मार्को पोलो या इटालियन प्रवाशाने आशिया खंडातील चीनपर्यंत प्रवास करून तिथल्या लोकजीवनाची उर्वरित जगाला ओळख करून देण्याचं महत्त्वाचे काम केलं. चीनमधील तत्कालीन शासक कुब्ला खान याचा विश्वास संपादन केल्यामुळे १७ वर्ष चीनमध्ये वास्तव्य करण्याची संधी त्याला मिळाली. या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन आशियाई भागातील निसर्ग, समाजजीवन, सांस्कृतिक जीवन व व्यापार यांविषयी त्याने बारीकसारीक माहिती मिळवली. या माहितीच्या आधारामुळे युरोपियनांचा आशियाई लोकांशी संवाद व व्यापार सुरू झाला, म्हणूनच जग जवळ येण्याच्या प्रक्रियेत मार्को पोलो या शोधक प्रवाशाचा महत्त्वाचा वाटा आहे.
मार्को पोलो चा जन्म इटली मधील व्हेनिस या शहरात इ.स. १२५४ मध्ये झाला. माकों पोलोचे वडील व काका व्यापारासाठी कॉन्स्टॅन्टिनोपालपर्यंत प्रवास करत असत. त्या काळी युरोपातील देश व आशियातील चीन, भारतादी देश यांच्यामध्ये खुश्कीच्या मार्गाने व्यापार चालत असे. काही काळ हा मार्ग बंद झाला होता, मात्र चंगेजखानचा नातू हुलागू खान याने बगदादमध्ये मंगोली सत्ता स्थापन केल्यानंतर हा मार्ग १२५८ च्या सुमारास पुन्हा खुला झाला होता.
त्याचा फायदा घेऊन निकोलो पोलो व माफिओ पोलो हे बंधू बुखारा या शहरापर्यंत पोहोचले. तिथे चीनचा सम्राट कुब्ला खानाच्या राजदूताशी त्यांची भेट झाली व त्याच्याबरोबर ते चीनला गेले. युरोपातून चीनमध्ये जाणारे ते पहिलेच व्यापारी होते. कुब्ला खानाचा काही काळ पाहुणचार घेऊन १२६९ मध्ये पोलो बंधू इटलीमध्ये परतले. कुब्ला खानने या बंधूंबरोबर पोपला देण्यासाठी एक पत्र दिलं होतं. त्यात शंभर ख्रिस्ती अभ्यासकांना चीनमध्ये पाठवण्याची त्याने विनंती केली होती.
मार्को पोलोचे वडील निकोलो पोलो चीनपर्यंतची भ्रमंती करून इटलीमध्ये परतले, तेव्हा मार्को पोलो १५ वर्षांचा झाला होता. त्याला घेऊन पोलो बंधू पुन्हा चीनच्या प्रवासाला निघाले. कुब्ला खानच्या विनंतीनुसार शंभर धर्मोपदेशकांची मात्र सोय झालेली नव्हती. इराणच्या आखातातून जलमार्गाने चीनला जाण्याचा त्यांचा विचार होता, परंतु जहाज मिळू न शकल्याने त्यांनी खुश्कीच्या मार्गाने जाण्याचा ठरवलं.
इराणची वाळवंट, अफगाणिस्तान, काश्मीर, पामीरचे पठार अशी मजल दरमजल करत गोबी वाळवंट पार करून १२७५ मध्ये पोलो बंधू मार्को पोलोसह चीनमधील शांगटू या शहरात दाखल झाले.
कुब्ला खानच वास्तव्य याच शहरात होतं.
मार्कों पोलो हुशार आणि चुणचुणीत होता. त्याची आकलनशक्ती व स्मरणशक्ती दांडगी होती. त्याने चीनमध्ये मंगोल भाषेचा अभ्यास केला. इतर तीन स्थानिक भाषाही आत्मसात केल्या. त्याची चौकस बुद्धी, भाषा ज्ञान, प्रवासात त्याने मिळालेली माहिती ज्ञान या गुणांचा कुब्ला खानावर प्रभाव पडला. १२७७ मध्ये कुब्ला खानाने मार्कों पोलोची नागरी सेवेत नेमणूक केली, ‘काराझान’ प्रांतातील महत्वाच्या सरकारी कामाची जबाबदारी त्याने मार्कों पोलोवर सोपवली. सहा महिने प्रवास करून मार्कों काराझान प्रांतात पोहचला. त्याच्यावर सोपवलेली कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडून माकों परतला. त्याने आपल्या प्रवासाचा व कामगिरीचा इत्थंभूत वृत्तांत कुब्ला खानला कथन केला, त्यातून खानला आपल्याच प्रदेशाची चांगली माहिती मिळाली. लवकरच माकों कुब्ला खानच्या खास मर्जीतला मानला जाऊ लागला.
माकों पोलो व पोलो बंधू १७ वर्ष चीनमध्ये राहिले. मार्को पोलोने या काळात आसपासच्या प्रदेशात केलेल्या प्रवासाची वर्णन लिहून ठेवली. या प्रदेशातील निसर्ग, प्राणी, पक्षी, चालीरीती, लोकजीवन याची माहिती माकोंने मिळवली व त्याच्या नोंदीही ठेवल्या. चीनमध्ये सतरा वर्ष काढल्यानंतर १२९२ मध्ये पोलो कुटुंब चीनमधून निघालं व १२९५ मध्ये व्हेनिसला येऊन पोहोचलं.
आपल्या या परतीच्या प्रवासात माकों पोलोने दक्षिण भारताच्या किनारपट्टीचा प्रवास केला, त्याच्या प्रवासवर्णनात दक्षिणेकडील किनारपट्टीप्रमाणेच काश्मीर प्रदेशाचीही वर्णन आढळत. त्यात गूढ विधीविषयी उल्लेखही आढळतो. दक्षिणेकडील मलबार प्रांतातील लोक व त्यांचे जीवन, तसेच, ब्रह्मदेशातील सोन्याच्या पत्र्यांनी मढविलेले उंच उंच पॅगोडे याचंही वर्णन माकों पोलोने केलं आहे.
व्हेनिसला परतल्यावर माकोंने विवाह केला. त्याच्या पत्नीचं नाव ‘दोनाता’ होतं. त्यांना तीन मुली झाल्या. १२९८ मध्ये व्हेनिस व जिनोआ या शहरांमध्ये युद्ध झालं. या युद्धात माकों पोलोला पकडण्यात आलं. जिनोआच्या तुरुंगात त्याला युद्धकैदी म्हणून ठेवण्यात आले.
त्या वेळी वेळ घालवण्यासाठी तो आपल्या प्रवासातील विस्मयकारक हकीकती सांगत असे. रुस्टीचेल्लो हा पिसा या शहरातील रहिवासी असलेला लेखक याच तुरुंगात कैदेत होता. मार्को पोलोच्या या प्रवासातील हकीकतींनी तो प्रभावित झाला. मार्क पोलो च्या रोजनिशी व नोंदी आपल्याला उपलब्ध करून देण्याचा आग्रह त्याने त्याच्याकडे धरला.
या नोंदीच्या आधारावर त्यानेच ‘डिस्क्रिप्शन ऑफ वर्ल्ड’ या नावाने माकों पोलोची प्रवासवर्णनं शब्दबद्ध केली. अल्प काळातच हे पुस्तक संपूर्ण युरोपमध्ये प्रसिद्ध झालं. हे पुस्तक मूळ लॅटिन, फ्रेंच की इटालियन भाषेतील आहे या संदर्भात वाद आहेत. अमेरिका खंडाचा शोध लावणारा दर्यावर्दी ख्रिस्तोफर कोलंबस याच्याकडे या पुस्तकाची एक लॅटिन भाषेतील प्रत होती, असंही म्हणतात. मात्र मार्कोच्या प्रवासवर्णनांबाबत काही प्रश्नही पडतात.
चीनमध्ये दीर्घकाळ वास्तव्य असूनही त्याच्या लिखाणात चीनच्या सुप्रसिद्ध भिंतीविषयी उल्लेख आढळत नाही. ‘चहा’ हे चिनी लोकांचं आवडतं पेय, पण त्याचाही उल्लेख त्याच्या प्रवासवर्णनात नाही. मात्र त्या काळात प्रवासाची फारशी साधनं उपलब्ध नसतानाही इतक्या दुरचा प्रवास करण्याचं धाडस मार्को पोलो, त्याचे वडील व काका यांनी केलं, हेच विशेष महत्त्वाचं आहे. परमुलखातील शासनकर्त्याची मैत्री संपादन केली. प्रवासातील माहितीच्या नोंदी ठेवण्याचं भान मार्को पोलोने दाखवलं. त्यामुळेच आशियाई देशांबाबतची मूलभूत माहिती युरोपातील लोकांना होऊ शकली. त्याचा लाभ पुढील काळात युरोपातील साहसी शोधकांना व दर्यावर्दींना झाला.
अशा या धाडसी शोधकाचा मृत्यू १३२४ साली झाला.
मार्को पोलोचा प्रवास :
(व्हेनिस ते चीन आणि पुन्हा व्हेनिस)
१. व्हेनिस २. अँक्रे ३. टॅबरीझ ४. होरमुझ ५. बाख ६. करांगर ७. शांगुटू बिजींग ८. पागन ९. यांगझाऊ १०. सुमात्रा ११. सिलोन १२. कॉन्स्टॅन्टिनोपाल
क फॅक्टस टीम