Home » तिबेटींचा डिएनए आणि चीन

तिबेटींचा डिएनए आणि चीन

by Team Gajawaja
0 comment
DNA
Share

चीन हा देश सत्ता आणि आपल्या सीमा वाढवण्यासाठी काय करेल हे सांगता येत नाही. गेल्या अनेक वर्षापासून चीनचा तिबेटवर डोळा आहे.  चीन हा आपला अविभाज्य भाग असल्याचे चीनचे सरकार वारंवार सांगते. पण तिबेट हा स्वतंत्र प्रदेश असल्याचे तिबेट प्रशासन सांगत आहे.  तिबेटच्या वारंवार होणा-या विरोधानंतरही चीननं तिबेटमधील आपला हस्तक्षेप कमी केलेला नाही. उलट आता तर अधिक गंभीर अशा स्वरुपात चीन तिबेटला त्रस्त करत आहे. गेल्या काही वर्षापासून चीन तिबेटी नागरिकांचे डीएनए गोळा करत आहे. ही माहिती खुद्द अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिली असून चीननं 12 लाख तिबेटींचे डीएनए साठवले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. चीन याद्वारे तिबेटी नागरिकांच्या लोकसंख्येला आटोक्यात आणत आहे आणि अन्य प्रयोगही करत असून याचे परिणाम भयावह असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.  

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी काही दिवसापूर्वी चीनच्या अत्यंत हिन अशा कृत्याची माहिती दिली. चीन, तिबेटी नागरीकांचा छळ करीत आहे. अनेक तिबेटी तरुणींची लग्नही चीनच्या तरुणांबरोबर बळजबरीनं लावून देण्यात येत आहेत. मात्र यासोबत चीन तिबेटी नागरिकांचे डीएनएही (DNA) जमा करत असल्याची माहिती आहे. थोडेथोडके नव्हे तर तब्बल 12 लाख तिबेटी नागरिकांचे डीएनए (DNA) चीनच्या लॅबमध्ये गोळा करुन ठेवले आहेत. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी चीनच्या या कृत्याबाबत जाहीर चिंता व्यक्त केली आहे. हा मुद्दा जाहीर कार्यक्रमात उपस्थित करणारे ब्लिंकन हे आतापर्यंतचे सर्वोच्च अमेरिकन अधिकारी आहेत. चीनमध्ये तिबेटी नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात होणा-या डीएनए (DNA) संकलनाच्या प्रसाराच्या अहवालांमुळे आम्ही चिंतित आहोत.  तिबेटच्या लोकसंख्येवर नियंत्रण आणि तिबेटी नागरिकांवर पाळत ठेवण्याची चिनही ही अत्यंत हीन चाल आहे,  अशा शब्दात ब्लिंकेन यांनी चीनचा निषेध केला आहे.  याशिवाय चीन या 1.2 दशलक्ष डीएनए (DNA) नमुन्यांचे काय करेल,  त्यांचा नक्की कशासाठी वापर होणार आहे,  यातून काही अनर्थ तर घडणार नाही ना,  अशी शंकाही व्यक्त केली आहे. ब्लिंकेन यांच्या वक्तव्यानं जगभर खळबळ उडाली आहे.  

सप्टेंबर 2022 मध्ये, सिटीझन लॅबने यासंदर्भात अहवाल दिला होता. चिनी पोलिसांनी बळजबरीनं सहा वर्षांत तिबेट स्वायत्त प्रदेशामध्ये सुमारे 9.20 लाख ते 12 लाख नागरिकांचे डीएनए (DNA) नमुने गोळा केले आहेत. हे आकडे कमी असून यापेक्षाही जास्त नागरिकांचे डीएनए चीनकडे असल्याचे अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात मानवी हक्क संघटनेनंही चिंता व्यक्त केली आहे. चिनी अधिकारी पद्धतशीरपणे तिबेटी नागरिकांचा डीएन गोळा करत असल्याचा अहवाल त्यांनीही दिला आहे.  यामध्ये पालकांच्या संमतीशिवाय पाच वर्षांच्या मुलांचे रक्त नमुनेही घेण्यात येत आहे.  हा प्रकार अत्यंत वेदनामय असल्याचे मानवी हक्क संघटनेनं स्पष्ट केले आहे.  

अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी जाहीर रित्या चीनच्या कृत्याचा उल्लेख केल्यानं तिबेटनं अमेरिकाला पाठिंबा दिला आहे.  इंटरनॅशनल कॅम्पेन फॉर तिबेट या संघटनेने अमेरिकी मंत्र्यांच्या वक्तव्याचे स्वागत केले आहे. चीनने तिबेटचा वापर फक्त आपली मानवी प्रयोगशाळा असाच केला आहे. आतापर्यंत चीन तिबेटवर अनेक प्रकारे अत्याचार करीत होता. मात्र डीएन गोळा करुन तिबेटवर सामाजिक नियंत्रण ठेवण्याचा चीनचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठीच चीन आता तिबेटी नागरिकांवर दबाब टाकत असल्याचे इंटरनॅशनल कॅम्पेन फॉर तिबेट संघटनेने स्पष्ट केले आहे.  आता या संघटनेनं अमेरिकेनं या प्रश्नात लक्ष घालावे अशी विनंती केली आहे. अमेरिकेच्या संससेत दोन्ही सभागृहात तिबेट-चीन संघर्षावर चर्चा करण्याची मागणीही या संघटनेनं केली आहे. 

======

हे देखील वाचा : महिलांना ‘या’ सवयी बनवतील Emotionally Strong

======

डीएनए (DNA) गोळा करण्यासाठी चिनी पोलिस तिबेटी नागरिकांवार अत्याचार करत आहेत.  तसेच लहान मुलांकडून जबरदस्तीनं रक्ताचे नमुने घेण्यात येतात. याला अटकाव केला तर संबंधिताला मारहाणही होते.  हा अत्याचार गेले अनेक वर्ष तिबेटी जनता सहन करत असून आता सर्व जगानं चिनला जाब विचारावा अशी विनंतीही तिबेटमधील मानवी हक्क संवर्धन संस्था करीत आहेत. 1950 च्या दशकात चीनच्या साम्राज्यवादी धोरणाचा बळी ठरलेला तिबेट आताही चीनच्या दबावाखाली आहे.   आता चीन त्याला आपल्या अधिन देश म्हणून सांगत आहे.  तिबेटची  जमीन प्रामुख्याने पठार आहे. याला पारंपारिकपणे बोड किंवा भोट असेही म्हणतात.  या सर्व भागातील नागरिकांवर चिनच्या अत्याचाराचे सावट आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.