शुक्रवारचा दिवस उगवला तोच जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे (Shinzo Abe) यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याची बातमी घेऊन. जपानमधल्या ‘नारा’ या शहरात आबेंवर हा हल्ला झाला. रेल्वे स्टेशनच्या परिसरात भाषण करत असताना त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला. हल्ल्यानंतर तातडीने आबेंवर उपचार करण्यात आले तरी त्यांचे प्राण वाचले नाहीत.
शिंजो आबे (Shinzo Abe) यांच्या हत्येनंतर जगभरातल्या देशांच्या आजी-माजी पंतप्रधान, राष्ट्राध्यक्षांकडून दुःख व्यक्त करण्यात येतंय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ब्लॉगवरुन शिंजो आबे यांच्या आठवणींना उजाळा दिलाय.
शिंजो आबे Shinzo Abe) हे जपानच्या ‘लिबरल डेमोक्रॅटिक’ पक्षाचे नेते होते. जपानच्या इतिहासात सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवलेले व्यक्ती म्हणून आबे यांचा लौकिक होता. २००६ मध्ये ते सगळ्यात पहिल्यांदा जपानचे पंतप्रधान झाले. पहिल्या टर्ममध्ये ते २००७ पर्यंत पंतप्रधानपदावर होते. त्यानंतर २०१२ ते २०१४ अशी पंतप्रधान पदाची दुहरी टर्म त्यांनी पूर्ण केली.
२०१४ ते २०१७ आणि २०१७ ते २०२० त्यांनी जपानचे पंतप्रधान म्हणून काम केलं. २०२० मध्ये प्रकृतीच्या तक्रारीमुळे त्यांनी पंतप्रधानपदावरुन पायऊतार होण्याचा निर्णय घेतला. तरी, जपानच्या इतिहासात सर्वाधिक काळ पंतप्रधान म्हणून कार्यरत राहण्याचा मान शिंजो आबे यांनी मिळवलाच!
शिंजो आबे (Shinzo Abe) यांच्या कुटूंब राजकारणातच कार्यरत होतं. त्यांचे वडिल ‘शिंतारो आबे’ हे जपानचे माजी परराष्ट्र मंत्री होते. ‘नोबुसुके किशी’ हे त्यांचे आजोबा जपानचे माजी पंतप्रधान होते. कॅलिफोर्निया युनिवर्सिटीतून शिक्षण घेतल्यानंतर शिंजो आबे यांनी एका स्टील कंपनीत नोकरी केली. त्यानंतर राजकारणात प्रवेश केलेल्या आबे यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही.
जपानच्या राजकारण आणि समाजकारणात पंतप्रधान म्हणून त्यांनी ठसा उमटवला. जपानच्या आर्थिक धोरणांमध्ये त्यांनी प्रयत्नपूर्वक बदल केले. या बदलांची आबेनॉमिक्स अशी विशेष ओळख आहे. जपानची एक आक्रमक राष्ट्र अशी प्रतिमा निर्माण करण्याबाबत ते प्रयत्नशिल होते. देशाच्या वाटचालीत महिलांचा सहभाग ठळक असावा म्हणून त्यांनी पावलं उचलली. भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यांच्या – द क्वॉड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग – क्वॉड संघटनेला नवसंजीवनी देण्यात शिंझो आबे यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीचं एक वैशिष्ट्य आहे.
====
हे देखील वाचा – नासामध्ये संधी मिळत असूनही ‘ते’ केवळ देशासाठी इस्रोमध्ये काम करत राहिले…
====
भारत आणि जपान यांच्या मैत्रीच्या अध्यायात शिंजो आबे (Shinzo Abe) यांचं योगदान महत्त्वाचं होतं. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, भारतातील मेट्रोपोलिटन शहरांमध्ये उभे राहत असलेले मेट्रो रेल्वे प्रकल्प यांमध्ये शिंजो आबे यांनी भारताला सक्रीय मदत केली होती. शिंजो आबे यांच्या कार्यकाळात भारत जपान मैत्रीचा सूवर्णकाळ प्रस्थापित झाला. डॉ. मनमोहन सिंह यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत सुरु झालेले हे द्विराष्ट्र संबंध नरेंद्र मोदी आणि आबे यांच्या परस्पर मैत्रीतून वेगळ्या उंचीवर गेले.
२००७ मध्ये भारताच्या लोकसभेत उपस्थित राहून शिंजो आबे (Shinzo Abe) यांनी कॉन्फ्लुएन्स ऑफ टू सीज – दोन समुद्रांचा संगम हे भाषण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर गंगा आरतीमध्ये सहभाग असो की, २०१४ च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याला आबे यांची उपस्थिती, भारत जपान संबंधांचा चढता आलेखच या निमित्ताने पहायला मिळाला. २०२१ मध्ये भारत सरकारने शिंजो आबे यांना पद्मविभूषण हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करत या मैत्रीवर मोहोर उमटवली.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ट्विटरवर शिंझो आबे यांनी अमेरिका आणि जपान यांच्यातील संबंधांसाठी केलेल्या प्रयत्नांचं स्मरण केलंय. शिंजो आबे यांच्याबरोबर हिरोशिमा आणि पर्ल हार्बरला दिलेल्या भेटींबाबत हृद्य आठवणही ओबामांनी जागवली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेनही या कठीण काळात अमेरिका जपानच्या बरोबर असल्याचं ट्विटरवर म्हणतात. शिंजो आबे यांच्या निधनाने आपण अत्यंत जवळचा मित्र आणि जागतिक पटलावरील महत्त्वाचा मुत्सद्दी राजकारणी गमावल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे.