जगभरात अनेक ठिकाणी बदलत्या हवामानामुळे जनजीवन त्रस्त झाले आहे. काही देशांमध्ये वादळी पावसानं आलेल्या पूरामुळे मोठे नुकसान झाले आहे. तर काही देशांमध्ये उष्णतेने अनेक वर्षांचे रेकॉर्ड मोडले आहेत. उन्हाळ्याच्या झळांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. यासोबत काही देशात तुफानी बर्फवृष्टी होत आहे. जिथे बर्फवृष्टी होते, तो भाग उन्हाच्या झळांनी व्यापून गेला आहे. जगभर बदलत असलेल्या या हवामानाचा हवामानतज्ञांनी अभ्यास केल्यावर धक्कादायक अहवाल तयार झाला आहे. या अहवालानुसार आगामी 20 वर्षात जागतिक हवामानाचा नकाशा बदलणार आहे. जिथे नद्या आहेत, तो भाग कोरडा पडणार आहे. तर वाळवंटी भागात पूरजन्य परिस्थिती रहाणार आहे. हा हवामान बदल होत असतांना त्याचे मानवी जीवनावरही व्यापक परिणाम होणार आहेत. (World Climate)
पुढील 20 वर्षांत होणा-या या हवामान बदलांचा फटका जगातील एक तृतीयांश लोकसंख्येला बसणार असल्याचे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. जगभरातील देशांमध्ये सध्या हवामानाचे तंत्र बदलले आहे. पावसासह येणा-या वादळांचे प्रमाण वाढले आहे. सध्या चीनमध्ये प्रलयकारी वादळ सुरु आहे. अशाच येणा-या वादळांची संख्या भविष्यात वाढण्याचा धोका वर्तवण्यात आला आहे. पुढील दोन दशकांमध्ये हे बदल मोठ्या प्रमाणात होणार आहे. यामुळे जगातील अनेक देशांमध्ये पाण्याचे स्त्रोत आटतील तर काही देशात नको एवढा पाऊस होऊन जनजीवनाला मोठा फटका बसणार आहे. या सर्व हवामान बदलाच्या चक्रात मनुष्याची मोठी हानी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. (World Climate)
नॉर्वेच्या सेंटर फॉर इंटरनॅशनल क्लायमेट रिसर्चतर्फे गेली अनेक वर्ष जागतिक हवामानाचे बदल नोंदवण्यात येत आहेत. यासाठी या संस्थेतर्फे अनेक संशोधकांनी जगभर दौराही केला आहे. त्यातून निघालेला निष्कर्ष धक्कादायक आहे. या संस्थेचे संशोधक ब्योर्न सॅमसेट यांनी या अहवाले विश्लेषण केले आहे. त्यानुसार जागतिक हवामानात पुढील 20 वर्षात मोठे बदल होणार आहेत. याचा परिणाम 1.5 अब्ज लोकांवर होणार आहे. हे हवामान बदल धोकादायक असणार आहे. पृथ्वीच्या 70 टक्के लोकसंख्येवर त्याचा परिणाम होईल, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. या संशोधकांच्या म्हणण्यानुसार, पृथ्वीवर हवामानासंदर्भात दोन टोकाच्या घटना झाल्या आहेत. पृथ्वीने नुकताच उत्तर गोलार्धातील सर्वात उष्ण उन्हाळा अनुभवला आहे. सोबत दक्षिण गोलार्धातही विक्रमी उष्ण हिवाळा जाणवत आहे. (World Climate)
जागतिक तापमानात झालेल्या या वाढीमुळे प्राणघातक आग, पूर, वादळ आणि दुष्काळ, पिकांची नासधूस आणि मोठ्या प्रमाणावर दुष्काळ निर्माण झाला आहे. जंगलांना मोठ्या प्रमाणात आग लागत आहे. तसेच ज्वालामुखीच्या स्फोटांचे प्रमाणही भविष्यात वाढणार आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात येणा-या लाव्हामुळे हवामानात आणखी झपाट्यानं बदल होणार आहे. याशिवाय अंटार्कटिका मधील बर्फाची घनाताही कमी होत आहे. हा बर्फ वितळत असल्यामुळे समुद्राच्या पाण्याचीवाढती पातळी वाढत असल्याचे दृष्य पुढच्या 20 वर्षात कायम रहाणार असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.
यासर्वांसाठी सेंटर फॉर इंटरनॅशनल क्लायमेट रिसर्चतर्फे एक मॉडेलही तयार करण्यात आले आहे. त्यावरुन हवामानाचा बदल पुढच्या 20 वर्षात कसा असेल हे सांगण्यात आले आहे. (World Climate)
======
हे देखील वाचा : समुद्राच्या पोटात समावणार मालदीव
======
या संस्थेनं भविष्यात हवामानातील तीव्र बदल पूर्वीपेक्षा अधिक वेगाने होणार असल्याचे सांगितले आहे. 2022 मध्ये, तीव्र उष्णतेच्या लाटेनंतर पाकिस्तानमध्ये मोठा पूर आला होता. या घटना आता जगभरातील अनेक देशांमध्ये होणार असल्याचा या संस्थेचा अंदाज आहे. मक्का मदिना येथेही मुसळधार पाऊस पडला आणि मोठा पूर आला. ही घटना विलक्षण मानली गेली. मात्र ही भविष्यातील हवामान बदलाची एक झलक होती. कदाचित पुढच्या काही वर्षात या भागत पाऊस सातत्यानं पडणार आहे. त्यामुळे जे वाळवंटी भाग आहेत, तिथे हिरवळ येणार असून सुपिक भागात वाळवंटी परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. या अहवालात सांगितलेल्या सर्वात मोठा मुद्दा म्हणजे, मानवावर होणारा याचा परिणाम. उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय प्रदेशात हे बदल अधिक जाणवणार आहेत. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होईल, असेही सांगण्यात आले आहे. (World Climate)
सई बने