दिवाळीच्या चार दिवसात नरक चतुर्दशी (Naraka Chaturdashi) हा महत्त्वाचा दिवस आहे. याच दिवशी आपण पहिली आंघोळ आहे, म्हणून पहाटेला उटणं लावून अंघोळ करतो. मग नरकासुराचा वध म्हणून एका छोट्या फळाला…चिरोट्याला पायानं चिरडून नरकासुराचा वध केला म्हणून कपाळाला या चिरोट्याचा रस लावला जातो. पण हा नरकासूर म्हणजे कोण, तो कुठे राहत होता. त्याच्या अस्तित्वाच्या खूणा अजूनही कुठल्या राज्यात पाहायला मिळतात. या नरकासुराचा वध कोणी केला हे जाणून घेणे उत्सुकतेचे आहे. नरकासुर नावाच्या एका राक्षसाचा कृष्णानं नाही तर त्याची लाडकी पत्नी सत्याभामा हिनं वध केला. ही सर्व कथा जाणून घेण्यासारखी आहे.
दिवाळीचा महत्त्वाचा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांची पत्नी सत्यभामा यांनी नरकासुर या राक्षसाचा वध केला. तेव्हापासून नरक चतुर्दशी या दिवशी साजरी केली(Naraka Chaturdashi) जाते. यामागची सर्व कथा श्रीमद भागवत पुराणात सांगितली आहे. हा नरकासुर नावाचा राक्षस प्राग्ज्योतिषपूर येथे रहात होता. हे प्राग्ज्योतिषपूर म्हणजेच सध्याचे आसाम राज्य आहे. याच आसामला पुराणकाळात कामरूप आणि मायालोक अशीही नावे असल्याचा उल्लेख आहे. या नरकासुराचा राणी सत्यभामेनं वध केला. या घटनेला किती वर्ष झाली असतील, पण या नरकासुराच्या नावानं आसामच्या गुवाहाटीमध्ये एक डोंगर आणि एक रस्ता नरकासुराच्या नावावर आहे.

या नरकासुराला आसामच्या काही भागात पूजनीय मानले जाते. एका राक्षसाला आजही ऐवढा मान का मिळतो, याचे सर्व रहस्य लोककथांमध्ये सांगितले आहे. आसाममध्ये एक लोककथा आहे की, नरकासुर मार्ग हा नरकासुराने स्वतः कामाख्या देवीची पूजा करण्यासाठी बांधला होता. कामाख्या मंदिराकडे जाणारा हा रस्ता नरकासुराला एका रात्रीत पूर्ण करायचा होता. नरकासुराने त्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली. पण देवीची कृपा त्याला मिळू शकली नाही. हा मार्ग अपूर्णच राहीला. हा मार्ग पूर्ण झाला असता, तर नरकासुराला सर्व शक्ती प्राप्त झाल्या असत्या, त्यामुळे कामाख्या देवीच्याच इच्छेनं हा मार्ग अपूर्ण झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे नरकासुरानं अर्धवट बांधलेला हा मार्ग अद्यापही तसाच आहे. आताही बहुतेक लोक मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी याच मार्गाचा अवलंब करतात. (Naraka Chaturdashi)
कामाख्या मंदिर असलेल्या निलांचल पर्वताच्या दक्षिणेला पांडु-गौहाटी मार्गावर ज्या टेकड्या आहेत, त्यांना नरकासुर पर्वत म्हणतात. नरकासुर हा कामरूपचा राजा होता आणि तो कामाख्या देवीचा प्रमुख भक्त होता. नरकासुर हा अत्याचारी होता आणि त्याने 16,100 तरुणींना कैद केले होते. नरकासुराने ब्रह्मदेवालाही आपल्या उपासनेने प्रसन्न करुन घेतले होते. त्याने ब्रह्मदेवाकडे वरदान मागितले की, मी भूमीचा पुत्र आहे आणि माझा मृत्यूही भूमिच्याच हातून होवो. ब्रह्मदेवानं हे वरदान दिल्यावर नरकासुराने पृथ्वीवरील सर्व राजांचा पराभव करून देवलोक जिंकण्यासाठी इंद्रदेवावर हल्ला केला. नरकासुराला पाहून इंद्र सिंहासन सोडून पळून गेला. देवलोकातून परततांना, नरकासुराला देवी अदिती म्हणजेच ऋषी कश्यपाची पत्नी, ज्यांचे देवता पुत्र असल्याचे मानले जाते, त्या अदिती देवींच्या कुंडलांनी मोहित केले. ही कानातली कुंडले नरकासुरानं हिसकावून घेतली. यामुळे दुखवलेल्या देवी अदिती रडत रडत सत्यभामेजवळ गेल्या. सत्यभामा ही भगवान श्रीकृष्णाच्या आठ राण्यांपैकी एक. सत्यभामाने आदितीला कृष्णाकडे नेले. सत्यभामेच्या विनंतीने कृष्णांनी नरकासूराला युद्धाचे आवाहन केले. पण या युद्धात त्यांनी सत्यभामेला सोबत येण्याची विनंती केली. नरकासुराची राजधानी प्राग्ज्योतिषपूर म्हणजेच आत्ताचे आसाम येथे हे युद्ध झाले. यात प्रथम कृष्णाला पाहून नरकासुराने आपला सेनापती मुराला युद्धासाठी पाठवले. भगवान कृष्णाने एकाच आघातात मुरासहित सर्व सैनिक मारले. यावर क्रोधित झालेल्या नरकासुराने भगवान कृष्णाच्या छातीवर त्रिशूळ मारला, या हल्ल्यानं भर रणांगणावर कृष्ण बेशुद्ध झाल्याचे सांगतात. अशावेळी राणी सत्यभामा नरकासूरावर चालून गेली. तिच्या उग्ररुपापुढे नरकासुराचा टिकाव लागला नाही. सत्यभामानं बाणांनी नरकासूराचा वध केला. नरकासूर मारला गेल्यावर बेशुद्ध झालेले भगवान श्रीकृष्ण जागे झाले. त्यांनी नरकासूराला ब्रह्मदेवानं दिलेल्या वरदानाची सत्यभामेला आठवण करुन दिली. सत्यभामा पृथ्वीचा अवतार असल्याचे माने जाते. त्यामुळे तिच्याच हस्ते नरकासूराचा वध झाला. या युद्धानंतर 16,100 सुंदरी नरकासुराच्या बंदिवासातून मुक्त झाल्या. अदिती देवीच्या कर्णफुले त्यांना परत मिळाली झाली. (Naraka Chaturdashi)
==========
हे देखील वाचा : ग्रीन फटाके तुम्ही कधी वापरले आहेत का?
==========
ज्या दिवशी नरकासुराचा वध झाला त्या दिवशी छोटी दिवाळी साजरी केली जाते. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला नरकासुराचा वध झाला. या दिवशी नरक चतुर्दशी (Naraka Chaturdashi) साजरी केली जाऊ लागली. नरकासुर पर्वत आणि परिसर प्राचीन काळापासून तंत्रसिद्धी आणि काळ्या जादूसाठी प्रसिद्ध आहे. नरकासुराशिवाय महाभारतातील भीमाचा पुत्र घटोत्कच याच्या कथाही याच भागात सांगितल्या जातात. घटोत्कचने या प्राग्ज्योतिषपुरातून म्हणजे आसाममधून मायावी शक्ती मिळवल्या होत्या. त्यानंतरच तो महाभारताचे युद्ध लढायला गेल्याचा येथे सांगण्यात येते.
सई बने