भारतीय पदार्थांचे चाहते हे जगभर आहेत. शाही पनीर, बिर्याणी, दालखिचडी, डालबाटी, कोफ्ताकरी, कुर्माभाजी, पनीर पकोडा अशी ही लांबलचक यादी आहे. आज अमेरिका, इंग्लडसारख्या देशात अनेक भारतीय हॉटेल असून त्यामध्ये परदेशी नागरिकही भारतीय पदार्थांची चव चाखतांना दिसतात. या सर्वात एका पदार्थाला मोठी मागणी असते, तो म्हणजे, बटर चिकन. बोनलेस चिकनचे मसाल्याच मुरवलेले तुकडे तंदूरमध्ये हलकेशे भाजले जातात. मग त्याला टोमॅटो आणि मसाल्यांचा वापर करुन केलेल्या करीमध्ये परतले जाते. वरुन भरपूर बटर टाकले जाते. ही डिश अशी आहे, की त्याची करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. पण या सर्वांतून तयार होणारे बटर चिकन हे जगातील सर्वाधिक पसंतीचे ठरले आहे. (Butter Chicken)
असे असतांना आता हे बटर चिकन नेमके कोणी शोधले, हा पदार्थ पहिल्यांदा कोणी केला यावरुन वाद उभा राहिला आहे. बटर चिकनच्या शोधावरून दिल्लीमधील मोती महल आणि दर्यागंज या दोन प्रसिद्ध रेस्टॉरंट चेनमध्ये वाद सुरु झाला आहे. हा वाद दिल्ली उच्च न्यायालयापर्यंत पोहचला आहे. जगातील सर्वात लज्जतदार पदार्थ म्हणून बटर चिकनला पसंती दिली जाते. पण हेच बटर चिकन नेमके कुणी पहिल्यांदा केले यावरच वाद सुरु झाला आहे. भारतातील दिल्लीमध्ये सुरु झालेल्या या वादात आता शेजारील पाकिस्ताननंही उडी मारली आहे. त्यामुळे बटर चिकनच्या चवीसारखाच त्याच्यावर मालकी हक्क कोणाचा हा वादही लज्जतदार झाला आहे. (Butter Chicken)
दिल्लीच्या मोती महल या प्रसिद्ध हॉटलचा दावा आहे की, बटर चिकनचा शोध 1920 मध्ये त्यांचे संस्थापक कुंदनलाल गुजराल यांनी लावला होता. त्याच वेळी, दर्यागंज रेस्टॉरंट्सचे म्हणणे आहे की बटर चिकनचा शोध त्यांचे संस्थापक कुंदनलाल जग्गी यांनी लावला होता. दर्यागंज रेस्टॉरंट्स ‘बटर चिकन आणि दाल मखानीचा शोधकर्ता’ अशी टॅगलाइन वापरतात. त्यामुळे बटर चिकनचा शोध आपणच लावला असा दावा करणा-या मोती महल हॉटेल व्यपस्थापकांनी दर्यागंज हॉटेलच्या चालकां विरुद्ध खटला दाखल केला आहे. हा खटला दाखल करतांना दर्यागंज हॉटेलनं आपला ट्रेडमार्क कॉपी केल्याचा आरोपही मोती महल हॉटेलतर्फे लावण्यात आला आहे. तसेच मोती महलने दर्यागंज रेस्टॉरंटकडून सुमारे अडीच लाख डॉलर्सच्या नुकसानीची मागणी केली आहे. (Butter Chicken)
हा दावा दाखल केल्यावर दर्यागंज रेस्टॉरंट्सने मोती महलवरही उलट आपल्याच बदनामीचा आरोप केला आहे. आणि मोती महल हॉटेलवर बदनामी केल्याचा आरोप केला आहे. हा वाद कमी होता की काय, आता यामध्ये पाकिस्तानच्या हॉटेल चालकांनाही उडी घेतली आहे. पेशावरमधील काही हॉटेल चालकांनी बटर चिकन मुळ पेशावरचे असल्याचा दावा ठोकला आहे. पेशावरमधील जुन्या जाणकारांच्या म्हणण्यानुसार 20 व्या शतकाच्या सुरुवातीला पेशावरच्या छावणी परिसरातून बटर चिकनची रेसिपी पहिल्यांदा तयार झाली. पेशावरच्या मोती महल रेस्टॉरंट मध्ये सुगंधित चहा, कुरकुरीत-पकोडे, पनीर डिशेस आणि मसालेदार दही अशा डिश मिळत असत. या डिश महागड्या होत्या. त्यामुळे येथे या भागातील श्रीमंत नागरिक आणि ब्रिटीश अधिकारी यायचे. या रेस्टॉरंटचे स्वयंपाकघर तळमजल्यावर होते. (Butter Chicken)
======
हे देखील वाचा : ‘या’ वस्तू चुकूनही ठेऊ नका फ्रिजमध्ये
======
तिथे पारंपारिक तंदूर होता. या तंदूरमध्ये पेशावरी नान आणि तंदूरी चिकन बार्बेक्यू केले जात असत. याच हॉटेलचे मालक फाळनीनंतर दिल्लीला आले, तेव्हा त्यांनी याच तंदूर चिकनचे बटर चिकनमध्ये रुपांतर केले. पेशावरमधील मोती महलच्या मेनूमध्ये बटर चिकन नव्हते. दिल्लीत आल्यानंतर गुजराल यांनी या प्रसिद्ध रेसिपीचा शोध लावल्याचे काहींचे म्हणणे आहे. पेशावरच्या याच हॉटेलच्या कुंदन लाल जग्गी आणि कुंदन लाल गुजराल यांच्या वारसांमध्ये बटर चिकन ही रेसिपी नेमकी कुणाची हा वाद सुरु आहे. ही रेसिपी चुकून तयार झाल्याचा दावाही आहे. उरलेली चिकन तंदूरी, ही मुर्ग मखानीच्या करीमध्ये मिसळली गेली. या करीमध्ये टोमॅटो आणि बटरचा समावेश होता. त्यातून जी रेसिपी तयार झाली, ती बटर चिकन होती. ही चूकून तयार झालेली डिश कोणाच्या नावावर आहे, यासाठी दिल्ली न्यायालयात वाद सुरु आहे. मात्र हा वाद एकीकडे आणि दुसरीकडे बटर चिकनचे चाहते आहेत. त्यांना ही डिश कोणी पहिली बनवली वा त्याचा शोध कोणी लावला यापेक्षा त्याच्या चवीवरच अधिक फिदा आहेत. (Butter Chicken)
सई बने