Home » देवाच्या मिरवणुकीसाठी विमानतळ का बंद करतात?

देवाच्या मिरवणुकीसाठी विमानतळ का बंद करतात?

by Team Gajawaja
0 comment
Padmanabha Swamy Temple
Share

केरळची राजधानी तिरुअनंतपुरम मधील पद्मनाभस्वामी मंदिर हे जगभारात प्रसिद्ध आहे.  श्री पद्मनाथ स्वामी मंदिर (Padmanabha Swamy Temple) हे भगवान विष्णूचे मंदिर आहे. हे मंदिर केरळ आणि द्रविड स्थापत्य शैलीचे एक अद्वितीय उदाहरण असून जगातील सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून मंदिराची ओळख आहे.  त्यासोबत येथील अनेक परंपराही अनोख्या आहेत.  पद्मनाभ स्वामी मंदिरात अनेक रहस्य दडलेली असल्याचा विश्वास भक्तांना आहे.  भगवान विष्णुचे अत्यंत जागृत स्थान असलेल्या या मंदिराच्या बांधणीबाबतही अनेक कथा सांगितल्या जातात.  सुमारे पाच हजार वर्षापूर्वी हे मंदिर उभारले असून त्याचा पुराणातही दाखला आहे.  या मंदिराच्या अनोख्या प्रथांपैकी एक प्रथा म्हणजे देवाची मिरवणूक आणि त्यानिमित्तानं बंद होणारा तिरुअनंतपुरम विमानतळाचा हवाईमार्ग.  वर्षातून दोनवेळा देवाच्या मिरवणुकीसाठी तिरुअनंतपुरम विमानतळाचा हवाईमार्ग बंद केला जातो.  सुमारे पाचहजार वर्षापासून ही मिरवणुकीची परंपरा आहे, आणि त्यासाठी ठराविक मार्ग अवलंबिला जातो.   त्या मार्गावर कालांतराने विमानतळ झाले, पण देवाची मिरवणूक असल्यावर हे विमानतळच पाच तासांसाठी बंद करण्यात येते आणि देवाला त्याच्या जागेचा मान देण्यात येतो.  

पद्मनाभ स्वामी मंदिर (Padmanabha Swamy Temple) हे प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे.  स्कंद पुराण आणि पद्म पुराण यांसारख्या महाकाव्यांमध्येही या मंदिराचा उल्लेख आहे.  शेषशायी विष्णूचे हे पुरातन मंदिर आहे. सहाव्या ते नवव्या शतकातील तमिळ संतांच्या साहित्यांत या मंदिराचा उल्लेख आढळतो. वैष्णवांच्या पवित्र स्थानांपैकी हे एक महत्त्वाचे स्थान आहे. या मंदिराच्या अनेक परंपरा आहेत आणि त्या परंपरा आजही तेवढ्याच भक्तीभावाने साज-या केल्या जातात.  त्यापैकीच देवीची मिरवणूक काढण्याचीही परंपरा आहे.  ही मिरवणूक वर्षातून दोन वेळा काढली आते.  आणि काही हजार वर्षापूर्वी ज्या मार्गावरुन ती मिरवणूक जात होती, त्याच मार्गावरुनही ती आजही जात आहे.  

या मिरवणुकीच्या मार्गावर आता तिरुअनंतपुरमचे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.  हे विमानतळ देशातील व्यस्त विमानतळांपैकीच एक असे मानण्यात येते.  मात्र देवाच्या मिरवणुकीसाठी हे विमानतळ वर्षातून दोन वेळा पाच तास पूर्णपणे बंद करण्यात येते.  या काळात या विमानतळावर कोणतेही विमान उतरत नाही किंवा कोणतेही विमान उड्डान करीत नाही.  आजही हे तिरुअनंतपुरमचे आंतरराष्ट्रीय विमानतळ सायंकाळी चार वाजता बंद करण्यात येणार आहे.  ते रात्री नऊ वाजेपर्यंत विमानतळ बंदच असेल.  पद्मनाभ स्वामींच्या (Padmanabha Swamy Temple) मिरवणुकीची ही परंपरा 5000 हजार वर्षापासूनची असल्याचे सांगण्यात येते.  अगदी दोन वर्षापूर्वी कोरोनाचे सावट असतांनाही ही मिरवणुकीची परंपरा खंडित झाली नव्हती.  

वर्षभरात मार्च-एप्रिल महिन्यात एकदा ही मिरवणूक होते आणि  ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ही दुसरी मिरवणूक होते.   भगवान विष्णूंना श्री पद्मनाभ स्वामी मंदिरातून (Padmanabha Swamy Temple) सजवलेल्या पालखीतून आणण्यात येते. विमानतळाच्या अगदी शेजारी असलेल्या शंघमुघम समुद्रकिना-यावर भगवान विष्णूंना विधीवत स्नान करण्यात येते. आणि पुन्हा ही मिरवणूक मार्गस्थ होते.  

तिरुअनंतपुरमचे आंतरराष्ट्रीय विमानतळ 1932 साली बांधण्यात आले. याच मार्गावरुन भगवान विष्णुंची मिरवणूक काढण्यात  येत होती.  विमानतळाला मिरवणुकीची जागा देतांना मिरवणुकीत कोणताही खंड पडणार नाही ही अट प्रामुख्यानं घालण्यात आली होती.  या मिरवणुकीत भगवान विष्णुसोबत त्रावणकोर राजघराण्याचे सदस्य आणि श्री पद्मनाभ स्वामी मंदिराचे कर्मचारी,  आणि मोठ्या संख्येने भक्त उपस्थित असतात.   तसेच हत्ती, सजवलेल्या मोठ्या छत्र्या, पोलिसांचा बँड, ढोल, ताशांच्या पथकाचाही समावेश असतो.  ही मिरवणूक सायंकाळी साडेपाच वाजता तिरुअनंतपुरम विमानतळावर दाखल होईल आणि देवाच्या पवित्र स्नानानंतर रात्री आठच्या सुमारास त्याच मार्गाने परत मंदिरापर्यंत जाईल.  

========

हे देखील वाचा : घरात हनुमानाचा फोटो लावत असाल तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

========

श्री पद्मनाभ स्वामी मंदिराचा (Padmanabha Swamy Temple) इतिहास आठव्या शतकातील आहे. हे विष्णूच्या 108 पवित्र मंदिरांपैकी एक मंदिर आहे. त्रावणकोरचा प्रसिद्ध राजा मार्तंड वर्मा यांनी या मंदिराची पुनर्बांधणी केली.  मार्तंड वर्मा यांनीच या मंदिरात मुर्जापम आणि भाद्र दीपम उत्सव सुरू केले. या मंदिरात मुराजापम, म्हणजे प्रार्थनेचा जप अजूनही सहा वर्षांतून एकदा केला जातो.  1750 मध्ये, मार्तंड वर्माने त्रावणकोरचे राज्य भगवान पद्मनाभ यांना समर्पित केले.  तेव्हापासून त्रावणकोरचे  राजे त्यांच्या नावापुढे पद्मनाभ दास असे संबोधन लावतात.   मंदिराचा कारभार आता त्रावणकोर राजघराण्याच्या नेतृत्वाखालील स्थापन केलेल्या ट्रस्टद्वारे चालवला जातो.  आताही काढण्यात येणा-या मिरवणुकीतमध्ये देवाची पालखी उचलण्याचा मान राजघराण्याला असतो.  गेल्या पाच हजार वर्षापूर्वीच्या परंपरा त्याच भक्तीभावानं साज-या होणा-या या पद्मनाभस्वामी मंदिराची लोकप्रियता म्हणूनच सर्वाधिक आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.