गुजराती विरुद्ध मराठी, शिवसेना विरुद्ध भाजप असे अनेक अंतर्गत संघर्ष सुरू असल्यामुळे मीरा-भाईंदरमधील राजकारण व निवडणूक नेहमीच रंगतदार होत असते. त्यात यंदा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असलेल्या ठाणे जिल्ह्यामध्ये हा मतदारसंघ येत असल्यामुळे या मतदारसंघातील लढतीकडे जास्त लक्ष लागले आहे. मुख्यमंत्र्यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे प्रताप सरनाईक यांचे येथे वर्चस्व असल्याचे मानले जाते आणि खरं तर हाच या निवडणुकीतला कळीचा मुद्दा आहे. याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे ज्या शिवसेनेचे नेतृत्व करत आहेत, ज्यांना निवडणूक आयोगाने खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली आहे, त्या शिवसेनेची भाजपशी युती आहे आणि मीरा-भाईंदरमध्ये भाजपचा उमेदवार आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून भाजपच्या स्थानिक नेत्यांचा प्रताप सरनाईक यांच्यावर थोडा रोष आहे. एकूणच शिवसेना नेतृत्वाबाबत नाराजी आहे. शिवसेना येथे वर्चस्व गाजवू पाहते आणि भाजपला ती किंमत देत नाही, अशी त्यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची तक्रार आहे. त्यामुळे मीरा भाईंदर मतदार संघात महायुतीची लढत कशी असेल? मतदारसंघांचा आढावा आपण गाजावाजाच्या माध्यमातून घेत आहोत. विधानसभेच्या रणधुमाळीत आज आपण पाहाणार आहोत मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघ. (Mira Bhayander)
शिवसेना सातत्याने सांगत आलेली आहे, की भाजप मीरा भाईंदरमध्ये गुजरात्यांना जास्त महत्त्व देतो आणि मराठी मतांकडे दुर्लक्ष करतो. यातूनच तेथील स्थानिक राजकारण आकारास आले आहे. येथील महापालिकेची मुदत 2022 मध्ये संपली तेव्हा तिथे भाजपची सत्ता होती आणि शिवसेना विरोधात होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने गीता जैन या अपक्ष उमेदवाराला उघड उघड मदत केली आणि त्या निवडून आल्या. त्याच विद्यमान आमदार गीता जैन याही निवडणुकीत अपक्ष म्हणून उभ्या आहेत. खरे तर त्यांना भाजपकडून तिकीट मिळण्याची अपेक्षा होती परंतु भाजपने नरेंद्र मेहता यांना उमेदवारी दिली आहे. (Political News)
गेल्या वेळेस एकसंध शिवसेनेने गीता जैन यांना मदत केली, ती शिवसेना आता फुटली आहे. त्यातील अर्धा भाग एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आता भाजपसोबत आहे. परवा प्रताप सरनाईक आणि भाजप नेत्यांनी तिथे पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की आम्ही एकदिलाने काम करू आणि भाजपला मदत करू. ते प्रत्यक्षात उतरतं का नाही, हे बघावं लागेल. गीता जैन यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यांना किती मते मिळतात यावरही बरीच गणिते अवलंबून आहेत. तिसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या वतीने येथे मुझफ्फर हुसेन यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यांना अल्पसंख्यांकांची मते मिळण्याची अपेक्षा आहे. पण गंमत अशी की त्यांच्याशिवायही अनेक उमेदवार येथे रिंगणात आहेत. एकूण 16 उमेदवार असून त्यात मनसेही आहे. मराठी मते उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये विभागली जाणार, अल्पसंख्यांक मते मुझफ्फर हुसेन यांना मिळणार का अन्य अपक्ष उमेदवारांमध्ये विभागणी जाणार या सर्व समीकरणांवर मीरा-भाईंदरची निवडणूक अवलंबून आहे. (Mira Bhayander)
======
हे देखील वाचा : या निवडणुकांनी गृहयुद्धच उभे केले !
====
नरेंद्र मेहता या भाजप उमेदवाराच्या बाजूने महायुतीचे कार्यकर्ते किती एकदिलाने काम करतात, हा प्रश्न आहे. काँग्रेसची संघटना सुद्धा येथे बळकट नाही त्यामुळे त्यांनाही संघर्ष करावा लागेल. खरी गोची येथे झाली आहे ती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची कारण शिवसेना महाविकास आघाडीत नसती तर गीता जैन यांना भाजपने उमेदवारी दिली नाही म्हणून त्या शिवसेनेत जाऊ शकल्या असत्या. गीता जैन या अपक्ष उमेदवार आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांना काँग्रेसचे काम करावे लागेल. हे कार्यकर्ते काँग्रेससाठी काम करतील का, हा एक वेगळाच मुद्दा आहे. एकंदर पाहता येथे निवडणूक खूप रंगतदार झालेली आहे आणि त्यामुळे येथील निकालाचे औत्सुक्य असणारच आहे. मीरा भाईंदरमधील मतदार कोणाला निवडून आणणार हे २३ तारखेलाच कळेलं. तोपर्यंत तुम्ही गाजावाजाची विधानसभेची रणधुमाळी ही राजकीय विश्लेषक मालिका पाहत रहा. (Political News)