धर्मांवरून, जमिनीवरून, सत्तेसाठी आणि शांतीसाठी जगभरात युद्ध झाली आहेत. युद्धांचा इतिहासच तसा आहे. कोणतच युद्ध विनाकारण होतं नाही, त्यासाठी अनेक कारणं असतात. आजची गोष्ट अशा युद्धाची आहे. जे राजस्थानच्या दोन संस्थान लढलं गेलं, ज्यामध्ये हजारो सैनिक मारले गेले. हे युद्ध जमीन, धर्म, सत्ता यासाठी झालं नव्हतं. हे युद्ध झालं होतं एका फळासाठी. ते फळ होतं कलिंगड. आता युद्ध करणारे दोन संस्थानं होते त्यांना एक कलिंगड विकत घेण्यासाठी काय अवघड होतं? मग त्यासाठी युद्ध का केलं? हेच जाणून घेऊया. ही गोष्ट सुरू होते १६४४ साली. राजस्थानमध्ये तेव्हा दोन संस्थानं होती. हे दोन्ही संस्थानं मुघल साम्राज्याच्या अधीन होते. बिकानेर आणि नागौर. बिकानेरचे तेव्हाचे शासक होते राजा करणसिंग, तर नागौर संस्थानाचे शासक होते राव अमरसिंह. बिकानेर संस्थानाची सीमा होती सीलवा गावापर्यंत, तर नागौर संस्थानाची सीमा सुद्धा सीलवाच्या सीमेला लागूनच होती. (Watermelon)
नागौर सीमेत असणाऱ्या गावाचं नाव होतं जाखणिया गांव. आता झालं काय, की बिकानेरच्या सीलवा गावात सीमेलगदच एक टरबूजाची वेल उगवली. आता त्या वेलीकडे सुरुवातीला कोणी लक्ष दिलं नाही. ती वेळ हळूहळू वाढत होती. वाढत वाढत ती पसरत गेली, आणि बिकानेर संस्थानाची सीमा ओलांडून ती पोहचली नागौरच्या जाखणियां गावाच्या शेतात. इथपर्यंत दोन्ही गावांमधील लोकांचं लक्ष त्या वेलीकडे नव्हतं. पण जसजसं त्या वेलीवर टरबूज पिकू लागलं, तसं दोन्ही गावांमधील लोकांच लक्ष त्या टरबुजाकडे गेलं. टरबुजाची वेल उगवली होती बिकानेर संस्थानात आणि त्या वेलीवर फळ आलं होतं, पण ते फळ नागौर संस्थानच्या सीमेत होतं. आता, आमच्या जमिनीत वेल उगवली म्हणून सीलवा गावतले लोकं त्या टरबूजावर हक्क सांगत होते, तर आमच्या जमिनवर फळ आलं म्हणून जाखणिया गावातले लोकं टरबूजावर हक्क सांगत होते. हक्क सांगत होते तिथंपर्यंत ठीक होतं, पण हळूहळू या दोन्ही गावांमध्ये टरबूजावरुन वाद सुरू झाला. दोन्ही गावांतील लोकं रात्रीसुद्धा टरबूजाच्या रक्षणासाठी पहारा देऊ लागले. (Watermelon)
अखेर या वादाची माहिती दोन्ही संस्थानांच्या राजदरबारात पोहचली. एक टरबूजासाठी सुरू झालेला वाद एक युद्धात बदलला. या युद्धात बीकानेरच्या सैन्याचं नेतृत्व रामचंद्र मुखियांनी केलं, तर नागौरच्या सैन्याचं नेतृत्व सिंघवी सुखमल यांनी केलं. त्या वेळेस बिकानेरचे राजा करणसिंह राज्याबाहेर गेले होते, आणि नागौरचे राजा राव अमरसिंह राठौड़ मुगलांच्या सैन्याचा भाग म्हणून एक मोहिमेवर गेले होते. दोन्ही राज्यांच्या राजांना या युद्धाबद्दल कल्पनासुद्धा नव्हती. टरबूज युद्ध सुरू झालं होतं. या युद्धात बिकानेर नागौर सैन्यावर भारी पडत होतं. जेव्हा नागौरचे राजा राव अमरसिंह राठौड़ मोहिमेवरुन परतले, तेव्हा त्यांना या टरबूजावरून सुरू झालेल्या युद्धाबद्दल कळालं. त्यांनी युद्ध थांबवण्यासाठी मुगली दरबारात अर्ज केला, पण तोपर्यंत युद्धात हजारो सैनिक मरण पावले होते. (Watermelon)
======
हे देखील वाचा : अमेरिकेत दिवाळीनंतर कोण साजरी करणार दिवाळी !
====
शेवटी या युद्धात नागौरच्या सैन्याचा पराभव झाला, आणि ते टरबूज बिकानेर संस्थानाला मिळालं. या युद्धाबद्दल जास्त माहीती इंटरनेटवर उपलब्ध नाहीये, पण हे युद्ध “मतिरे की राड” म्हणून ओळखलं जात. ‘मतिरा’ म्हणजेच टरबूज आणि ‘राड’ म्हणजेच राडा भांडणं. असं हे किरकोळ कारणावरुन झालेलं युद्ध. तसं पाहिलं तर, या दोन्ही संस्थांनामध्ये आधीपासूनच एकमेकांबद्दल शत्रुत्व असणार. टरबूज फक्त निमित्त मात्र ठरलं असणार. आता, त्याबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याने हे युद्ध टरबूज युद्ध म्हणजे मातिरे की राड म्हणूनच प्रसिद्ध झालं. जर दोन्ही गावांनी संयमाने हा प्रश्न सोडवला असता तर कदाचित हे युद्ध टळलं असतं. पण एकदा माणसाच्या डोक्यात युद्ध स्वार झालं तर त्याचा अंत विध्वसंच असतो. (Watermelon)