विनामास्क घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाईचा बडगा पोलिसांनी उगारला आहे. दोन ते दहा सप्टेंबर या नऊ दिवसांच्या काळात २७ हजार ९८९ नागरिकांकडून एक कोटी ४० लाख रुपयांचा दंड पोलिसांकडून वसूल करण्यात आला आहे.
गेल्या सात महिन्यांपासून शहरासह संपूर्ण देशात करोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून नागरिकांमध्ये मात्र, याबाबत अधिक गांभीर्य असल्याचे दिसत नाही. या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असताना देखील अनेक नागरिक सर्रासपणे विनामास्क घराबाहेर पडत असल्याचे समोर आले आहे. या आजाराचा प्रसार अधिक होऊ नये, यासाठी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत आणि स्थानिक पोलिसांना या कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत.
मास्क न घालता रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांवर; तसेच दुचाकी, चारचाकी वाहनातून प्रवास करताना मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करून त्याच्याकडून पाचशे रुपये दंड घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दोन सप्टेंबरपासून पुणे शहरात ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. आठ सप्टेंबरपर्यंत पोलिसांनी १५ हजार २०६ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून ७६ लाख ३ हजार रुपयांचा दंड वसूल केला होता; तर केवळ एका दिवसातच हा आकडा एक कोटीच्या घरात पोहोचला आहे. मास्क नसल्यास कारवाई करण्याचे अधिकार महापालिकेने पोलिसांना प्रदान केले आहेत. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातूनदेखील मास्क न घालता वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांवर दंड केला जात आहे. गेल्या नऊ दिवसांमध्ये मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर कारवाई करून पोलिसांनी एक कोटी ४० लाख रुपये दंड वसूल केला आहे.