Home » 1993 चा मुंबई बॉम्बस्फोट –  अशी गवसली मुंबई बॉम्बस्फोटाच्या तपासाची ‘किल्ली’

1993 चा मुंबई बॉम्बस्फोट –  अशी गवसली मुंबई बॉम्बस्फोटाच्या तपासाची ‘किल्ली’

by Team Gajawaja
0 comment
1993 Mumbai blasts
Share

१२ मार्च १९९३ चा दिवस. सकाळपासून रोजच्या दिनचर्येनुसार मुंबई धावतच होती. पण अचानक दुपारी एका मागोमाग झालेल्या स्फोटांनी मुंबानगरी हादरून गेली. एका स्फोटाची बातमी येते न येते तोच दुसऱ्या ठिकाणी धमाका झाल्याची खबर यायची. एरव्ही लोकलच्या हॉर्नची सवय असलेल्या मुंबईकरांच्या छातीचे ठोके रुग्णवाहिकांच्या व अग्निशामक दलाच्या सायरननी चुकत होते. (1993 Mumbai blasts)

सरकारी पातळीवर तसेच पोलीस दलात खळबळ माजली. सायंकाळपर्यंत समजले की पासपोर्ट कार्यालय, वरळी, एअर इंडिया इमारत, नरिमन पॉईंट, स्टॉक एक्सचेंज इमारत, प्लाझा सिनेमा, दादर, सेना भवन, सेन्टोर हॉटेल, इत्यादी ठिकाणी भीषण बॉम्बस्फोट झाल्यामुळे अनेक निरपराध नागरिक जखमी अथवा मृत झाले होते.

सरकारी आकडेवारीनुसार २५७ नागरिक ठार झाले होते, तर एक हजारपेक्षा जास्त सामान्य जन जखमी झाले. यात महाराष्ट्राच्या कला क्षेत्राची पण हानी झाली. त्यावेळचा उदयोन्मुख कलावंत बळीराम गमरे प्लाझा जवळच्या स्फोटात मरण पावला. प्रसिद्ध अभिनेत्री आशा काळे सिग्नलला गाडी थांबल्यामुळे सेना भवनजवळील स्फोटातून बाल बाल बचावल्या. (1993 Mumbai blasts)

स्फोट कुणी घडवून आणले याचा थांगपत्ता लागला नव्हता. त्यातच तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दूरदर्शनवर शंका व्यक्त केली की, स्फोट तामिळ इलमच्या दहशतवाद्यांनी घडवून आणले असावेत. अशा अति तणावपूर्ण वातावरणात पोलीस आयुक्तालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली आणि सर्वानुमते तपासाची जबाबदारी राकेश मारियांकडे सोपवण्यात आली.

मारियांनी सर्वप्रथम आपल्या विश्वासू सहकाऱ्यांचे पथक तयार केले. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना आदेश दिले की, पोलीस नियंत्रण कक्षातून १२ मार्च रोजी नोंदवलेल्या महत्वाच्या घटनांची माहिती मिळवा. यातून एक अत्यंत महत्वाची माहिती समजली की, वरळीजवळ एक शस्त्रास्त्रानी भरलेली जीप सापडली होती.

मारियांच्या पथकाने आरटीओ कडील माहितीच्या आधारे जीपच्या मालकाचे नाव शोधून काढले. त्याद्वारे समजले की, ती जीप माहीमच्या अल हुसेनी इमारतीत राहणाऱ्या मेमन कुटुंबाची होती. लगेच मारियांनी आपल्या खबऱ्यांचे जाळे पसरले. त्यांनी टीप दिली की सदर इमारतीतील सर्व रहिवासी कुलूप  लावून निघून गेले आहेत. (1993 Mumbai blasts)

====

हे देखील वाचा: कसा आहे मुंबईच्या लाईफ लाईनचा… रेल्वेचा ९७ वर्षांचा प्रवास (Mumbai Local train)

====

खबऱ्यांच्याच साहाय्याने मेमन कुटुंबियांच्या एका नातेवाईकांपर्यंत पोलीस पोहोचले. त्यांना बोलते केल्यावर समजले की, मेमन कुटुंबीय बॉम्बस्फोटाच्या दिवशी सकाळीच भारतातून पळून गेले होते. त्या नातेवाईकांना घेऊन मारिया व त्यांचे सहकारी अल हुसेनी इमारतीत पोहोचले. रीतसर पंचनामा करून मेमन कुटुंबीयांच्या सदनिकेचे कुलूप तोडून त्यांनी आत प्रवेश केला. 

आतल्या खोल्यांची झडती घेणे सुरु असतानाच मारियांनी घरातील रेफ्रिजरेटरवर सहजच आपले कोपर टेकले आणि एखाद्या धातूचा आवाज झाल्यासारखे वाटले.त्यांनी पाहिले तर ती एका स्कुटरची किल्ली होती. त्यांनी किल्ली ताब्यात घेतली.

दरम्यान १३ तारखेला सकाळी दादर पूर्वेला राजारामवाडीसमोर एक बेवारशी स्कुटर आढळली होती. या स्कुटरच्या डिकीतून द्रवपदार्थ पाझरत होता. ते पाहून तेथील एका डॉक्टरने पोलिसाना कळवले. पोलिसांचे बॉम्ब नष्ट करणारे पथक तातडीने दाखल झाले. त्यांनी सर्व रहिवाशांच्या सुरक्षेची काळजी घेऊन स्कुटरमधील आर डी एक्स नष्ट केले आणि एक मोठा अनर्थ टाळला. (1993 Mumbai blasts)

====

हे देखील वाचा: बॉम्बे ते मुंबई!

====

त्यानंतर सदर वाहन पोलीस ठाण्यात नेण्यात आले. मारियांच्या तपास पथकाला ही माहिती कळल्यावर मारियांनी त्यांना मेमन कुटुंबियांच्या घरात मिळालेली किल्ली त्या स्कुटरला चालते का ते पाहण्यास सांगितले आणि काय आश्चर्य!? ती किल्ली त्याच स्कुटरची होती.

मारियांच्या पथकाचा आनंद द्विगुणित झाला कारण केवळ दोन दिवसात गुन्ह्याची उकल झाली होती. मारियांनी तत्काळ आपल्या वरिष्ठांना गुन्ह्याची उकल झाल्याची बातमी कळवली. तसेच आपल्या घरी सुद्धा ही बातमी केव्हा कळवतो असे त्यांना झाले होते. (1993 Mumbai blasts)

अशाप्रकारे केवळ अपघातानेच हाती लागलेल्या एका स्कुटरच्या किल्लीने मुंबई पोलिसांना जणू बॉम्बस्फोटाच्या तपासाची किल्लीच गवसली होती. त्याआधारे पुढे अनेक आरोपींना जेरबंद करण्यात आले व रीतसर खटल्याची सुनावणी होऊन विविध कलमांखाली त्यांना शिक्षा सुनावण्यात आल्या. आजही त्यातील अनेक गुन्हेगार आजन्म कारावास भोगत आहेत पण मुंबईच्या हृदयाला झालेली जखम मात्र कधीही भरून निघणार नाही हे निश्चित.

– रघुनंदन भागवत


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.