सिनेमा अन वेबसिरीजमध्ये आपण एकापेक्षा एक भारी देश बघत असतो. मग साहजिकच तिथे जाण्याची तीव्र इच्छा मनात निर्माण होते. मग अमुक झालं की तमुक देशात जाऊ, तमुक घडलं की अमुक देशाला नक्की भेट देऊ अशा अमुक तमुकच्या स्वप्नांमध्ये आपण पुरते अडकून जातो. ही स्वप्नं कधी पगाराचा पुरवठा अपुरा आहे. म्हणून दम तोडतात तर कधी जबाबदारीच्या ओझ्याखाली पुरती दबून जातात आणि मग फिरायला जाणं पुढे जात राहत. जेव्हा खरोखरच बाहेर जाण्याचा योग येतो तेव्हा मात्र आपली पुरती दमछाक होऊन जाते. हो हो पैसे, तिथे जाऊन राहण्याची सुविधा वगैरे वगैरे गोष्टी असतातच पण एक सगळ्यात महत्वाची अन दमवणारी गोष्ट असते ती म्हणजे पासपोर्ट अन व्हिसा मिळवण्याची. पासपोर्ट अन व्हिसा हे वेगवेगळी प्रकरणे आहेत हे काहीजणांना तेव्हा लक्षात येतं. पासपोर्ट आणि व्हिसाच्या या वेगळेपणाचा नेमका विषय आपण समजावून घेऊया.(Difference)

सरकारकडून नागरिकांना अधिकृतपणे जो दस्ताऐवज ( डॉक्युमेंट्स ) दिला जातो, जो त्या नागरिकाचे त्या विशिष्ट देशाचे नागरिकत्व सिद्ध करतो त्याला ढोबळमानाने आपण पासपोर्ट म्हणून संबोधतो. आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान याचा उपयोग होतो. यामध्ये संबंधित व्यक्तीचे नाव, जन्म स्थान, जन्म तारीख, छायाचित्र, स्वाक्षरी आणि इतर माहिती नमूद केलेली असते. थोडक्यात पासपोर्ट आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रवासादरम्यान आपली ओळख असतो. बनावट पासपोर्ट बनवू नये म्हणून सरकारकडून विशेष खबरदारी घेण्यात येते. तुम्हाला जगात कुठेही फिरायचे असल्यास एका देशाचा पासपोर्ट हा पुरेसा असतो. तुम्ही एखाद्या देशाला कुठल्या कारणासाठी भेट देताय यावर पासपोर्टचे वेगवेगळे प्रकार ठरतात.(Difference)
रेग्युलर पासपोर्ट : हा पासपोर्ट देशातील जवळपास सगळ्या नागरिकांना मिळवता येतो.
सर्व्हिस पासपोर्ट : या प्रकारचे पासपोर्ट सरकारी अधिकारी अन संबंधित व्यक्तींना कामासंबंधीच्या प्रवासाकरिता दिले जातात.
डिप्लोमॅटिक पासपोर्ट : विशिष्ट व्यक्तींना, जे परदेशी जाऊन सरकारी काम करत असतात त्यांना हा पासपोर्ट दिला जातो.
इमर्जन्सी पासपोर्ट : एखाद्या व्यक्तीचे पासपोर्ट हरवले आहे आणि त्याला आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी लगेच पासपोर्ट हवा असेल तर हा पासपोर्ट दिला जातो. नवीन पासपोर्ट बनेपर्यंत तात्पुरत्या इमर्जन्सी पासपोर्टचा वापर केला जातो.
कलेक्टिव्ह पासपोर्ट : एखाद्या ग्रुपला आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी हा पासपोर्ट दिला जातो.
फॅमिली पासपोर्ट : परिवाराच्या एखाद्या सदस्याचे पासपोर्ट असेल आणि त्यात बाकींच्या सदस्यांचे नाव नमूद केलेले असेल तर अशा वेळी पूर्ण परिवाराला एकच पासपोर्टवर प्रवास करणे शक्य होते. अलीकडील काळात मात्र प्रत्येकाचा पासपोर्ट असणे गरजेचे आहे.
=========
हे देखील वाचा : यंदाच्या उन्हाळ्यामुळे होऊ शकतो ‘हा’ परिणाम
=========
हा झाला पासपोर्टचा विषय. आता व्हिसाचं प्रकरण काय आहे जाणून घेऊया. एखाद्या देशाने एखाद्या व्यक्तीच्या आपल्या देशात ठराविक मुदतीसाठी प्रवेश करण्याला, तिथे राहण्याला दिलेले परवानगीपत्र म्हणजे व्हिसा असे आपण म्हणू शकतो. एखाद्या देशात प्रवेश करण्यासाठी पासपोर्ट सोबतच त्या देशाचा व्हिसा असणे आवश्यक असते. त्या त्या देशांच्या दूतावासाकडून हा व्हिसा दिला जातो. कुठल्याही देशात जाण्यासाठी तुमच्याकडे त्या देशाचा व्हिसा असणे गरजेचे असते. तुम्ही एखाद्या देशात कुठल्या कारणासाठी जाताय यावरून व्हिसाचे प्रकार ठरतात.(Difference)
टूरीस्ट व्हिसा : एखाद्या देशाला पर्यटनासाठी भेट देण्यासाठी 30 दिवस ते 90 दिवसांचा टूरिस्ट व्हिसा दिला जातो. काही देश 10 वर्षांपर्यंत टूरिस्ट व्हिसा जारी करतात.
ट्रान्झिट व्हिसा : ट्रान्झिट व्हिसा केवळ प्रवाशांना त्यांच्या कनेक्टिंग फ्लाइटची वाट पाहत असताना एखाद्या देशातून प्रवास करण्याची परवानगी देण्यासाठी जारी केला जातो. तो सहसा फक्त 24 तासांसाठी वैध असतो, परंतु तो दहा दिवस ते दोन आठवड्यांसाठी जारी केला जाऊ शकतो.
बिझनेस व्हिसा : हा व्हिसा परदेशी देशात व्यवसाय करण्यासाठी जारी केला जातो. त्याची वैधता देश आणि व्यवसायाच्या प्रकारावर अवलंबून असते.
स्टूडंट व्हिसा : ज्या विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण घ्यायचे आहे त्यांना स्टूडंट व्हिसा दिला जातो. स्टूडंट व्हिसा अभ्यास कार्यक्रमाच्या कालावधीसाठी वैध असतो
वर्क व्हिसा : वर्क व्हिसा दुसऱ्या देशात काम करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो; व्हिसा सामान्यत: कामाच्या कराराच्या कालावधीसाठी वैध असतो परंतु तो वाढवला जाऊ शकतो.
वर्किंग हॉलीडे व्हिसा : वर्किंग हॉलिडे व्हिसा सामान्यत: एक किंवा दोन वर्षांसाठी वैध असतो, ज्यामुळे व्यक्तींना एखाद्या देशात पर्यटक म्हणून प्रवास करण्याची आणि विशिष्ट उद्योगांमध्ये काम करण्याची परवानगी मिळते.
मेडिकल व्हिसा : वैद्यकीय मदत घेण्यासाठी एखाद्याला दुसर्या देशात जावे लागते तेव्हा वैद्यकीय व्हिसा मंजूर केला जातो, व्हिसाची वैधता रुग्णाच्या परिस्थितीवर अवलंबून असते.
पिल्ग्रीमेज व्हिसा : धार्मिक प्रवासासाठी पिल्ग्रीमेज व्हिसा जारी केला जातो.
रिटायरमेंट व्हिसा : या प्रकारचा व्हिसा सेवानिवृत्तीच्या वयाच्या लोकांना दिला जातो.
इम्मिग्रंट व्हिसा : इमिग्रंट व्हिसा दुसर्या व्यक्तीला दुसर्या देशात कायमस्वरूपी राहण्याची परवानगी देतात.
अशाप्रकारे भेट देण्याच्या कारणावरून, कालावधीवरून व्हिसाचे विविध प्रकार पडतात.