Home » इटलीमध्ये आता जॉर्जियाराज मेलोनी आणि हुकुमशहा बेनितो मुसोलिनी यांच्या नावाची चर्चा

इटलीमध्ये आता जॉर्जियाराज मेलोनी आणि हुकुमशहा बेनितो मुसोलिनी यांच्या नावाची चर्चा

by Team Gajawaja
0 comment
Giorgia Meloni
Share

इटलीमध्ये सध्या जॉर्जिया मेलोनी आणि हुकुमशहा बेनितो मुसोलिनी यांच्या नावाची चर्चा आहे.  मुसोलिनीबद्दल तर आपल्याला माहिती आहे. मात्र जॉर्जिया मेलोनी हे नाव इटलीशिवाय इतरत्र फारसे परिचित नाही.  मात्र या जॉर्जिया मेलोनीच्या नावाचा जागतिक राजकारणात सध्या काहींनी धसका घेतला आहे. इटलीत प्रखर राष्ट्रवादी म्हणून परिचित असलेल्या जॉर्जिया मेलोनी या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान होणार आहेत. त्या इटलीच्या पंतप्रधान झाल्यास इटलीत पुन्हा हुकूमशाही येईल अशी शक्यता त्यांच्या विरोधकांनी व्यक्त केली होती. मात्र असे असूनही जॉर्जिया या बहुमतांन निवडून आल्या. ब्रदर्स ऑफ इटली पक्षाच्या जॉर्जिया या मुसोलिनीच्या फॅन आहेत. 

पंतप्रधान पदी विराजमान झाल्याबरोबर त्या युरोपियन युनियनमधून बाहेर पडतील अशी शक्यता आहे.  याबरोबरच निर्वासीतांबाबतच्या रोखठोक भुमिकांमुळेही जॉर्जिया चर्चेत राहिल्या आहेत. आता पंतप्रधान झाल्यावर त्या या बाबतीत काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.  

इटलीतील ब्रदर्स ऑफ इटलीच्या नेत्या जॉर्जिया मेलोनी यांनी सार्वत्रिक निवडणुकीत केलेला विजयाचा दावा खरा ठरला आहे. आता जॉर्जिया इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान असणार आहेत. त्यांचे सरकार म्हणजे हुकूमशहा बेनिटो मुसोलिनीनंतर इटलीमध्ये पुन्हा एकदा अतिउजव्या विचारांचे सरकार असेल, असा दावा विरोधकांनी केला आहे. जॉर्जिया मेलोनी या मुसोलिनीच्या विचारांच्या चाहत्या आहेत.  

जॉर्जिया यांनी अनेकवेळा सार्वजनिक मंचावरुन मुसोलिनीच्या विचाराचे कौतुक केले आहे. आपल्या विजयात याच विचारांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले आहे, तसेच इटलीच्या जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला आहे आणि आम्ही त्यांची कधीही फसवणूक होऊ देणार नाही. असा विश्वासही व्यक्त केला आहे.  

2018 च्या सार्वत्रिक निवडणुकीत जॉर्जिय मेलोनी यांच्या ब्रदर ऑफ इटली पक्षाला 4.5 टक्के मते मिळाली होती. 45 वर्षीय जॉर्जिया यांनी ‘देव, देश आणि कुटुंब परिवार’ हे घोषवाक्य घेऊन प्रचार केला. जॉर्जिया यांच्या पक्षाचा अजेंडाही स्पष्ट होता. युरोसेप्टिझम आणि इमिग्रेशनविरोध याशिवाय त्यांच्या पक्षाने गर्भपाताच्या अधिकारांमध्ये कपात करण्याचाही प्रस्ताव दिला. 2018 नंतर मेलोनीची लोकप्रियता झपाट्याने वाढली. 

मेलोनीचे सहकारी साल्विनी आणि सिल्व्हियो बर्लुस्कोनी हे देखील त्यांच्या लोकप्रियतेला कारणीभूत आहेत.  2008 मध्ये, बर्लुस्कोनी पंतप्रधान असताना त्यांनी जॉर्जिया यांना क्रीडा मंत्री केले. आता इटलीमध्ये मध्यावर्ती निवडणुका झाल्यावर याच जॉर्जिया, पंतप्रधान पदाच्या उमेदवार म्हणून  पुढे आल्या. जॉर्जिया यांच्या रोखठोक धोरणाला इटलीतील जनतेनं पाठिंबा दिला. निवडणुकीपूर्वीच त्यांच्या विजयाचे गणित मांडण्यात आले.  

जॉर्जिया यांचा ब्रदर्स ऑफ इटली हा पक्ष उजव्या विचारसरणीचा मुख्य पक्ष आहे. या पक्षाच्या राष्ट्रवादी अजेंड्यामुळे आणि परखड भाषणशैलीमुळे जॉर्जिया विरोधकांच्या कायम पुढे राहिल्या. जॉर्जिया यांचा विजय म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर इटलीमध्ये पहिल्यांदाच उजव्या विचारसरणीचा विजय असल्याचे मानण्यात येते.  

जॉर्जिया यांचा विजय मूळ इटलीवासीयांना सुखावणारा असला तरी युरोपमध्ये अस्वस्थता आहे. कारण जॉर्जिया युरोपियन युनियनच्या धोरणांबरोबर सहमत नाहीत. त्यामुळे त्या युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ शकतात. तसेच निर्वासितांबाबत त्यांची भूमिका अत्यंत कडक असून त्यांचा विजय इटलीतील निर्वासीतांच्या काळजीत भर टाकणारा आहे.  

जॉर्जिया यांनी इटलीतील निर्वासितांची वाढती लोकसंख्या हा महत्त्वाचा मुद्दा बनवून निवडणूक लढवली. त्याच वेळी, त्यांनी युरोपियन युनियनवर इटलीची वांशिकता बदलल्याचा आरोपही केला. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या धर्तीवर जॉर्जिया यांचीही मते आहेत.  त्यांनी, स्थलांतरित, विशेषत: मुस्लिम स्थलांतरित, धोकादायक असल्याचे सिद्ध झाले आहे, असे मध्यंतरी वक्तव्य केले होते.  यावर त्यांच्यावर टिका झाली, पण त्या आपल्या वक्तव्यावर ठाम राहिल्या. एवढंच नाही तर, सुमारे महिनाभरापूर्वी मेलोनी यांनी एका महिलेवर झालेल्या बलात्काराचा व्हिडिओ पोस्ट केला होता. हा व्हिडिओ पिसेन्झा शहरातील होता. 

यामध्ये एक कृष्णवर्णीय व्यक्ती युक्रेनमधून आलेल्या एका निर्वासित महिलेवर बलात्कार करत होता. हा व्हिडिओ पोस्ट करत मेलोनीने दावा केला की, ती अशा घटनांना कठोरपणे नियंत्रणात आणेल. पण हा व्हिडीओ शेअर करतांना मेलोनी यांनी ब्लरही केला नव्हता…तो जसाच्या तसा पोस्ट केल्यानं त्यांच्यावर टिकाही झाली. 

इटलीत 21 जुलै 2022 रोजी मारिओ द्राघीचे इटालियन सरकार पडले. त्यानंतर लवकरात लवकर निवडणूक घेण्याचे ठरले. त्यानुसार झालेल्या निवडणुकीत जॉर्जिया यांच्या पक्षानं बाजी मारली आहे.  जॉर्जिया यांचा पक्ष इटालियन हुकूमशहा मुसोलिनीचा समर्थक आहेत. सध्या इटलीवर 2100 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. शिवाय कोरोनामुळे बिघडलेली आरोग्य आणि आर्थिक घडी पुन्हा निट बसवण्याचे आव्हानही जॉर्जिया यांच्यासमोर आहे.  

मेलोनी 2014 पासून ब्रदर्स ऑफ इटली पक्षाचे नेतृत्व करत आहेत. हा पक्ष 10 वर्षांपूर्वी इटलीमध्ये अधिकार आणि वारशाची भावना पुढे नेण्यासाठी स्थापन करण्यात आला. या पक्षाचे सरकार स्थापन झाल्याने दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच इटलीमध्ये अति उजव्या पक्षाचे सरकार स्थापन झाले आहे. सत्तेत आल्यावर जॉर्जिया या पहिल्यांदा स्थलांतरितांना रोखण्यासाठी नौदल नाकेबंदी लागू करणार अशीही शक्यता आहे.  

========

हे देखील वाचा : व्लादिमीर पुतिन यांच्याबद्दलची बाबा वेंगाची ‘ही’ भविष्यवणी खरी झाली तर…

========

किशोरवयीन कार्यकर्त्याच्या रूपात राजकारणात आलेल्या जॉर्जिया मेलोनी 1998 ते 2002 या काळात रोम प्रांताच्या कौन्सिलर होत्या. यानंतर त्या युथ ॲक्शनच्या अध्यक्षा झाल्या. 2008 मध्ये, जॉर्जिया मेलोनी यांची बर्लुस्कोनी मंत्रिमंडळात युवा मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. 2018 च्या सार्वत्रिक निवडणुकीत मेलोनीच्या पक्षाला एकूण मतांपैकी फक्त 4 टक्के मते मिळाली होती. मात्र यावेळी त्यांनी बहुमत प्राप्त केले आहे.  

जॉर्जिया या मुसिलीनीच्या विचारांनी भारावलेल्या आहेत. बेनिटो मुसोलिनी हा इटलीचा सर्वात हुकूमशाही शासक मानला जातो. त्यानेच फॅसिझम सुरू केला आणि त्याच्या विरोधात बोलणाऱ्या लाखो लोकांना मारले. त्यांनी 1922 ते 1943 दरम्यान 20 वर्षे इटलीवर राज्य केले. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी हिटलरची बाजू घेतली. 1943 मध्ये मुसोलिनीला राजीनामा द्यावा लागला. त्याला अटक करण्यात आली. बंडखोरांनी मुसोलिनी आणि त्याची मैत्रीण क्लोरेटा यांची गोळ्या घालून हत्या केली.

मात्र आताची परिस्थिती वेगळी आहे, इटलीवर युरोपिय देशांनी दबाव आणला आहे. स्थलांतरितांमुळे इटलीची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे, अशावेळी कडक धोरणांचा स्विकार करायलाच हवाय या मतांवर जॉर्जिया ठाम आहेत. आता लवकरच त्या कशाप्रकारे आपल्या धोरणांची अंमलबजावणी करतात हे स्पष्ट होईल…

– सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.