गुगलचा २० टक्के वेळ कल्पकतेला
गुगलचा प्रवास यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट ठरली ते म्हणजे त्यांचं इनोव्हेशन. सातत्याने कल्पकतेला आणि नवीन संकल्पनांना गुगलमध्ये वाव दिला जातो. त्यासाठी संशोधनासाठीसुद्धा तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळेच आजच्या घडीला गुगल एक यशस्वी सर्च इंजिन आहे.
गुगलच्या सॉफ्टवेअर तंत्रज्ञांना त्यांच्या दैनंदिन प्रकल्पांना बाजूला ठेवून आठवड्यातून एक दिवस त्यांच्या स्वतःच्या कल्पनांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. याला २० टक्क्यांचा नियम म्हटले जाते. आणि या नियमामुळे गुगलला त्यांची अनेक उत्कृष्ट म्हणून ओळखली जाणारी उत्पादने आणि सेवा देण्यास मदत झाली आहे.
उदाहरणच द्यायचे झाले तर गुगल न्यूजसुध्दा एका कर्मचाऱ्याच्या ९/११ च्या अतिरेकी हल्ल्यानंतरच्या बातम्या क्रमवार एकत्रित करण्याच्या प्रयत्नातूनच निर्माण झाले. ‘फ्रुगल’ ही खरेदी करण्याची साईट (शॉपिंग साईट) या २० टक्के वेळात एका तंत्रज्ञाने केलेल्या उत्पादनांच्या संशोधनातूनच तयार झाली. आणखी एका तंत्रज्ञाने गुगल १०१ ची निर्मिती केली. यात संगणक क्षेत्रात करिअर करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची अधिक चांगली तयारी करण्यासाठी माहिती दिलेली होती.
आजपर्यंत या नियमांचा गुगलला फायदाच झाला आहे. गुगलची कितीतरी प्रॉडक्ट्स याच संकल्पनेतून जन्माला आली आहेत. विविध संकल्पनांवर काम करण्यासाठी गुगलकडून पूर्ण स्वातंत्र्य लोकांना दिले जाते. त्यामुळे त्याचा फायदा गुगलला झाल्याचं आपण बघतोय.
जी-मेल ही गुगलची विनामूल्य वेबसेवा सुध्दा या २० टक्के कालावधीतूनच निर्माण झाली. असेही नाही की, २० टक्के कालावधीतला प्रत्येक प्रकल्प सफल होऊन कार्यान्वित करता येतो पण सीइओ एरिक यांच्या म्हणण्यानुसार संस्था नवनिर्मितीच्या संकल्पनांवर विसंबून असते. जवळजवळ प्रत्येक गोष्टच या २० टक्के वेळातून येताना दिसते. त्या व्यवस्थापकीय गटातून निश्चितपणे येत नाहीत.
एकंदरच ज्यावेळी तुम्ही नवीन संकल्पना आणि संशोधनाला वाव द्याल त्यावेळी तुम्हाला त्याचा फायदा हा नक्कीच होतो असं म्हटलं जातं. तेच आज गुगलच्या बाबतीत बघायला मिळत आहे असं आपण म्हणू शकतो.
क फॅक्टस टीम