Home » इराणने इस्राइलवर हल्ला का केला?

इराणने इस्राइलवर हल्ला का केला?

by Team Gajawaja
0 comment
Iran VS Israel
Share

१ ऑक्टोबर २०२४ ची रात्र, इस्रायलच्या आभाळात अनेक आगीचे गोळे इराणच्या दिशेहून येताना दिसले. हे आगीचे गोळे म्हणजे मिससाईल्स, जे की एक-दोन नाही, तर तब्बल २०० होते, जे इस्रायलची राजधानी तेल अविवच्या दिशेने येत होते. संपूर्ण शहरात मोठं मोठ्याने सायरन वाजू लागले. लोकांना वाचवण्यासाठी बंकरमध्ये हलवण्यात आलं. काही जण म्हणताय, ही आहे तिसऱ्या महायुद्धाची नांदी. तर काहींच म्हणण आहे, इराणने इस्राइलवर मिसाईल्स डागून मोठी चूक केली. इराणने इस्राइलवर हल्ला का केला? एकेकाळी मित्र असणारे हे दोन देश एकमेकांचे कट्टर शत्रू कसे झाले? संपूर्ण माहिती जाणून घेऊया. (Iran VS Israel)

वर्षाभरापूर्वी इस्राइलने हमास आणि हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांशी युद्ध सुरू केलं होतं. हे युद्ध त्यांना पूर्णपणे संपवल्यावरच थांबेल अशी घोषणा सुद्धा इस्राइलने केली होती. त्याच्या बातम्या सोशल मीडिया आणि न्यूज चॅनेलमार्फत आपण बघत होतो. त्यात २७ सप्टेंबर २०२४ ला एक बातमी समोर आली, इस्राइलच्या हल्ल्यात हिजबुल्ला प्रमुख हसन नसरल्ला याचा मृत्यू. इस्राइलने हमास आणि हिजबुल्ला या दहशतवादी संघटनांच्या विरुद्ध जेव्हा युद्ध सुरू केलं होतं, तेव्हा हिजबुल्लाला आर्थिक आणि लष्करी पाठबळ हे इराण कडून मिळत होतं आणि ते हिजबुल्ला निर्माण झाल्यापासून मिळतं आहे. हिजबुल्लाच्या प्रमुखाला इस्राइलने मारल्यामुळे इराणने इस्राइलवर हा मिससाईल हल्ला केला. थोडक्यात, दोन देशांमधील युद्धाला सुरुवात केली. (International News)

१९४८ साली जेव्हा ब्रिटनने या पॅलेस्टाईन प्रदेशातून आपल्या वसाहती मागे घेतल्या, तेव्हा १४ मे १९४८ साली इस्रायल हा देश निर्माण झाला. आजूबाजूला इस्लामिक राष्ट्र असताना मधोमध २००० वर्षांत पहिल्यांदाच पूर्णपणे ज्यूंचा देश अस्तित्वात आला होता. म्हणून आजूबाजूच्या मुस्लिम देशांनी इस्रायलला देश म्हणून मान्यता देण्यास नकार दिला. त्यावेळी फक्त इस्रायलचे इराणशी घनिष्ठ संबंध जोडले गेले. ते शाह, मोहम्मद रझा यांच्या नेतृत्वाखाली इराण इस्राइलचे मित्रराष्ट्र बनले. इस्राइलने शस्त्रं, तंत्रज्ञान आणि कृषी उत्पादनांच्या बदल्यात ४० टक्के तेल इराणमधून आयात केलं. इस्रायलच्या मोसाद या गुप्तहेर संस्थेने शाह यांच्या गुप्त पोलिसांना प्रशिक्षण देण्यात मदत केली. मैत्रीपूर्ण सुरू असलेली ही देवाण घेवाण १९७९ ला संपुष्टात आली. (Iran VS Israel)

======

हे देखील वाचा : हमजाची दहशत आणि पुन्हा अमेरिकेवर हल्ल्याची छाया

======

इराणमध्ये १९७९ मध्ये झालेल्या इस्लामी क्रांतीनंतर शहा यांना सत्तेवरून हटवण्यात आले आणि अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांच्या नेतृत्वाखाली इस्लामी प्रजासत्ताकाची स्थापना करण्यात आली. सत्तेत आल्यानंतर त्यांनी इस्रायलला ‘शैतानी राष्ट्र’ म्हंटलं. म्हणजेच थोडक्यात इराणने इस्रायलविरोधी आपली भूमिका स्पष्ट केली. इराण आणि इस्राइल यांच्यात कधी प्रत्येक्ष युद्ध झालं नसलं तरी अप्रत्येक्षपणे ते अनेकवेळा एकमेकांसमोर उभे ठाकलेच आहेत. शिवाय इस्रायलवर इराण डायरेक्ट हल्ला न करता हिजबुल्लाच्या मदतीने करतो. आता तर दोन्ही देश पहिल्यांदाच थेट युद्धात उतरतील. इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे या मिससाईल हल्ल्यावर म्हणाले की,”इराणने मोठी चूक केली आहे आणि त्याची किंमत त्याला मोजावी लागेल.” आता हा संघर्ष देश आणि दहशतवादी संघटनांमधील न राहता, इस्राइल विरुद्ध इराण असं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच या दोन्ही देशांमध्ये युद्ध पेटणार एवढं निश्चित आहे. (International News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.