अमेरिकेवर कोणीतरी नजर ठेवत आहे का? हा संशय खुद्द अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेनं व्यक्त केला आहे. अंतराळ संशोधनात काम करणा-या अमेरिकेच्या नासाकडे यासंदर्भात दरदिवसाला आकाशात अज्ञात वस्तू अर्थात युएफओ (UFO) दिसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. यासंदर्भात नासाकडेही काही अहवाल आला आहे. यासर्वांचा अभ्यास करण्यासाठी नासानं नुकतीच एक बैठक घेतली. यात अमेरिकेच्या आकाशातून खरोखर नजर ठेवली जात आहे का? यावर चर्चा झाली. याबाबत एक समितीही नेमण्यात आली आहे. ही समिती युएफओ(UFO) संदर्भात आलेल्या माहितीचा अभ्यास करणार आहे. नासाने साधारण वर्षभरापूर्वीच जाहीरपणे युएफओचा अभ्यास सुरु केल्याचे मान्य केले होते. आता त्यावर समिती नेमल्यानं खरोखरच अमेरिकेत युएफओ (UFO) दिसतात का? हा प्रश्न विचारला जात आहे.
युएफओ (UFO) संदर्भात नासाच्या तंत्रज्ञानांची आणि अन्य जाणकारांची एक बैठक झाली. यात नासाचे युएफओ (UFO) संदर्भात माहिती गोळा करणारे 16 सदस्य आणि अन्यही तंत्रज्ञानांचा समावेश होता. शिवाय निवृत्त अंतराळवीर स्कॉट केली यासुद्धा या समितीमध्ये आहेत. या एक वर्ष अंतराळात राहणाऱ्या पहिल्या अमेरिकन आहेत. धक्कादायक म्हणजे नासाच्या या बैठकीत वर्षभरात साधारण 800 वेळा युएफओ अमेरिकेच्या आकाशात उडतानाचे पाहिले गेल्याचे पुरावे सादर करण्यात आल्याची माहिती आहे. नासा आता यासंदर्भात अधिक माहिती गोळा करत आहे. तज्ञांच्या मते या घटना नैसर्गिक घटना नाहीत. त्यांच्या मागचा अर्थ उलगडणे कठीण असते. तसेच अशी युएफओ ही दिसल्याची घटना अत्यंत कमी वेळेसाठी असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याचा तपास करणे अत्यंत जिकरीचे झाले आहे. युएफओ म्हणजेच Unidentified Flying Objects चा तपास करणाऱ्या NASA पॅनेलने जवळपास 800 रहस्यमय घटनांची नोंद केली आहे. ही साधारण वर्षभराची आकडेवारी आहे.
या घटनांची वाढती संख्या पाहता नासानं गेल्या वर्षी यूएपी, म्हणजेच अनआयडेंटिफाइड एनोमालस फेनोमेना यांची हालचाल जाणण्यासाठी एक पॅनेल स्थापन केले आहे. ज्या घटना वैज्ञानिकदृष्ट्या विमान किंवा ज्ञात नैसर्गिक घटना म्हणून ओळखल्या जाऊ शकत नाहीत त्यांना UAP मानले जाते. आता याचा अभ्यास करणारे नासाचे पॅनल यासंदर्भात अहवाल देणार आहे. त्याचसंदर्भात नुकतीच बैठक झाली. यासंदर्भात अधिक माहिती देताना नासाचे संशोधक सहाय्यक डॉ. डॅनियल इव्हान्स यांनी सांगितले की, आकाशात गूढपणे दिसणाऱ्या या वस्तूंची तपशीलवार माहिती मिळवण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. सायमन फाऊंडेशन चालवणारे आणि समितीचे अध्यक्ष असलेले खगोलशास्त्रज्ञ डेव्हिड स्पर्गेल यांच्या मते, आकाशात काय घडत आहे हे समजून घेण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे. नासाकडे आता या उडत्या तबकड्यासंदर्भात दर महिन्याला 50 ते 100 नवीन अहवाल मिळतात. विशेष म्हणजे यात अमेरिकेच्या लष्करी वैमानिकांनी पाहिलेल्या वस्तूंचीही माहिती मोठ्या प्रमाणात आहे. 2004 पासून लष्करी वैमानिकांनी 144 अशा घटनांची नोंद केली आहे. मात्र त्यासंदर्भात कुठलाच शोध घेतला जाऊ शकला नाही. त्यामुळे या वस्तू म्हणजे, परग्रहावरील युएफओच असल्याचे मत काही सैनिकांनी व्यक्त केले होते. (UFO)
======
हे देखील वाचा : पुराना नव्हे पांडवकालीन पुराण किल्ला…
======
दरम्यान अमेरिकेनं या उडत्या तबकड्यासंदर्भात पहिली बैठक घेतली असतानाच आता चीन आणि कॅनडा या देशांमध्येही उडत्या तबकड्या दिसल्याची माहिती काही नागरिकांनी दिली आहे. अमेरिकेत जेव्हा या घटनांची नोंद होते, तेव्हाच कॅनडामध्येही उडत्या तबकड्या दिसल्याचे सांगण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच पूर्व चीनच्या शानडोंग प्रांतातील रिझाओ शहराजवळ एक अज्ञात उडणारी वस्तू दिसली आहे. अशा वस्तू पुन्हा दिसल्यास त्यांना पाडण्यात यावे असा आदेश आता चीनच्या लष्कराला देण्यात आला आहे. तर अमेरिकेतही हवाई दलाच्या क्षेत्रावर दिसणा-या अशा उडत्या तबकड्यांवर गोळीबार करण्यात आल्याचे काही सैनिक सांगत आहेत. गोळीबार केल्यावर या उडत्या तबकड्या वेगानं गायब झाल्यानं त्याबाबत अधिक गूढ वातावरण तयार झालं आहे. अमेरिकेनं यासंदर्भात अधिकृत समितीच नेमल्यानं अमेरिकेला या युएफओबाबत ठोस माहिती असणार अशीही चर्चा आहे. शिवाय यातून एलियन पृथ्वीवर येत आहेत का? असेही प्रश्न निर्माण झाले आहेत. अर्थात या सर्व प्रश्नांना अद्याप तरी उत्तर नाही. त्यासंदर्भात संशोधन झाल्यावरच त्यातील सत्य बाहेर येणार आहे.
सई बने