‘गेम्स ऑफ पीस अँड जॉय’ म्हणून ओळखला जाणाऱ्या ऑलिम्पिक १९७२ मध्ये इतिहासात पहिल्यांदा एक भयंकर घटना घडली होती. ८ पॅलेस्टिनी दहशतवादींनी ११ इस्रायली प्लेअर्सना मारलं होतं. जी घटना म्युनिक हत्याकांड म्हणून ओळखली जाते. आता कोणी आपल्या देशाचा बदला घेण्यासाठी किती पुढे जाऊ शकतं याचं एक उदाहरण म्हणजे इस्रायली गुप्तचर संस्था मोसाद. आता मोसाद इतक्या सिक्रेटली ऑपरेशन्स राबवते की जगाला त्याची जराही खबर लागत नाही. १९७२ मध्ये मारल्या गेलेल्या ११ इस्रायली खेळाडूंच्या हत्येचा बदला घेण्यासाठी सुरू झालेल्या ऑपरेशनबद्दल चा आहे ज्याचं नाव होतं ‘रॅथ ऑफ गॉड’ जे तब्बल २० वर्ष चाललं. तर या मिशन मध्ये नक्की काय घडलं … ते मोकाट फिरत असलेले दहशतवादी सापडले का? मोसादचं हे ‘रॅथ ऑफ गॉड’ मिशनबद्दल सविस्तर जाणून घेऊ. (Mossad Operations)
म्युनिकमधल्या ११ इस्रायली खेळाडूंच्या हत्येने जग हादरलं. इस्रायल सरकारवर प्रेशर आलं. दुसऱ्या दिवशी गोल्डा मायर यांनी मोशे दयान आणि मोसादच्या बड्या ऑफिसर्ससोबत इमर्जन्सी मीटिंग घेतली. लगेच पुढच्या दिवशी इस्रायलने सीरिया आणि लेबनानमधल्या पीएलओच्या ठिकाणांवर बॉम्ब टाकले, ज्यात २०० हून जास्त दहशतवादी ठार झाले. इस्रायली आर्मीने साउथ लेबनानमधली १०० पेक्षा जास्त घरं उद्ध्वस्त केली, जिथे पीएलओ दहशतवादी लपले असण्याची शक्यता होती. यामुळे लोकांचा राग थोडा कमी झाला, पण मुख्य दहशतवादी मोकळेच फिरत होते. म्हणून मोसादला गुप्त ऑपरेशनची जबाबदारी मिळाली. त्यांनी ३५ दहशतवाद्यांची लिस्ट बनवली, जे जगभर लपले होते. त्यांना इतर देशांमध्ये विदाउट पर्मिशन घुसून त्यांना ठार करायचं होतं. गोल्डा मायर यांनी सुरुवातीला नकार दिला, पण मोसादने त्यांना तयार केलं. (Top Stories)
मायकेल हरारी अंडर पाच युनिट्स बनवल्या गेल्या, ज्यात एकूण १५ एजंट्स होते. प्रत्येक युनिटला हिब्रू अक्षरांचं नाव होतं. ‘Aleph’ मध्ये दोन किलर्स, ‘Bet’ मध्ये दोन गार्ड्स, ‘Het’ मध्ये दोन जण- हॉटेल्स-गाड्यांची व्यवस्था करायला, ‘Ayin’ मध्ये ६-८ एजंट्स- टारगेट ट्रॅक आणि माहिती पुरवायला आणि ‘Qoph’ मध्ये दोन जण कोऑर्डिनेशन आणि इन्फॉर्मेशन वेरिफिकेशन करायला. आता हे सगळं सिक्रेटली आणि खोटी कागदपत्रं वापरून करायचं होतं, म्हणजे इस्रायलचं नाव समोर येणार नाही.

ऑपरेशनची तयारी झाल्यावर मोसादचे एजंट्स पहिल्या टारगेटच्या मागे लागले. पहिला टारगेट होता Wael Zwaiter, जो रोममध्ये राहून पीएलओसाठी काम करायचा. १६ ऑक्टोबरच्या रात्री त्याच्यावर ११ गोळ्या झाडून ठार केलं. या ११ गोळ्या म्हणजे म्युनिकमधल्या ११ इस्रायली प्लेअर्सच्या हत्येचा बदला होता. आता इस्रायलला त्यांच्या शत्रूंमध्ये दहशत पसरवायची होती. पण १३ दिवसांनी, २९ ऑक्टोबर १९७२ ला ब्लॅक सप्टेंबरने लुफ्थान्सा फ्लाइट 615 हायजॅक करून म्युनिक हत्याकांड मधल्या तिन्ही दहशतवाद्यांना सोडवलं होतं. यामुळे इस्रायलचा राग आणखी वाढत गेला.(Mossad Operations)
पहिला टारगेट मारल्यानंतर मोसादने लिस्टमधल्या इतरांचा पाठलाग सुरू ठेवला. डिसेंबर १९७२ मध्ये त्यांना महमूद हमसारचा पत्ता लागला, जो फ्रान्समध्ये पीएलओसाठी काम करत होता. त्याच्या अपार्टमेंटवर पाळत ठेवली गेली, पण तो बाहेर पडतच नव्हता. मग मोसादच्या एका एजंटने इटालियन पत्रकार बनून त्याला मुलाखतीच्या बहाण्याने बाहेर बोलवलं, तर दुसऱ्याने त्याच्या फोनमध्ये बॉम्ब लावला. ८ डिसेंबरला पत्रकार बनलेल्या एजंटने फोन लावला, महमूद हमसार? असं विचारलं, समोरून हो असं आलं आणि मोठा स्फोट झाला. हमसार गंभीर जखमी झाला आणि काही आठवड्यांनी मेला. हा हमसार म्हणजे, ज्याने म्युनिक हत्याकांडानंतर मोठ्या गप्पा मारल्या होत्या की, त्याला जीवाची भीती नाही.
दोन टार्गेटनंतर मोसादने हुसैन अल बशीरचा पाठलाग सुरू केला. एका महिन्याच्या मेहनतीनंतर त्याचा ठावठिकाणा सायप्रसच्या निकोसियात लागला, जिथे तो पीएलओमध्ये काम करत होता. मोसादच्या एजंट्सनी त्याच्या हालचालींवर नजर ठेवली आणि २४ जानेवारी १९७३ च्या रात्री त्याच्या हॉटेलच्या खोलीत बेडखाली बॉम्ब लावला. तो झोपायला गेला, तेव्हा स्फोट झाला आणि तो मेला. त्यानंतर बेरूतच्या अमेरिकन युनिव्हर्सिटीतले प्राध्यापक आणि पीएलओ सदस्य बासल अल कुबैसी यांना फक्त संशयावरून टार्गेट केलं, संशय असा होता की, त्यांनी म्युनिक ऑलिम्पिक्ससाठी शस्त्रं पुरवली होती. पॅरिसमध्ये एका रात्री हॉटेलमधून बाहेर पडताना दोन शूटर्संनी त्यांच्यावर ११ गोळ्या झाडून ठार केलं. (Top Stories)

आता ब्लॅक सप्टेंबरचे दहशतवादी घाबरले आणि त्यांनी गोल्डा मायर यांच्या हत्येचा कट रचला. जानेवारी १९७३ मध्ये गोल्डा मायर रोममध्ये पोप पॉल सहाव्यांना भेटायला जाणार होत्या. ही बातमी गुप्त होती, पण ब्लॅक सप्टेंबरच्या अली हसन सलामेपर्यंत पोहोचली. त्याने मायर यांचं विमान फ्युमिसिनो विमानतळावर मिसाइलने उडवण्याचा प्लॅन बनवला. युगोस्लाव्हियातून स्ट्रेला-2 मिसाइल्स बोटीने इटलीत आणले आणि विमानतळाजवळ लपवले. मोसाद आणि इटालियन पोलिसांचं लक्ष त्यांच्यावरून हटवण्यासाठी २८ डिसेंबर १९७२ ला त्यांनी बँकॉकमधल्या इस्रायली embassy वर हल्ला करून १२ जणांना ताब्यात ठेवलं. मग इस्रायलने आपल्या लोकांना सोडवलं, पण मोसादला सलामेच्या प्लॅनिंगची खबर मिळाली. मोसादने याबद्दल इटलीच्या दहशतवादविरोधी युनिट डिगोसला सांगितलं. डिगोसने विमानतळ तपासलं, तिथे एका संशयास्पद व्हॅनमधूनस्ट्रेला-2 मिसाइल्स आणि लाँचरसोबत दहशतवादी सापडले. इटालियन पोलिसांनी तात्काळ कारवाई करून सगळं कंट्रोलमध्ये आणलं.(Mossad Operations)
मोसादने आतापर्यंत बरेच टारगेट्स ठार केले, पण पुढचा रस्ता सोपा नव्हता. त्यांनी ब्लॅक सप्टेंबर आणि पीएलओमधली तीन मोठी नावं- मोहम्मद यूसुफ अल नजर, कमाल अदवान आणि कमाल नासिर यांना टारगेट केलं. हे तिघं बेरूतमधल्या ब्रिटिश-इटालियन कॉलनीत सातमजली इमारतीत राहत होते. मग मोसादने इस्रायली नेवी आणि सायरत मटकाल कमांडोंना सोबत घेतलं. जानेवारी १९७३ मध्ये मोसादची एजंट नीलसन बेरूतला गेली. तिने तिघांच्या शेजारचं अपार्टमेंट भाड्याने घेऊन त्यांच्यावर पाळत ठेवली. इस्रायलमध्ये ऑपरेशनची तयारी झाली, ज्यात बरेच कमांडो आणि नेवी स्पेशलिस्टस् सामील होते. ६ एप्रिल १९७३ ला मोसादचे सहा एजंट्स खोटे ब्रिटिश, जर्मन, बेल्जियन पासपोर्ट्स घेऊन बेरूतला पोहोचले आणि सगळी व्यवस्था केली. ९ एप्रिलच्या रात्री नेवीच्या मदतीने कमांडो समुद्रकिनाऱ्यावर उतरले. त्यांनी वेष बदलला होता. ते सगळे टुरिस्टच्या वेषात होते आणि एकाच वेळी हल्ला करून अल नजर, अदवान आणि नासिर यांना ठार केलं. पण यात दोन लेबनीज पोलीस आणि एक इटालियन नागरिक मेला. मग कमांडोंनी पॉप्युलर फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ पॅलेस्टाईनच्या मुख्यालयावर हल्ला करून पीएलओ आणि पीएफएलपीच्या १०० हून जास्त लोकांना ठार केलं. (Top Stories)
लेबनानमधले टारगेट्स पूर्ण झाल्यानंतर मोसादने म्युनिक हत्याकांडाचा मास्टरमाइंड अली हसन सलामेला टारगेट केलं. तो नॉर्वेच्या लिलीहॅमरमध्ये लपलाय असं कळलं. मोसादचे एजंट्स तिथे पोहोचले, पण सलामेनेच खोटी माहिती पसरवली होती. त्यांनी २१ जुलै १९७३ ला चुकून मोरोक्कन वेटर अहमद बूशिकीला ठार केलं. नॉर्वेजियन पोलिसांनी सहा मोसाद एजंट्सना, त्यात दोन बायका होत्या त्यांना पकडलं. युनिटचा लीडर मायकेल हरारी पळाला. पोलिसांनी चौकशी केली, तेव्हा एजंट्सनी ‘रैथ ऑफ गॉड’ ऑपरेशनचे महत्त्वाचे डिटेल्स उघड केले. मोसादच्या अनेक देशांमधल्या कारवाया उघड झाल्याने आता इस्रायलची बरीच नाचक्की झाली. गोल्डा मायरवर प्रेशर आलं आणि त्यांनी ऑपरेशन बंद केलं.(Mossad Operations)
===============
हे देखील वाचा : Charlie Kirk : डोनाल्ड ट्रम्प यांचे निकवटर्तीय असलेल्या चार्ली कर्क यांची हत्या
===============
चार वर्षांनंतर, १९७७ मध्ये इस्रायलमध्ये निवडणुका झाल्या आणि मेनाहेम बेगिन पंतप्रधान झाले. त्यांनी पुढच्या वर्षी ‘रैथ ऑफ गॉड’ ऑपरेशन पुन्हा सुरू केलं. अली हसन सलामेमुळे इस्रायलची बरीच बदनामी झाली होती, त्यामुळे मोसादने त्यालाच ठार करायचं ठरवलं. १९७८ च्या हिवाळ्यात तो बेरूतच्या रुए व्हेर्दन रोडवर सापडला. मोसादने एका लेडी एजंटला ब्रिटिश नागरिक म्हणून बेरूतला पाठवलं. तिने तिथे अपार्टमेंट भाड्याने घेतलं आणि सलामेवर नजर ठेवली. दोन एजंट्स ब्रिटिश आणि कॅनेडियन पासपोर्ट घेऊन आले आणि सलामेला मारायचा प्लॅन आखला. त्यांनी स्फोटकांनी भरलेली कार रस्त्यावर ठेवली. २२ जानेवारी १९७९ च्या दुपारी ३:३५ वाजता, सलामे त्याच्या चार सिक्युरिटी गार्डसोबत त्या कारजवळून गेला. लेडी एजंटने अपार्टमेंटमधून त्याला कार मध्ये बसलेलं बघितलं आणि कार उडवली. स्फोटात सलामे आणि त्याचे चार सिक्युरिटी गार्ड ठार झाले. सहाव्या प्रयत्नात मोसादने सलामेला कायमचं संपवलं. (Mossad Operations)
लंडन, पॅरिस, बेल्जियम, कान्समध्ये सैद हम्मामी, आदिल कलक, जुहैर मोहसेन, नाईम खादेर यांसारख्या पीएलओच्या मधल्या लोकांची हत्या झाली. १७ जून १९८२ ला इटलीत नाझी मायरला घराबाहेर गोळ्या घातल्या, तर कमाल हुसैनला कारमध्ये बॉम्बने उडवलं. १० जून १९८६ ला एथन्समध्ये डीएफएलपीचा सेक्रेटरी खालिद अहमद नज्जल याला हॉटेलबाहेर मारलं. या सगळ्यांच्या हत्या कोणी केल्या हे संशयास्पद आहे, पण असं म्हणतात मोसादनेच या हत्या केल्या असाव्यात. २० वर्षं मोसादने गुपचूप पीएलओ, ब्लॅक सेप्टेंबर आणि फतहच्या बड्या कमांडर्सना संपवून त्यांचं नेटवर्क नेस्तनाबूत केलं. जर्मनीच्या तुरुंगातून सुटलेल्या तीन हत्यारांपैकी दोघांना ठार केलं, पण जमाल अल गशी हातातून निसटला. म्युनिकचा एक दहशतवादी सुटला, पण ‘रॅथ ऑफ गॉड’च्या २० वर्षांत मोसादने शेकडो शत्रूंना ठार करून ११ खेळाडूंना खरी श्रद्धांजलि दिली. तर असं झालं म्युनिक हत्याकांडचा बदला म्हणून इस्राइलने चालवलेलं रॅथ ऑफ गॉड मिशन! अधूनमधून इस्राइल पॅलेस्टीनच्या खबर येतच असतात पण त्यांच्यातला हा वाद गेली बरीच वर्ष सुरू आहे.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
