Home » रशियन शास्त्रज्ञानी जागा केला झोम्बी व्हायरस

रशियन शास्त्रज्ञानी जागा केला झोम्बी व्हायरस

by Team Gajawaja
0 comment
Zombie virus
Share

शास्त्रज्ञांचे काम काय असते.. सतत शोध घेणे, समाजाला उपयोगी होतील असे शोध घेणे, पण तिकडे रशियाच्या शास्त्रज्ञांनी नको तो शोध लावला आहे. त्याचा मानवजातीला फायदा होण्यापेक्षा मानवजातीला धोका निर्माण होईल अशीच शक्यता आहे. रशियाच्या शास्त्रज्ञांनी असाच शोध लावलाय. जवळपास 48 हजाराहून अधिक वर्ष जुना असलेला व्हायरसच शास्त्रज्ञांनी शोधून काढलाय. एवढी वर्ष बर्फाखाली दडून राहिलेल्या या व्हायरसला झोम्बी व्हायरस (Zombie virus) असं नाव दिलं आहे.  कारण 48 हजाराहून अधिक काळ हा व्हायरस जिवंत राहिला आहे.  आणि दुसरं म्हणजे त्यामुळेच हा व्हायरस कोरोनापेक्षाही जास्त भयानक आहे.  आधिच दोन वर्षापूर्वी आलेल्या कोरोनामुळे मानवी अस्तित्वच धोक्यात आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. आता कुठे कोरोना कमी झाल्याची जाणीव होत असतांनाच या झोम्बी व्हायरसमुळे पुन्हा मानवी जीवन धोक्यात येईल की काय अशी शंका व्यक्त होत आहे.   

रशियातील सायबेरिया या भागात 13 वेगवेगळे विषाणू आढळले आहेत.  हे सर्व विषाणू अतिशय धोकादायक आहेत.  यातील एक विषाणू तर 48 हजार 500 वर्षे जुना आहे.  इतकी वर्ष हा विषाणू बर्फाखाली जिवंत होता, म्हणूनच त्याला धोकादायक मानले गेलं आहे.  शास्त्रज्ञांनी या व्हायरसला झोम्बी व्हायरस (Zombie virus) असे नाव दिले आहे. शास्त्रज्ञांच्या मतानुसार कोरोनापेक्षाही या व्हायरसची क्षमता अधिक असू शकते.  या संबंधीचे संशोधन रशियाच्या लॅबतर्फे प्रकाशित करण्यात आले आहे.  या विषाणूला शोधण्यासाठी रशिया, फ्रान्स आणि जर्मनीच्या शास्त्रज्ञांची एक टीम काम करत होती.  या टीमनं बर्फाखाली दडलेले एकूण 13 व्हायरस शोधून काढले.  हे सर्वच धोकादायक असले तरी त्यात 48 हजार वर्षाहून अधिक जुना असलेला झोम्बी व्हायरस अधिक धोकादायक असल्याची जाणीव त्यांना झाली आहे.  

गेली हजारो वर्ष बर्फाच्या सरोवरात पुरलेला हा विषाणू अमिबा सूक्ष्मजंतूंना संक्रमित करण्यास सक्षम असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. अशा पद्धतीनं झोम्बी व्हायरस (Zombie virus) पुन्हा सक्रीय झाल्यास त्याचे संक्रमण अत्यंत वेगानं होऊ शकते.  अगदी वातावरणातही हा व्हायरस लगेच पसरु शकतो आणि मानवाबरोबर प्राण्यांनाही संक्रमित करु शकतो.  

या व्हायरस संदर्भात प्रकाशित झालेल्या संशोधनात हा व्हायरस पर्यावरणातील बदलांमुळे मिळाल्याचे म्हणण्यात आले आहे.   हवामानातील बदल आणि वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमनद्या आणि बर्फ सतत वितळत आहेत. त्यामुळे त्यांच्या आत गाडलेले मिथेनसारखे हरितगृह वायू बाहेर पडत आहेत.  त्यामुळे हवामानात वेगाने बदल होत आहेत.  या सर्वामुळे बर्फामध्ये कित्येक वर्ष गाडलेले विषाणुही बाहेर पडत आहेत.  रशियातील सायबेरिया हा सर्वाधिक थंड असलेला प्रदेश मानण्यात येतो.  पण या सायबेरियामधील बर्फ वेगाने वितळत आहे. त्यामुळे सायबेरियात व्हायरस संसर्गाचा धोका सर्वात अधिक आहे.  

======

हे देखील वाचा : गौतम अदानी यांनी जिंकली धारावी झोपडपट्टीची बोली

=====

कोरोना व्हायरसच्या कहरातून जग अद्याप बाहेर आलेले नाही.  त्याचवेळी झोम्बी सारखे व्हायरस पुढे आले तर मानवी जीवनाला त्यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो.  जागतिक तापमानवाढीमुळे बर्फाचा वर्षानुवर्ष साठलेला थर वितळण्याच्या घटनेमुळे सुमारे दोन डझन विषाणू पुन्हा जिवंत झाल्याचा दावा केला जात आहे. तलावाखाली 48,500 वर्षांहून अधिक काळ बर्फात गोठलेला झोम्बी विषाणूही जिवंत झाल्याचा दावा केला जात आहे. 

ग्लोबल वॉर्मिंगमुळे गोठलेला बर्फ वितळण्याची प्रक्रीया अधिक वेगानं सुरु झाली आहे.  वातावरणातील बदलामुळे जमिनीत गाडलेले मिथेन विघटित होईल, त्याचा परिणाम हरितगृहावर होईल.  यासर्वांचा परिणाम म्हणजे, नवीन घातक रोगांच्या साथी येऊ शकतील असा धोका आहे.  या सर्वांवर मात करायची असेल तर वृक्षसंवर्धनावर भर द्यावा लागेल.  कोरोनाच्या महामारीनं जगाला हादरवलं होतं.  आता कुठल्याही नव्या रोगाचा फैलाव झाल्यास त्याचा परिणाम काय होईल याचा विचारही करता येत नाही. त्यामुळेच या झोम्बी व्हायरसला वेळीच रोखण्यावर आता शास्त्रज्ञ शोध घेत आहेत.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.