दिवाळी चालू आहे. अंधारावर प्रकाशानं विजय प्राप्त करण्याचा हा उत्सव आता भारतातच नव्हे तर जगभरात साजरा होत आहे. अर्थात नव्या शोधाचा आणि विजयाचा हा उत्सव आता वैद्यकीय क्षेत्रातही साजरा होत आहे. अमेरिकेतून दिवाळीच्या सणामध्ये आशादायक बातमी आली आहे. अमेरिकेतील डॉक्टरांनी संपूर्ण डोळ्याची प्रत्योरोपण शस्त्रक्रीया केली आहे. जगभरात करोडो नागरिक डोळ्यांच्या विकारामुळे अंध झाले आहेत. अनेकांना जन्मजात अधू दृष्टी असते. तर काहींना अपघातामुळे डोळे गमवावे लागतात. अशा सर्वांसाठी एक नवा आशेचा किरण या बातमीनं मिळाला आहे. अमेरिकेच्या डॉक्टरांनी वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या या कामगिरीला वैद्यकीय क्षेत्रातील मोठा चमत्कार म्हणून गौरवण्यात येत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील हे मोठे यश दिवाळीच्या काळात मिळाल्यानं त्याला वैद्यकीय दिवाळी असाही गौरव होतोय. (Eye Transplant)
सध्या जागतिक स्तरावर, सुमारे 37 दशलक्ष नागरिक म्हणजेच 3.7 कोटी नागरिक अंधत्वाचा सामना करत आहेत. या नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. बहुतांशी नागरिकांना इतर व्यक्तिंवर अवलंबून रहावे लागते. यामुळे अनेक अंध व्यक्ती हे मानसिक तणावातून जात असतात. अशा सर्वांसाठी संपूर्ण डोळ्याचे प्रत्यारोपण हा आशेचा किरण ठरणार आहे. प्रत्यारोपण ही एक अशी शस्त्रक्रिया आहे ज्यामध्ये अवयव, किंवा पेशींचा समूह एका व्यक्तीकडून दुस-या व्यक्तीला दिला जातो.(Eye Transplant)
अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रीयेमुळे अनेकांना नव्यानं आयुष्य जगण्याचा आनंद मिळाला आहे. आत्तापर्यंत ह्दय, किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रीया मोठ्या प्रमाणात होत आहेत. काही ठिकाणी डॉक्टरांनी महिलांची गर्भाशयाच्या पिशवीचे प्रत्यारोपण केल्याची माहिती आहे. मात्र आता अमेरिकेच्या डॉक्टरांनी संपूर्ण डोळ्याची प्रत्यारोपण शस्त्रक्रीया केली आहे. अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमध्ये ही शस्त्रक्रीया करण्यात आली. याकडे वैद्यकीय शास्त्राचे मोठे यश म्हणून बघितले जाते आहे.
यासाठी संपूर्ण नेत्र प्रत्यारोपण शस्त्रक्रीया म्हणजे काय ? ते आधी समजून घेतले पाहिजे. संपूर्ण नेत्र प्रत्यारोपणामध्ये नेत्रगोलक, रक्तपुरवठा आणि मेंदूला जोडलेल्या ऑप्टिक नर्व्हचे ऑपरेशन केले जाते. आतापर्यंत संपूर्ण नेत्र प्रत्यारोपण शक्य झाले नव्हते. कारण प्रत्यारोपण शस्त्रक्रीया करतांना एका व्यक्तीकडून दुस-या व्यक्तीला सदर अवयव दिला जातो. एका व्यक्तिचा अवयव ठराविक कालावधीत आवश्यक अशी काळजी घेऊन काढला जातो. त्या व्यक्तिका दाता म्हणतात. मग हा अवयव ज्या व्यक्तीला लावायचा आहे, त्याच्या आवश्यक तपासण्या करुन त्याला लावला जातो. प्रत्यारोपण शस्त्रक्रीया ही सर्वाधिक काळ चालणारी शस्त्रक्रीया असते. (Eye Transplant)
त्यासाठी काही तासांचा अवधी लागतो. अत्यंत कठीण असलेल्या या शस्त्रक्रीयेमध्ये कुशल सर्जन आणि त्यांची संपूर्ण टीम यांची मोठी परीक्षाच असते. त्यामुळेच आत्तापर्यंत डोळ्याची प्रत्यारोपण शस्त्रक्रीया करण्यात आली नव्हती. मात्र त्यात न्यूयॉर्कमधील डॉक्टरांच्या टीमला यश आले आहे. यासंदर्भात आलेल्या बातमीनुसार अवयव दात्याचा डावा डोळा त्याच्या चेहऱ्याच्या काही भागांसह काढून टाकण्यात आला होता. त्यामध्ये रक्तपुरवठा करणारे ऊतक तसेच ऑप्टिक नर्व्हचा समावेश होता.
त्या संपूर्ण डोळ्याचे प्रत्यारोपण अर्कान्सास येथील रहिवासी आरोन जेम्सवर करण्यात आले. प्रत्यारोपण शस्त्रक्रीया डॉक्टर एडुआर्डो रॉड्रिग्ज यांच्या नेतृत्वाखाली झाली. त्यांनी हे वैद्यकीय विज्ञानाचे मोठे यश असल्याचे सांगितले आहे. यापूर्वी काही प्राण्यांमध्ये संपूर्ण डोळे प्रत्यारोपण करण्यात आले होते. त्यात काही प्रमाणात यश मिळाले. पण न्यूयॉर्कमध्ये अशा प्रकारे मानवावर पहिल्यांदाच प्रत्यारोपण शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. कोलोरॅडो विद्यापीठाचे प्रोफेसर किआ वॉशिंग्टन यांनीही संबंधित डॉक्टरांच्या टिमचे अभिनंदन करुन हा वैद्यकीय क्षेत्रातील नवा आशादायक विजय असल्याचे सांगितले आहे. (Eye Transplant)
================
हे देखील वाचा : रुपेरी पडद्यावर झळकले आहेत ‘हे’ क्रिकेटपटू
================
अवयव प्रत्यारोपण ही एक अशी वैद्यकीय प्रक्रिया आहे, की ज्यामध्ये एक अवयव एका शरीरातून काढून टाकला जातो आणि अन्य व्यक्तीच्या शरीरात पुनर्स्थित केला जातो. आत्तापर्यंत ज्या अवयवांचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले आहे त्यात हृदय, मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुस, स्वादुपिंड, आतडे, थायमस आणि गर्भाशय यांचा समावेश आहे. जगभरात, मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण सर्वाधिक प्रमाणात होते. त्यानंतर यकृत आणि नंतर हृदयाचे प्रत्यारोपण होते. आता संपूर्ण डोळ्याचीही प्रत्यारोपण शस्त्रक्रीया झाली आहे. ही शस्त्रक्रीया किती प्रमाणात यशस्वी झाली आहे, हे लवकरच स्पष्ट होईल.
सई बने