चालू केले व गाडी वेगात चालू करून दुभाजक ओलांडून विरुद्ध बाजूला नेण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी एका पोलिसाने झाडलेली गोळी इस्माईलच्या डोक्यात घुसून तो जागच्या जागी ठार झाला. कसाब पण गाडीच्या बाहेर पडून रस्त्यावर पडला. त्या क्षणी कॉन्स्टेबल तुकाराम ओंबाळे यांनी त्याच्यावर झडप घातली व त्याच्या अंगावर झोपले. ते त्याची एके ४७ रायफल काढून घेण्याचा प्रयत्न करत असतानाच कसाबने ट्रिगर दाबून ओंबाळेवर गोळ्यांचा पाऊस पाडून त्यांचा बळी घेतला. (26/11 attack)

बाकीच्या पोलीसानी कसाबला धरून उठवले आणि त्याला भरपूर चोप दिला. या मारहाणीत कदाचित कसाब मेलाही असता, पण इन्स्पेक्टर गोविलकर मध्ये पडले व त्यांनी पोलिसाना मारहाण थांबवण्यास सांगितले कारण त्यांना जाणीव झाली की, कसाब जिवंत असणे पुढील तपासासाठी आवश्यक होते.

==== 

हे ही वाचा: डॉ. आफिया सिद्दिकी (Aafia Siddiqui)- पाकिस्तानी आतंकवादाचा भयानक चेहरा

====

कसाबला अटक केली त्यावेळी त्याच्याकडे सोळंकी नावाचे आयकार्ड सापडले ज्यावर राहण्याचा पत्ता बंगलोरचा व कॉलेजचा पत्ता हैद्राबादचा होता. मारिया म्हणतात की, जर कसाबला ठार मारले असते, तर पोलीस त्या खोट्या आयकार्डच्या आधारे ‘हिंदू दहशतवाद’ समजून भलत्याच दिशेने तपास करत बसले असते. कसाबने भगवा गंडाही मनगटावर बांधला होता.(26/11 attack)

या सर्व आठवणी जाग्या होत असताना मेट्रो सिनेमा जंकशन आले जिथे कसाबने अनेकांना गोळ्या घातल्या होत्या. मारिया प्रचंड उत्तेजित झाले होते. त्यांनी कसाबला गाडीतून उतरवले व त्याला जमिनीवर नाक घासून अनेक वेळा ‘भारत माता की जय’ असा उदघोष करायला लावला. त्या क्षणी एक प्रकारचा सूडच जणू ते कसाबवर उगवत होते कारण जो कसाब भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानातून आला होता तोच म्हणत होता ‘भारत माता की जय’! 

– रघुनंदन भागवत


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.