२०५० पर्यंत एखादे शहरच पूर्णपणे पाण्याखाली जाईल, असे सांगितले तर आश्चर्य वाटेल. पण जगातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक असलेले जकार्ता(jakarta) हे शहर गेल्या अनेक वर्षापासून इंच इंच पाण्याखाली जात आहे. इंडोनेशियाची राजधानी असलेल्या जकार्तामध्ये सुमारे १० दशलक्ष नागरिक रहातात. या सर्वांनाच या शहराला समुद्र कधीही आपल्या पोटात घेईल ही भीती त्रस्त करीत आहे. उत्तर जकार्ताचा ९५ टक्के भाग समुद्रात जाणार असल्याचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. गेल्या काही वर्षापासून येथील समुद्रकिना-यावर रहाणा-या नागरिकांनी त्यांचे निवासस्थान सोडले आहे. कारण या घरांना, इमारतींना मोठ्या भेगा पडून त्यातून पाणी झिरपण्याचे प्रमाण वाढले आहे.
बहुतांशी भागात पावसाळ्यात पूर आल्यास ते पुराचे पाणी ओसरण्यास पंधरा दिवसांचा अवधी लागत आहे. त्यामुळे जकार्ताच्या(jakarta) समुद्रकिनारी रहाणा-या अनेक इमारती ओस पडल्या आहेत. हे शहर दरवर्षी २५ सेंटीमीटरच्या दराने जमीनीखाली जात आहे. अशाच वेगानं शहर पाण्याखाली गेले तर लवकरच हा संपूर्ण भाग नष्ट होणार आहे. राजधानीवर आलेले हे संकट ओळखून इंडोनेशियन सरकारने नव्या राजधानीची घोषणा केली आहे. मात्र त्यामुळे जकार्तामधील नागरिकांवरचे बेघर होण्याचे संकंट दूर होणार नाही. येथील बुहतांशी नागरिक समुद्रावर आधारित व्यवसाय करीत आहेत. त्यांची सर्व संपत्तीही समुद्रात जाणार असल्यामुळे त्यांच्यापुढे मोठा आर्थिक प्रश्न उभा राहिला आहे.
जगातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक असलेले जकार्ता(jakarta) वेगाने समुद्राखाली जात आहे. आजमितीस या शहरातील ४० टक्के जमिन समुद्रसपाटीखाली आली आहे. राजधानीवर आलेला हा धोका ओळखून इंडोनेशिन सरकारने राजधानीसाठी नवीन शहराचे बांधकाम सुरु केले आहे. मात्र त्यामुळे जकार्ताचा प्रश्न अधिक वाढला आहे. कारण जकार्ताच्या आसपास होणा-या गगनचुंबी इमारती आणि मोठ्या प्रकारच्या बांधकामाच्या भारामुळेही हे शहर अधिक जमिनीत जाणार आहे. संपूर्ण जकार्ताच पाणथळ जमिनीवर वसलेले आहे. त्यात अधिक बांधकामे झाल्याने हे संपूर्ण शहर काही वर्षांनी पाण्यात सामावून जाणार आहे.
जकार्ता(jakarta) शहर ज्या जमिनीवर वसवलेले आहे, त्या खालून १३ नद्या वाहत आहेत. तर शहराच्या एका बाजुने जावा समुद्र आहे. भरतीच्यावेळी हा समुद्र आसपासचा सर्वच भाग आपल्या ताब्यत घेत असल्याचे दृष्य आहे. त्यातच पाऊस असेल तर येथील नागरिकांची स्थिती अधिक कठीण होते. पावसाळ्यात पूर आला तर शहराचा मोठा भाग अनेकदा पाण्यात बुडतो. ब-याचवेळा इमारतींचे पहिले मजले याच पुराच्या पाण्याखाली काही दिवस रहातात. त्यामुळे नागरिकांच्या संपत्तीचे मोठे नुकसान होत आहे.
जकार्ताच्या या स्थितीचा इंडोनेशियातील बँकिंग इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे गेल्या २० वर्षापासून अभ्यास करण्यात येत आहे. त्यांनी जकार्ता(jakarta) पुढच्या वीस वर्षात संपूर्णपणे समुद्रात जाणार असा अहवाल दिला आहे. त्यातच जकार्ताच्या समुद्रीभागातील बुडण्याचा वेग दुप्पट आहे. येथील अनेक इमारती नागरिकांनी खाली केल्या आहेत. या इमारतींचे पहिले मजले आता पूर्णपणे जमिनीखाली गेले असून दुसरा आणि काही ठिकाणी तिसरा मजलाही गाळानं भरलेला आहे. समुद्रकाठी असलेले बंगले तर पार ओस पडले आहेत. कारण त्यांचेही समुद्रांच्या लाटांनी मोठे नुकसान केले आहे. सुरुवातीला या बंगल्यांच्या स्विमींग पूलमध्ये भरतीचे पाणी यायचे. आता हे पाणी संपूर्ण बंगल्यांपर्यंत येते. त्यामुळे हे बंगले खाली करण्यावाचून पर्याय नव्हता.
===========
हे देखील पहा : रावी नदीच्या पाण्यासाठी वाद
===========
या सर्वाला कारण म्हणजे, जकार्तामध्ये(jakarta) मोठ्या प्रमाणात होत असलेले बांधकाम आणि पाण्याचा उपसा असल्याचे सांगण्यात येते. जकार्तामध्ये अद्यापही गगनचुंबी इमारती बांधण्यात येत आहेत. हे शहर पाण्याखाली जात असतांना अशा इमारतींना परवानगी का दिली जाते, हा प्रश्न नागरिक विचारत आहेत. या इमारतींना पुरेसा पाणीपुरवठा व्हावा म्हणून जमिनीत मोठे खोदकाम केले जाते. यासर्वांचा परिणाम म्हणजे, जकार्ताची जमिन अधिक भुसभुशीत झाली आहे.
या संकटाचा सामना करण्यासाठी इंडोनेशियन सरकारने राजधानीचे ठिकाण नुसांतारा नावाच्या शहरात हलवण्याची योजना तयार केली आहे. जकार्ताच्या(jakarta) उत्तरेस असलेल्या बोर्नियोच्या पूर्व किनाऱ्यावर हे शहर उभारण्यासाठी बांधकाम सुरू आहे. मात्र या बांधकामामुळेही जमिनीचा पोत धोक्यात आला आहे. जकार्ताचे नागरिक हताशपणे आपली घरे समुद्रात जातांना पहात आहेत.
सई बने