भारतावर आक्रमणाचे पर्व सुरू करणारा सुलतान, गझनीचा महमूद (९७०-१०३०)
महमूद हा मध्य आशियातील गझनी या छोट्या राज्याचा तुर्को सुलतान होता. इसवीसनच्या पहिल्या सहस्त्रकाची शेवटची तीस वर्ष आणि दुसऱ्या सहस्त्रकाची पहिली तीस वर्ष (९७० ते १०३०) हा त्याचा जीवनकाल होता. इस्लाम धर्म स्वीकारलेल्या आणि इराणी (पर्शियन) संस्कृतीच्या प्रभावाखाली येऊ लागलेल्या तुर्क टोळीवाल्यांनी मध्य आशियाई राजकारणात त्या काळी वर्चस्व मिळवलं होतं. महमूद हा त्यांपैकीच एक होता.
हा धडाडीचा लढवय्या इ.स. ९९८ मध्ये सुलतान झाला. समृद्ध भारताकडे लवकरच त्याने आपला मोहोरा वळवला. १००१ ते १०२७ या कालखंडात त्याच्या आक्रमणांच्या सतरा लाटा भारतावर आदळल्या.
प्रथम पेशावर व पंजाब परिसरातील हिंदुशाही राज्यकत्यांविरुद्ध त्याने मोहिमा आखल्या. जयपाळ व अनंगपाळ या हिंदशाही राज्यकर्त्यांनी तुर्की आक्रमणाचा प्रतिकार केला. परंतु महमुदापुढे त्यांचा आणि त्यांच्याशी हातमिळवणी करणाऱ्या मुलतानी मुस्लिम सत्ताधीशांचा टिकाव लागला नाही. हाती सापडलेल्या पराभूत जयपाळाला मुक्त करण्याचा औदार्य महमुदाने दाखवलं, पण जयपाळने मानहानीपेक्षा अग्निप्रवेशाद्वारे मृत्यू पत्करला. पंजाब-मुलतान प्रदेश महमुदाच्या ताब्यात गेला.
यानंतर उत्तर भारतात विविध ठिकाणी आक्रमणं करून त्याने प्रचंड लूट मिळवली, स्थानेश्वर, कनोज, मथुरा येथे धडका मारून त्याने शहरं व मंदिरं लुटण्याचा सपाटा लावला. या साऱ्या आक्रमणांमध्ये महमुदाच्या सैन्याला डोंगर-दऱ्या, सिंधूपासून गंगेपर्यंतच्या नद्या, दाट जंगलं, रखरखीत वाळवंट ओलांडावी लागली. माणसांप्रमाणे निसर्गाशीसुद्धा सामना करावा लागला; पण पराक्रमाच्या व दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर या साऱ्यावर मात करता आली. शेवटी महमुदाने गुजरातमधील सोमनाथवर राजस्थानमागें स्वारी केली. प्रभासपट्टणचं सोमनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक होतं. श्रीमंत सोमनाथाच्या भक्तांची संख्या लाखात, पुजाऱ्यांची हजारात, तर तेथील गायक नर्तिकांची संख्या शेकड्यांमध्ये होती. समुद्रकाठच्या या वैभवशाली मंदिराची यथेच्छ लूट महमुदाने केली.
महमूदी आक्रमणाच्या लाटा, संपत्तीची अमाप लूट, मंदिर व मूर्ती यांचा प्रचंड विध्वंस या पार्श्वभूमीवर भारतात महमुदाकडे एक ‘खलनायक’ म्हणून पाहिलं गेलं. मुस्लिम धर्माभिमान्यांनी मात्र ‘गाझी’ (धर्म-बीर) आणि ‘बुतशिकन’ (मूर्तिभंजक) म्हणून त्याला गौरवलं.
महमुदाच्या लुटींमागील आर्थिक प्रेरणा स्पष्ट आहेत. मध्य आशियाई प्रदेशात तो सदैव लढ्यामध्ये गुंतलेला असे. त्यामुळे समृद्ध भारताच्या संपत्तीची गरज त्याला भासली. भारतात आपल्याविरुद्ध राजकीय संघर्ष निर्माण होऊ नये याची काळजीही तो घेत असे. त्याच्या स्वाऱ्या व लुटींमागे हे आर्थिक-राजकीय गणित होतं, प्रार्थनामंदिरांची लूट हा त्या वेळच्या राजकारणाचा एक भाग होता. महमुदाने शांततेच्या काळात मंदिरं उद्ध्वस्त केली नाहीत. महमुदाने खुद्द त्याच्या राजधानीत हिंदू नागरिकांना मूर्तिपूजा स्वातंत्र्य बहाल केलं होतं, तर दुसरीकडे हिंदूप्राणे अनेक मुस्लिम विरोधकांनासुद्धा महमुदाने कंठस्नान घातलं; कारण धर्मकारणापेक्षा सत्ताकारणात त्याला रस होता.
पंजाब पलीकडचा भारतीय प्रदेश गझनीच्या राज्यात समाविष्ट करण्याच्या भानगडीत महमूद पडला नाही. किंबहुना भारतात साम्राज्यनिर्मिती करण्यात त्याने रस घेतला नाही. त्याऐवजी आपलं गझनीचं राज्य त्याने बळकट व समृद्ध केलं. भारताच्या संदर्भात महमूद हा मूर्तिभंजक आक्रमक म्हणून ओळखला जातो; पण गझनीच्या संदर्भातील त्याची प्रतिमा अगदी भिन्न आहे. महमूद हा विद्या-कलांचा सुसंस्कृत भोक्ता होता. गझनीच्या राज्यात त्याने इराणी (पर्शियन) प्रबोधनाला उत्तेजन दिलं. तुर्की टोळ्यांवर इस्लामचे आणि इराणी प्रबोधनाचे संस्कार घडवण्यात महमूद ची भूमिका अर्थपूर्ण ठरली.
गझनी येथे त्याने अनेक सुंदर इमारती बांधल्या. तसंच विद्यापीठ, ग्रंथालय व संग्रहालय उभारलं.
अल्बेरुणी (अल-बिरुनि) हा ख्यातनाम विद्वान महमुदाबरोबर भारतात आला होता. ‘तहकिक-इ-हिन्द’ हा अल्बेरुणीचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. भारतीय खगोलशास्त्र, गणित, तत्त्वज्ञान इत्यादी विषयांवर त्याने केलेलं लेखन मौलिक ठरलं. फिरदौसी हा राजकवी, उत्वी हा इतिहासकार आणि फाराबी हा तत्त्वज्ञ यांनाही महमुदाने आश्रय दिला. ‘शाहनामा’ लिहिणाऱ्या फिरदौसीचं वर्णन ‘पार्शियाचा होमर’ असं केलं जातं.
त्याच्याबाबत एक दंतकथा सांगितली जाते. त्याच्या महाकाव्यासाठी सुलतान महमूद ने त्याला चांदीच्या रूपात भरपूर बिदागी दिली. पण मानी फिरदौसी रुसला आणि त्याने बिदागी झिडकारली. हे समजल्यावर आपला अपमान गिळून महमुदा फिरदौसी साठी आणखी बिदागी धाडली; पण दैवदुर्विलास असा की, खुरासान मधील फिरदौसी च्या घरी ही बिदागी पोहोचली, तेव्हा फिरदौसीची अंत्ययात्रा निघाली होती.
टिकाऊ स्वरूपाची प्रशासनव्यवस्था उभारण्यात मात्र महमुदाला यश आलं नाही. त्यामुळे त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या साम्राज्याचा ऱ्हास घडून आला. महमूदच्या आक्रमणांद्वारे भारताच्या वायव्य सरहद्दीकडील डोंगररांगांची नैसर्गिक तटबंदी तुर्कानी पार केली. त्यामुळे भावी आक्रमणांसाठीच्या वाटा खुल्या झाल्या. पुढे या वाटांनी मुस्लिम आक्रमकच नव्हे, तर एक नवं पर्वच भारतात अवतरलं.
क फॅक्टस टीम