Home » Kabul : अफगाणिस्तानचे ऐतिहासिक शहर पाण्यावाचून कोरडे होणार !

Kabul : अफगाणिस्तानचे ऐतिहासिक शहर पाण्यावाचून कोरडे होणार !

by Team Gajawaja
0 comment
kabul | Todays Marathi News
Share

अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूल शहराचा इतिहास हा खूप जूना आहे. 323 ईसापूर्व काळात मौर्य घराण्याच्या अनेक शासकांनी येथे राज्य केल्याची माहिती आहे. प्राचीन पर्शियन साम्राज्याच्या काळातही काबूलचा उल्लेख आढळतो. 18 व्या शतकात तैमूर शाह दुर्राणीने या शहराला अफगाणिस्तानची राजधानी केलं. 20 व्या शतकात काबूल अनेक युद्ध आणि संघर्षाच्या केंद्रस्थानी राहिले. अफगाणिस्तानची राजधानी आणि सांस्कृतिक नगरी म्हणूनही काबूलचा उल्लेख होत राहिला. आता या शहरावर तालिबानचे राज्य आहे. या सगळ्या काळात काबूलनं अनेक रक्तरंजित संघर्ष बघितले आहेत. मात्र या सर्वांची साक्ष असलेले हे शहर पुढच्या काही वर्षात निर्मनुष्य होण्याची शक्यता आहे. कारण या शहरातले पाण्याचे साठे पूर्णपणे सुकले असून, काबूल 2030 पर्यंत पूर्णपणे कोरडे होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. (Kabul)

अफगाणिस्तानमधील काबूल शहरानं अनेक युद्ध पाहिली आहेत. मात्र सध्या हे शहर जे युद्ध पाहत आहे, ते त्याला अंतापर्यंत घेऊन जात आहे. कारण या शहरात पाण्याचा साठा पूर्णपणे कोरडा होण्याच्या मार्गावर आहे. शहरातील बहुसंख्य बोअरवेल सुकल्या असून येथील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळवतांना मोठी कसरत करावी लागत आहे. अशावेळी पशुपक्षी आणि शेतीसाठीच्या पाण्याचा विचारच केला जात नाही. त्यामुळे काबूल शहराच्या आसपास असलेली शेतीही पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. (Latest News)

काबूल शहरासाठी ही अस्तित्वाची लढई ठरत आहे. एकेकाळी साहित्य, संस्कृती आणि आर्थिक भरभराटीचे केंद्र असलेल्या काबूल शहरात पुढच्या पाच वर्षात रिकामी वस्त्या पाहण्याची वेळ येणार आहे. काबूलमधील पाण्याच्या या संकटाबाबत मर्सी कॉर्प्स या संस्थेनं नुकताच एक अहवाल जाहीर केला आहे. त्यातून उघड झालेली काबूल शहराची परिस्थिती भयावह अशी आहे. या अहवालानुसार काबूल शहराची भूजल पातळी ही 30 मीटरपर्यंत कमी झाली आहे. या शहरातून पाण्याचा उपसा होण्याचे प्रमाण हे जास्त आहे. दरवर्षी, जमिनीतून 44 दशलक्ष घनमीटर जास्त पाणी काढले जात आहे. ज्या प्रमाणात पाणी जमिनीत मुरले जाते, त्यापेक्षाही काही पटीनं पाण्याचा उपसा झाल्यामुळे येथील जलस्त्रोत झपाट्यानं कोरडे होत आहेत. त्यातही महत्त्वाचे म्हणजे, गेल्या अनेक वर्षापासून काबूलमध्ये सत्ता संघर्ष चालू आहे. (Kabul)

ज्यांच्याकडे अफगाणिस्तानची सत्ता आली आहे, ते ही सत्ता कशी टिकवली जाईल आणि विरोधकांवर कशी मात करता येईल, याबाबतच कायम विचार करत राहिले. त्यांनी काबूल किंवा अफगाणिस्तानमधील अन्य शहरांमध्ये मुलभूत सुविधांचा विचार फारसा केलेला नाही. त्यामुळेच आता येथील मुख्य मुलभूत गरज असलेले पाणीच काही वर्षात संपुष्ठात येणार आहे. त्यातही चिंतेत टाकणारी गोष्ट म्हणजे, जे काही जलस्त्रोत या भागात आहेत, ते आपापसातील संघर्षामुळे विषारी करण्यात आले आहेत. युनिसेफच्या अहवालानुसार काबूलमधील बोअरवेल सुकल्या आहेतच पण येथील भूजलाचा साठा 80 टक्के दूषित झाला आहे. त्यामुळे येथील जनतेला कित्येक वर्ष स्वच्छ पाणी मिळत नाही. जे पाणी दूषित आहे, त्या पाण्याचाही आत्ता नाईलाज म्हणून वापर करण्यात येतो. कपडे, भांडी धुण्यासाठी हे पाणी वापरले जाते. त्यामुळे येथील महिलांना त्वचेचे रोग झाल्याचेही आढळून आले आहे. (Latest News)

अफगाणिस्तानमधील पावसाचे प्रमाणही अत्यल्प आहे. 2023 मध्ये काबूलमध्ये फक्त 40 टक्के पाऊस पडला. त्यामुळे या भागात दुष्काळ सदृश्य वातावरण आहे. काबूलमध्ये फार थोड्या भागात पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र संघर्षाच्या काळात यातील अनेक पाईपलाईन तुटल्या किंवा नादुरुस्त झाल्या आहेत. तालिबानच्या आगमनानंतर हे प्रमाण अधिक झालं आहे. पण याकडे कुठलंही सरकार गंभीरपणे बघत नाही. एवढ्या समस्या असूनही काबूलमधील लोकसंख्या वाढत आहे. काबूलमध्ये 60 लाखाच्या आसपास लोकसंख्या आहे. अफगाणिस्तानच्या राजधानीचे शहर असल्यामुळे येथे प्रशासकीय कामातील अधिकारीही मोठ्या प्रमाणात रहातात. शिवाय अन्य देशातील नागरिकही काबूलमध्येच रहातात. (Kabul)

=============

हे ही वाचा : Japan : संभाव्य अणुहल्ल्यापासून वाचण्यासाठी !

==========

या सर्वांचा पाण्यासाठी भरवसा बाटलीबंद पाण्यावर आहे. यांच्यामुळेच काबूलमध्ये 500 हून अधिक बाटलीबंद पाणी आणि शितपेय तयार करणा-या कंपन्या आहेत. या कंपन्यांवर पाणी किती वापरावे आणि कसे वापरावे याचा कुठलाही निर्बंध नाही. त्यामुळे लाखो लिटर पाणी या कंपन्या, शुद्धीकरणाच्या नावाखाली वाया घालवातात. तिथेच सर्वसामान्य काबूलचे नागरिक एक लिटर पाण्यासाठी तासंनतास लाईनमध्ये उभे रहातात. काबूलमधील पाणीटंचाई एवढी मोठी आहे की, 30 टक्के नागरिक विस्थापिक होण्याचा विचार करीत आहेत, किंवा काहींनी विस्थापन सुरुही केलं आहे. या सर्वांवर उपाय म्हणून तालिबान सरकारानं पंजशीर नदीमधून काबूल शहरात पाणी आणण्याची योजना आखली आहे. पण ही योजना निधीअभावी कागदावरच आहे. ही अशीच परिस्थिती राहिली तर 2030 मध्ये काबूल पूर्णपणे कोरडे होण्याची शक्यता अधिक आहे. (Latest News)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.