Home » देवीचा जीवघेणा रोग अन तिच्या Vaccine च्या शोधाची ही भन्नाट गोष्ट !

देवीचा जीवघेणा रोग अन तिच्या Vaccine च्या शोधाची ही भन्नाट गोष्ट !

by Team Gajawaja
0 comment
Vaccine Story
Share

एक वायरस ज्याने शतकानुशतके जगाला सळो की पळो करून सोडलं होतं. एक वायरस (Vaccine Story) ज्याच्या संसर्गातून दरवर्षी सुमारे ५० लाख लोक मृत्युमुखी पडायचे अन सुदैवाने या रोगातून जर कुणी वाचलं तर त्यांना कायमचं अंधत्व प्राप्त व्हायचं, त्यांच्या शरीरभर ह्या रोगाच्या खुणा आयुष्यभर राहायच्या. हा म्हणजे ‘Variola Virus’ आणि यामुळे होणारा रोग ‘स्मॉलपॉक्स’. ज्याला भारतात ‘देवीचा रोग’ या नावाने ओळखायचे.(Vaccine Story)

या रोगाने हजारो वर्षे पृथ्वीवर अक्षरशः धुमाकूळ घातलेला होता. याच्या उगमाबद्दल काही ठोस पुरावे नाहीत पण शास्त्रज्ञांच्या मते जेव्हा लोक पहिल्यांदा शेती करायला लागले तेव्हा शेतीकामासाठी, दुग्धव्यवसायासाठी लोकांनी गुरेढोरे पाळायला सुरुवात केली. गुरांशी अगदी जवळून त्यांचा संबंध येऊ लागला. त्याकाळातच गुरांकडून हा विषाणू माणसांकडे आला असावा. काही शास्त्रज्ञांच्या मते उंदरांद्वारे हा विषाणू माणसांपर्यंत पोहोचला असावा. ख्रिस्तपूर्व ११५६ मध्ये या रोगाचा पहिला संदर्भ सापडतो. देवीच्या रोगात ज्या खुणा शरीरावर, चेहऱ्यावर पडतात अगदी तशाच खुणा एका इजिप्शियन मम्मीच्या चेहऱ्यावर आढळून आल्या. भारत आणि चीनच्या पुरातन ग्रंथांमध्येदेखील या रोगाचा उल्लेख आढळतो. इ.स. १७३५ मध्ये या रोगाची साथ जपानमध्ये पसरली होती. त्यामध्ये जपानचे १/३ लोक मारले गेले. इ.स. १५०० मध्ये युरोपीय वसाहतवाद्यांनी हा रोग जेव्हा मेक्सिको आणि अमेरिकेमध्ये नेला तेव्हा या रोगाच्या साथीत तेथील ९०% स्थानिक लोक मारले गेले. अठराव्या शतकात रशियात जन्मणारा प्रत्येक सातव मूल या रोगामुळे मारलं जायचं. या जीवघेण्या रोगाचा सामना करण्याचा प्रयत्न त्यांच्यापद्धतीने त्या त्या काळातील लोकांनी केला. पुरातन काळात भारत आणि चीनमध्ये या रोगापासून वाचण्यासाठी ‘Inoculation’ ची पद्धत प्रामुख्याने वापरली जायची. यात देवीच्या आजाराने ग्रासलेल्या व्यक्तीच्या शरीरातून या विषाणूचा छोटासा अंश घेऊन तो निरोगी व्यक्तीच्या शरीरात सोडला जायचा. यामुळे त्या व्यक्तीच्या शरीरात या रोगाविरुद्ध प्रतिकारक्षमता तयार होऊन रोगाचा धोका टळायचा. ब्राह्मणांचा एक समूह ही प्रक्रिया पार पाडायचा त्यांना टिकादार म्हणून संबोधत असत. परंतू यामध्ये एक धोका होता. बऱ्याच वेळा ज्या व्यक्तींवर ही प्रक्रिया पार पाडली जायची त्यांना या रोगाची संपूर्ण लागण होऊन त्यांचा मृत्यू व्हायचा. ‘Inoculation’ झालेल्या एकूण संखेच्या १% ते २% लोक मृत्युमुखी पडायचे.

संपूर्ण जगामध्ये या रोगाने अक्षरशः हाहाकार माजवला असतांना इंग्लडमधील ‘Gloucestershire’ या गावातील लोकांना मात्र या रोगाची कधीच लागण व्हायची नाही. तिथे काम करणारे शेतकरी, गुराखी यांच्यापासून हा रोग कायम दूरच होता. डॉ. एडवर्ड जेन्नर यांना या गोष्टीचे खूप नवल वाटले. इ.स. १७९५ मध्ये त्यांनी याबद्दल संशोधन करायला सुरुवात केली. स्थानिक लोकांशी जाऊन चर्चा केली. त्यातून असं समोर आलं की इथल्या बहुतांश लोकांना काउपॉक्स नावाचा आजार होतो आणि त्यानंतर त्यांना स्मॉलपॉक्स कधीच होत नाही. डॉ. जेन्नर यांना वाटल की काउपॉक्समुळे शरीरात जी प्रतिकारक्षमता तयार होते त्याच्या मदतीने शरीर स्मॉलपॉक्ससारख्या रोगावर सक्षमपणे मात करत असेल. जर असे असेल तर काउपॉक्स हे स्मॉलपॉक्सशी लढण्याचे एक माध्यम होऊ शकते. पण त्याचं हे फक्त निरीक्षण होतं. त्यासाठी त्यांच्याकडे काही ठोस पुरावा नव्हता. मे १७९६ मध्ये सारा नावाची एक महिला काउपॉक्सची लागण झाल्यामुळे उपचार घेण्यासाठी डॉ. जेन्नर यांच्याकडे आली. जेन्नर यांनी तिच्या शरीरांवरील गाठीतून काउपॉक्सचे विषाणू असलेलं द्रव्य काढून घेतलं आणि तिचा उपचार केला. त्यानंतर त्यांनी त्या द्रव्याने आपल्या माळ्याचा मुलाला, जेम्सला संक्रमित केलं. काही दिवसांनी जेम्सला ताप आला. पण लगेच तो बरा झाला. आता डॉ. जेन्नर यांनी त्याला जाणीवपूर्वक स्मॉलपॉक्सच्या विषाणूने संक्रमित केलं. जर खरोखरच काउपॉक्स स्मॉलपॉक्सशी लढण्यास मदत करत असेल तर जेम्सला काहीही होणार नाही असा त्यांचा अंदाज होता. आणि अगदी तसच घडलं. जेम्सला थोडासा ताप आला आणि त्यानंतर तो ठणठणीत बरा झाला. इथे डॉ. एडवर्ड जेन्नर यांनी जगातल्या पहिल्या Vaccine चा शोध लावला होता.(Vaccine Story)

जीवघेण्या स्मॉलपॉक्सशी लढण्याचा मार्ग जेन्नर यांनी शोधला होता. पण त्यांच्या या शोधाला जगाने सहजासहजी मान्यता दिली नाही. ‘रॉयल सोसायटी ऑफ लंडन’ या संस्थेने जेन्नर यांचे सर्व दावे फेटाळून लावत त्यांना वेड्यात काढलं. डॉ. जेन्नर मात्र आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले. त्यांनी अजून माहिती गोळा केली, संशोधन केले आणि ‘An enquiry into the causes and effects of the variola vaccinae’ हे पुस्तक लिहून आपल्या संशोधनाबद्दल जगाला सांगितलं. इतर डॉक्टरांनी जेन्नर यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला पण लोकांना ही गोष्ट समजावून सांगणं आणि त्यांना Vaccination साठी प्रवृत्त करण बिलकुल सोप्पं नव्हतं. Vaccination करणे म्हणजे ईश्वराच्या विरोधात जाणे, काउपॉक्सचं द्रव्य माणसांना गायी करून टाकेल. Vaccination न करण्याची एक ना अनेक कारणे लोकांकडे होती.(Vaccine Story)

आपले संशोधन जगापर्यंत पोहोचून त्याचा सर्वांना फायदा व्हावा यासाठीदेखील जेन्नर यांनी अतोनात प्रयत्न केले. स्मॉलपॉक्सला रोकण्यासाठी काउपॉक्सला पसरवणं फार गरजेचं होतं. काउपॉक्स जगभरात पसरवण्यासाठी त्यांनी काउपॉक्सचं द्रव्य जहाजांमधून वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलं. प्रवास जर दूरचा असेल तर त्या द्रव्यातील विषाणू वाटेतच मरून जात. त्यामुके द्रव्य पाठवण्याची ही कल्पना दूरवरच्या देशांसाठी लागू होत नव्हती. तेव्हा त्यांनी लहान मुलांना काउपॉक्सची लागण करवून जहाजाच्या मदतीने दूरच्या देशात पाठवलं. भारतामध्ये स्मॉलपॉक्सची पहिली लस इ.स. १८०२ मध्ये आली. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असणाऱ्या देशात प्रत्येकापर्यंत ही लस पोहोचवण सोप्पं नव्हत. इ.स. १९७४ साली भारतात देवीची भयंकर साथ पसरली. या कालावधीपर्यंत जगातील बहुतांश देशामध्ये लसीकरणाच काम पूर्ण झालेलं होतं. साथीच्या फक्त पाच महिन्याच्या कालावधीत सुमारे १५००० पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले. तेव्हा जगभरातील स्मॉलपॉक्सच्या एकूण रुग्णांपैकी जवळपास ८५% रुग्ण हे भारतातील होते. (Vaccine Story)

=======

हे देखील वाचा : ‘या’ माध्यमातून पाहता येणार प्रभू श्रीरामांचे सुंदर रुप

=======

इ.स. १९७० मध्ये जागतिक आरोग्य संघटना आणि भारत सरकारने भारतातून स्मॉलपॉक्स पूर्णपणे संपुष्टात आणण्याची योजना आखली. त्याअंतर्गत इ.स. १९७१ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने चार अधिकाऱ्यांची एक तुकडी भारतात पाठवली. त्यांनी घराघरात जाऊन लोकांना लसीकरणाचे महत्व समजावले, लसीकरणासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यात आले, पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लोकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले, जर कुणी स्मॉलपॉक्सच्या रुग्णाबद्दल माहिती दिली तर त्यांना सरकातर्फे इनाम देण्यात येऊ लागला, रेडीओच्या माध्यमातून लोकांना लसीकरणाचे महत्व वारंवार समजावण्यात येऊ लागले, लसीकरणाच्या सोप्प्या पद्धती विकसित करण्यात आल्या. याचाच परिणाम म्हणून इ.स. १९७५ मध्ये भारतातून तर इ.स. १९७७ मध्ये जगातून स्मॉलपॉक्स संपूर्णपणे नष्ट झाला. १९७७ मध्ये सोमालियात याचा शेवटचा रुग्ण आढळून आला होता. जागतिक आरोग्य संघटनेने इ.स. १९७९ मध्ये स्मॉलपॉक्स जगातून पूर्णपणे नष्ट झाल्याचे जाहीर केले. स्मॉलपॉक्सच्या विषाणूचे दोन samples अजूनही जगात आहेत. अमेरिकेत ‘US centre for desease control and prevention’ आणि रशियात ‘Russian state research centre of virology and biotechnology’ भविष्यातील संशोधनासाठी या दोन ठिकाणी अगदी सुरक्षितपणे हे samples ठेवण्यात आलेले आहेत. डॉ. एडवर्ड जेन्नर यांच्या संशोधनाने जग कायमचं बदलून टाकलं. त्यांच्यामुळे करोडो लोकांचे प्राण वाचले आणि आजही वाचत आहेत. विशेष म्हणजे या रोगाचा इलाज अजूनही आपल्याकडे नाही आणि जेन्नर यांच्यामुळे तो शोधण्याची आवश्यकता देखील कधी पडली नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.