Home » American Idol: या यशस्वी कार्यक्रमाची संकल्पना नव्हती ‘ओरिजिनल’

American Idol: या यशस्वी कार्यक्रमाची संकल्पना नव्हती ‘ओरिजिनल’

by Team Gajawaja
0 comment
American Idol
Share

हॉलीवूडचं जागतिक मनोरंजन क्षेत्रातील योगदान प्रचंड मोठं आहे. आपल्या इथेही म्हणजे भारतात बॉलीवूड आहेच की… पण इथे खेदाने नमूद करावं लागतं की, बॉलीवूडमध्ये जे चित्रपट निघाले किंवा अजूनही निघत आहेत त्यातल्या चित्रपटाची कधी थीम, कधी गाणी, कधी संगीत, तर कधी पटकथा अशा अनेक गोष्टी हॉलीवूड मधल्या चित्रपटांची नक्कल असतात.(American Idol) 

नक्कल करणं हा काही गंभीर गुन्हा नाही, पण मग ओरिजिनल स्वरूप असलेलं आपल्याकडे का तयार होत नाही? म्हणजे एखादी नवी कल्पना का आपल्याकडे सुचत नाही, का आपल्याला परदेशी चित्रपटांची किंवा टी व्ही वरच्या कार्यक्रमांची नक्कल करावी लागते? हा खरंतर चर्चेचा आणि वादाचा विषय आहे. त्यात न गेलेलच बरं…! असो. (American Idol)

अमेरिकेत छोट्या पडद्यावर तूफान लोकप्रिय झालेला आणि सगळ्यात जास्त पाहिला गेलेला कार्यक्रम म्हणजे अमेरिकन आयडॉल. हा कार्यक्रम आजच्याच दिवशी जवळपास २० वर्षांपूर्वी म्हणजे ११ जून २००२ ला प्रथम प्रसारित झाला होता.   

फॉक्स चॅनेलवर अमेरीकेत २००२ ते २०१६ या कालावधी दरम्यान प्रसारित झालेला हा कार्यक्रम अमेरिकेत प्रचंड लोकप्रिय झाला होता. अशा पद्धतीच्या  कार्यक्रमाचा लोक प्रथमच आस्वाद घेत होते. हा कार्यक्रम सुरू होण्याची कहाणीही रंजक आहे. 

अमेरिकन आयडॉल हा कार्यक्रम ब्रिटनच्या ‘पॉप आयडॉल’ कार्यक्रमावर बेतलेला आहे. हे वाचल्यावर काहींना आश्चर्याचा धक्का बसेल, पण खरी गंमत तर पुढे आहे. ब्रिटिश पॉप आयडॉल हा कार्यक्रम तर न्यूझीलंडच्या ‘पॉपस्टार्स’ या कार्यक्रमावरून घेण्यात आला आहे. सायमन फ्यूलर या ब्रिटिश निर्मात्याने ‘पॉपस्टार्स’ आणि ‘अमेरिकन आयडॉल’ हे कार्यक्रम टीव्हीवर आणले. (American Idol)

टीव्ही निर्माता नायगेल लीथगो याने ऑस्ट्रेलियामध्ये या गाण्यांच्या स्पर्धेचा कार्यक्रम पाहिला आणि त्याने ब्रिटनमध्ये असाच कार्यक्रम आणायचं ठरवलं. फ्यूलर तर कार्यक्रम पाहून प्रभावित झाला. त्याला ३ किंवा ४ जजेस असणं, त्यांनी ऑडिशन घेणं, त्यातून स्पर्धकांची निवड करणं हे सगळं मनापासून आवडलं. 

फ्यूलरने अमेरिकन आयडॉल कार्यक्रम उत्कंठावर्धक बनवण्यासाठी काही गोष्टी त्यात समाविष्ट केल्या. कार्यक्रम बघणाऱ्या लोकांनी स्पर्धकांना टेलिफोनद्वारे मतदान करायचं… तसंच कॅमेरामागे काय गोष्टी चालल्या आहेत, त्यातलं आजच्या भाषेत बोलायचं झाल्यास ‘बिहाइंड द सीन्स’ काय चालू आहे, तसंच टेक्स्ट मेसेज आणि वेबसाइटवर जाऊन मतदान करणे या गोष्टी समाविष्ट केल्या. या गोष्टींचा टीव्हीवरील  कार्यक्रमात प्रथमच समावेश करण्यात आला होता. (American Idol)

सुरवातीच्या कार्यक्रमांमध्ये परीक्षक देशभर फिरून कोण टॅलेंटेड गायक आहे, त्यांचा शोध घ्यायचे, पण नंतर ही पद्धत बदलली. अमेरिकन आयडॉल कार्यक्रमात सुरवातीला स्पर्धकांचं वय १६ ते २४ वर्ष ठरवून अशांनाच संधी देण्यात आली होती. पण नंतर नियमांमध्ये बदल करून वयोमार्यादा १५ ते २८ करण्यात आली. स्पर्धक लोकप्रिय झालेली गाणी म्हणून दाखवायचे आणि त्यातून मग आयडॉल निवडला जायचा, असं कार्यकामचं स्वरूप होतं. 

२००१ मध्ये फ्यूलर, कोवेल आणि जोन्स यांनी पॉप आयडॉल कार्यक्रमाचा फॉरमॅट अमेरिकेत विकायचा ठरवला, पण त्यात त्यानं यश आला नाही. टीव्ही निर्माते अशाप्रकारच्या कार्यक्रमांबद्दल नकारात्मक पवित्रा घेत होते. थोडक्यात त्यांना ही कल्पना फारशी रुचली नाही. इतकंच नव्हे तर, ज्या फॉक्स चॅनेलवर पुढे जाऊन कार्यक्रम प्रसारित झाला त्या चॅनेलच्या निर्मात्यांनीही सुरवातीला या कार्यक्रमाचं प्रपोजल परत पाठवलं होतं. अमेरिकन आयडॉलचे २००२ ते २०१६ दरम्यान २० सीजन्स झाले. यातले होस्ट्, स्पर्धक, परीक्षक यांना पुढे जाऊन प्रचंड प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली. (American Idol)

====

हे देखील वाचा – आर्थिक संकटात असणाऱ्या ब्रिटनला भन्नाट उपयोजना करून या ‘पोलादी स्त्रीने’ सावरलं
====

या अमेरिकन आयडॉल कार्यक्रमावरून नंतर आपल्याकडे ‘इंडियन आयडॉल’ हा कार्यक्रम सुरू झाला. त्याचेही बरेच ‘सीझन्स’ झाले. अमेरिकन आयडॉल या कार्यक्रमाचे अधिकार २०१८ पासून एबीसी या अमेरिकन वाहिनीने खरेदी केले आणि त्याचे नवीन सीजन्स सुरू झाले. ते आजही सुरू आहेत. एबीसी वर पहिल्यांदा २०१८ ला हा कार्यक्रम सुरू झाला. यात अनेकदा अमेरिकन आयडॉलचे परीक्षक बदलले तसंच कार्यक्रमाचे सूत्रधार बदलले, पण कायम राहिला तो कार्यक्रम आणि त्याची संकल्पना! अशा कार्यक्रमाला अमेरिकन टीव्हीवर येऊन आज २० वर्ष झाली आणि त्याची जादू सगळ्यांच्या मनावर घर करून राहिली. (American Idol)

– निखिल कासखेडीकर


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.