Home » वाण नाही पण गुण लागायला किती वेळ लागतो !

वाण नाही पण गुण लागायला किती वेळ लागतो !

by Team Gajawaja
0 comment
Uddhav Thackeray
Share

ढवळ्याशेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला अशी एक मराठी म्हण आहे. या म्हणीची आठवण माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या उरलेल्या गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी करून दिली आहे. त्याला कारण म्हणजे भाजपसोबत तीन दशकांची युती करूनही शिवसेनेने आपली ओळख गमावली नाही. (त्यामुळे) आता ती काँग्रेसमध्ये बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे वक्तव्य ठाकरे यांनी शनिवारी केले. कळमनुरी, हिंगोली आणि वसमत विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या हिंगोली येथे झालेल्या प्रचार सभेत त्यांनी हे वक्तव्य केले. उद्धव यांची शिवसेना ही काँग्रेसची दुसरी आवृत्ती बनली आहे, अशी टीका भाजपने केली होती. त्याला उत्तर देताना ठाकरे म्हणाले की आमचा पक्ष अनेक वर्षांपासून भाजपचा मित्र आहे, परंतु आम्ही आपली ओळख गमावली नाही. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा इथे येतात आणि लोकांना सांगतात की आम्ही (उबाठा सेना) बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा सोडली. (Uddhav Thackeray)

मी विचारधारा सोडली नाही, भाजप सोडल आहे. भाजप हा बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा नाही. शिवसेनेची काँग्रेस कशी होईल? काँग्रेस आमच्यासोबत आहे. 25-30 वर्षे सोबत असूनही शिवसेना भाजप बनली नाही. ती काँग्रेस कसे काय बनू शकते?” असे ते पुढे म्हणाले. उद्धव यांचा हा सवाल वरकरणी बिनतोड वाटतो, परंतु त्याचा वास्तवाशी संबंध नाही. तो सपशेल चुकीचाही आहे. खरे तर आज ज्या विचारांवर आपण ठाम असल्याचे उद्धव सांगत आहेत, तो विचार हीच मुळी बदललेल्या ओळखीचा पुरावा आहे. शिवसेनेची स्थापना 1966 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी प्रामुख्याने महाराष्ट्रातील स्थानिक मुद्दे आणि मराठी अस्मिता टिकविण्यासाठी (वाढवण्यासाठी नव्हे) केली होती. सुरुवातीपासूनच शिवसेनेचा राजकीय दृष्टिकोन आक्रमक असला तरी, तो हिंदुत्वापेक्षा प्रादेशिक अस्मितेवर अधिक केंद्रित होता. हम करे सो कायदा ही शिवसेनेची तेव्हापासूनची भूमिका आहे. (Political Updates)

काँग्रेसची बी टीम हा टोमणा शिवसेनेला सुरुवातीपासून सहन करावा लागला आहे. वसंतराव नाईक यांनी मुंबईच्या काँग्रेस नेत्यांवर वचक ठेवण्यासाठी शिवसेनेला पुढे आणले, हे राजकारणात सर्वसाधारणपणे मानले जाते. त्यामुळेच 80 च्या दशकापर्यंत शिवसेनेला वसंतसेना असेच म्हटले जात असे. विशेषतः आचार्य अत्रे यांनी हा शब्दप्रयोग रूढ केला होता. शिवसेनेची कारकीर्द आणि इंदिरा गांधी यांचा राजकीय कार्यकाळ हे जवळपास समांतर आहेत. त्यामुळे इंदिरा गांधींच्या शैलीची शिवसेनेवर खूप मोठी छाप आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधी यांचे नेहमीच कौतुक केले होते. त्यांनी अगदी आणीबाणीलासुद्धा पाठिंबा दिला होता. इंदिरा यांच्याप्रमाणेच बाळासाहेबांनी मुलगा उद्धव व पुतण्या राज ठाकरे यांना पुढे आणले. थोडक्यात म्हणजे हिंदुत्व हा मुद्दा काढून टाकला तर शिवसेना ही सुरुवातीपासून काँग्रेसचीच आवृत्तीच राहिली आहे. हा हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेने हाती घेतला तो 1984 च्या भिवंडीतील दंगलीनंतर तिने भाजपशी युती केल्यानंतर त्यानंतर हळूहळू हिंदुत्व हिंदुत्वासाठी लढणारी संघटना किंवा पक्ष म्हणून शिवसेनेचा संपूर्ण राज्यात प्रसार झाला. शिवसेनेची ओळख बदलण्याचा हा पहिला टप्पा होता. (Uddhav Thackeray)

भाजप हा तसा जनसंघापासून मवाळ पक्ष म्हणून ओळखला जातो. ज्या आणीबाणीला बाळासाहेबांनी पाठिंबा दिला होता, त्याच आणीबाणीमध्ये रा. स्व. संघ आणि तत्कालीन जनसंघाचे बहुतांश नेते व कार्यकर्ते तुरुंगात गेले होते. सनदशीर मार्गाने जे होईल ते करायचे, त्यासाठी दशकोन् दशके वाट पाहावी लागली तरी हरकत नाही, ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी अंगी पक्की मुरलेला पक्ष म्हणजे भाजप. हिंदुत्व रा. स्व. संघाचा प्राण आहे. साहजिकच जनसंघ आणि भाजपचाही तोच आधार आहे. अशा या दोन पक्षांनी युती केली ती हिंदुत्वासाठी. वास्तविक महाराष्ट्राला युती या शब्दाची ओळख करून दिली ती शिवसेना-भाजपने. त्यापूर्वी जनता पक्षाचा प्रयोग झाला होता. अगदी शरद पवारांनीही जनसंघापासून सगळ्या पक्षांना एकत्र आणण्याची किमया केली होती, पण होते ते कडबोळेच. केवळ काँग्रेसला दूर ठेवण्यासाठी व सत्ता हस्तगत करण्यासाठी तो पुरोगामी लोकशाही दल नावाचा प्रयोग झाला होता. तोपर्यंत वैचारिक आधारावर राजकीय पक्षांनी युती करण्याचे उदाहरण महाराष्ट्रात नव्हते. मात्र शिवसेना व भाजप या दोन पक्षांनी 25 वर्षे हिंदुत्वाच्या नावाने एकमेकांच्या सोबत काढली आणि मतदारांनाही पर्याय उपलब्ध करून दिला. काही वर्षांपूर्वी या काफिल्यात अन्य पक्षही सामील झाले. पण तोपर्यंत भाजपचे बळ वाढले होते. उलट जंत पोटात गेल्यावर माणसाची प्रकृती बिघडावी, तशी शिवसेना क्षीण झाली होती. मुख्य म्हणजे भाजपच्या हातात नरेंद्र मोदी नावाचा हुकुमाचा एक्का लागला होता. त्यामुळे राजकारणाच्या रंगमंचावरचा फोकस शिवसेनेवरून भाजपकडे सरकत गेला. असे असले तरी या दोन पक्षांमध्ये फरक कायम होता आणि तो जाणवण्याएवढा होता. (Political Updates)

ज्या मराठवाड्याच्या उमेदवारांसाठी प्रचार करताना उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केले त्या मराठवाड्यात तर या दोन पक्षांतील फरक अगदी स्पष्ट होता. भाजप हा नेमस्त हिंदुत्वाचा चेहरा होता तर शिवसेना ही आक्रमक हिंदुत्वाची ओळख होती. मराठवाड्यातील नांदेड, औरंगाबाद व परभणी अशा संवेदनशील शहरांमध्ये अल्पसंख्यांकांच्या गुंडगिरीला जशास तसे उत्तर देणारी हक्काची संघटना ही शिवसेनेची ओळख होती. भाजपला ते स्वरूप कधीही मिळाले नव्हते. त्यामुळे शिवसेना व भाजपची युती असताना शिवसेना-भाजपची जागा घेईल किंवा भाजप शिवसेनेची जागा घेईल, असा प्रश्नच कधी उद्भवला नव्हता. अशी ही शिवसेना आणि भाजपची युती तीस वर्षे जुनी असली तरी शिवसेनेने ती कधी मनापासून स्वीकारलीच नव्हती. अगदी बाळासाहेब ठाकरे हयात असतानाही ते आणि शिवसेनेचे अन्य नेते भाजपशी हात राखूनच वागत असत. बाळासाहेब ठाकरे तर कमळाबाई म्हणून भाजपची थट्टा करत असत. परंतु भाजप नेत्यांनी आणि सर्वसामान्य जनतेने त्यांची ती थट्टा कधी गांभीर्याने घेतली नाही, कारण हिंदुत्ववादी म्हणून जरी शिवसेना आणि भाजप एकत्र आले असले तरी त्यांच्या चारित्र्यातील फरक सर्वांना माहीत होता. (Uddhav Thackeray)

त्यामुळे भाजपसोबत तीस वर्षेच काय, पन्नास वर्षे जरी शिवसेना युतीत राहिली तरीही तिचा चेहरा मोहरा बदलला नसता. परंतु काँग्रेसच्या नादी लागून उद्धव यांनी वेगळेपणा ठरणारी आपली ती एकमेव झूल बाजूला ठेवली. शिवसेनेची ओळख बदलण्याचा हा दुसरा टप्पा. नाही म्हणायला त्यापूर्वी जवळपास चौदा वर्षे आधी उद्धव ठाकरे यांनी मी मुंबईकर या मोहिमेच्या माध्यमातून शिवसेनेचे रोपळे बदलण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यावेळी बाळासाहेब ठाकरे हे हयात होते आणि म्हणून उद्धव ठाकरे यांना हिंदुत्व संपूर्ण सोडून देता आले नव्हते. ते हिंदुत्व त्यांनी पूर्णपणे सोडून दिले ते 2019 मध्ये. मुंबईतील हिंदू 1992 व 1993 च्या दंगलीत शिवसेनेमुळे जीवंत राहिला, असे सांगणाऱ्या बाळासाहेबांचे चिरंजीव “शिवसेनेचे हिंदुत्व शेंडी जानव्याचे हिंदुत्व नाही,” असे म्हणू लागले. त्यांचे संपादक संजय राऊत “देवांनी मैदान सोडले,” असे लेख लिहू लागले. ज्या औरंगाबादला संभाजीनगर हे नाव बाळासाहेबांनी दिले होते त्यांचेच चिरंजीव “त्यासाठी आदेश कशाला काढायचा? मी म्हणतो ना संभाजीनगर,” असे विचारू लागले. जनाब उद्धव ठाकरे असा त्यांचा उल्लेख होऊ लागला. (Political Updates)

======

हे देखील वाचा :  ठाण्यात नेमकी कोणती गणितं चालणार?

========

अशा रीतीने शिवसेनेची हळूहळू काँग्रेस होताना दिसू लागली. मग राम मंदिराला विरोध असो किंवा वक्फ कायद्यातील सुधारणेला विरोध असो, शिवसेनेचे (म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना) जवळजवळ काँग्रेसीकरण होताना दिसू लागले. एकनाथ शिंदे यांनी बंड करून बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा सांगितला, तेव्हा तर हे अंतर अधिक ठळकपणे दिसू लागले. ओळख मिटून जाऊन केवळ नामशेष होण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला सावरून वर आणले, असे म्हणता येईल. याच कारणामुळे शिवसेनेची ओळख मिटण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाबाबत तरी ती खरी ठरली आहे. म्हणूनच प्रश्न विचारावासा वाटतो, वाण नाही पण गुण लागायला किती वेळ लागतो, उद्धवजी? (Uddhav Thackeray)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.