दिवाळी आली, साजरी झाली आणि संपायलाही आली. पण या दिवाळीत असणारी थंडी गेली कुठे हा आत्ताचा सर्वात मोठा प्रश्न आहे. दिवाळीत पहिली अंघोळ ही पहाटे उटणं लावून केली जाते. नेहमी थंडीमुळे हे उटणं लावून घेणं नकोस होतं. पण यावेळी सगळं उलटं झालं आहे. पहिल्या अंघोळीला थंडीचा गारवा नव्हता, उलट घामाच्या धारा लागल्या होत्या. हाच प्रकार लक्ष्मीपूजन आणि पाडवा साजरा करतांना झाला. नोव्हेंबरमध्ये येणारी थंडी यावेळी गायब झाली आहे. त्यात फटाक्यांमुळे अधिक उष्मा वाढला आहे. या सर्वांमुळे पंखा, एसीसह दिवाळी साजरी करावी लागली. ही थंडी येणार तरी कधी हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मात्र भारतीय हवामान विभागानं सर्वांनाच जरा सबुरीचा सल्ला दिला आहे. हवामान बदलाचे परिणाम असून थंडी या महिन्यात अर्थात नोव्हेंबर पर्यंत दूरच रहाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. डिसेंबरमध्ये थंडी पडेल आणि ती थंडी जानेवारी, फ्रेब्रुवारी महिन्यातही काही दिवस असेल, अशीही माहिती देण्यात आली आहे. (Winter Season)
भारतात थंडीच्या ऋतुची सर्व वाट बघत असतात. कारण हा ऋतु म्हणजे, निसर्गाला बहर आणणारा ऋतू असतो. सर्वत्र फुलापानांनी वृक्षराई संपन्न होऊन जाते. खाण्यापिण्याची चंगळही याच थंडीच्या ऋतुमध्ये असते. मात्र यावेळी नोव्हेंबर महिना सुरु झाला तरी थंडीची चाहूल काही लागलेली नाही. थंडीसाठी लागणा-या गरम कपड्यांची दुकाने रस्तोरस्ती सजली आहेत, मात्र सध्या कपड्यातही घामाच्या धारा लागत असल्यामुळे या दुकानांकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. दिवाळीत थंडीची उणीव सर्वांनाच भासली. अगदी एक मिनिटीही पंखा बंद केला तर जिवाची काहली होत आहे, यामुळेच थंडी गेली कुठे हा प्रश्न विचारण्यात येत आहे. या सर्वांवर भारतीय हवामान खात्यांनं दिलेल्या माहितीमुळे थंडीची प्रतीक्षा करणा-यांमध्ये नाराजी पसरली आहे. कारण या नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस वातावरणात थोडी घट होईल, अशी माहिती देण्यात आली आहे. (National News)
पण त्याआधीसंपूर्ण नोव्हेंबर महिन्यात उष्णतेच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. याआधी गेलेला ऑक्टोबर महिना हा भारतातील 1901 नंतरचा सर्वात उष्ण ठरला आहे. या महिन्यात सरासरी तापमान 1.23 अंश सेल्सिअसने जास्त नोंदवले गेले. भारतीय हवामान विभागाने यासाठी बदलत्या जागतिक हवामानाचा परिणाम असल्याचे सांगितले आहे. बंगालच्या उपसागरातील सक्रिय कमी दाब प्रणालीच्या अनुपस्थितीमुळे पूर्वेकडील वारे उष्ण आणि अतीउष्ण होत आहेत. त्यामुळेच ऑक्टोबरमध्ये सरासरी तापमान 26.92 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हे तापमान 1901 नंतरचे सर्वात उष्ण तापमान ठरले. संपूर्ण देशात 20.01 अंश सेल्सिअसच्या सामान्य तापमानाच्या तुलनेत किमान तापमान 21.85 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. वायव्य भारतातील तापमान कमी करण्यासाठी उत्तर-पश्चिमी वाऱ्यांची गरज असते. त्यातच यावळेचे मान्सून लांबल्यामुळे या उत्तर-पश्चिमी वा-यांची अद्यापही प्रतीक्षा करावी लागत आहे. (Winter Season)
======
हे देखील वाचा : सकाळी लवकर उठण्याचे फायदे
====
या सर्वांचा परिणाम म्हणून मान्सूनचा प्रवाहही दिसून आला आहे, जो तापमान कमी होऊ देत नाही. भारताच्या उत्तर-पश्चिम मैदानी भागात किमान पुढील दोन आठवडे तापमान सामान्यपेक्षा 2-5 अंशांनी जास्त राहील. त्यानंतर तापमान कमी होण्यास सुरुवात होईल. भारताच्या उत्तर भागात कडाक्याची थंडी पडायला लागली की आपल्या महाराष्ट्रात दहा ते पंधरा दिवसांनी त्याचा परिणाम दिसून येतो. त्यामुळे आपल्याकडे थंडी येण्यासाठी डिसेंबरचा पहिला आठवडा तरी वाट पहावी लागणार आहे. थंडी उशीरा सुरु झाल्यानं जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातही तिचा प्रभाव रहाणार आहे. भारताच्या काही भागात अद्यापही पाऊस पडत आहे. त्यामुळेही थंडीवर परिणार झाला आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल, किनारी आंध्र प्रदेश, कर्नाटकमध्ये नोव्हेंबरमध्येही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. या मान्सून वा-यांमुळेही थंडीचा मौसम काही दिवस पुढे गेला आहे. या सर्वात भर पडली आहे ती हवेच्या प्रदुषणाची. भारताच्या राजधानीत, दिल्लीमध्ये AQI देखील 400 च्या आसपास पोहोचला असून तो अत्यंत धोकादायक मानला जातो. भारताच्या मुख्य शहरातही हवेचा दर्जा अतिशय खराब झाला आहे. या सर्वांचा परिणाम थंडीवर झाला आहे. (National News)
सई बने