आंध्र प्रदेशच्या श्री सत्यसाई जिल्ह्यातील लेपाक्षी मंदिराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच भेट दिली. लेपाक्षी येथील वीरभद्र मंदिरात पंतप्रधानांनी ‘श्री राम जय राम’‘ हे भजन गायले. पंतप्रधानांचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. सोबतच लेपाक्षी मंदिराबाबतची माहितीही जाणून घेतली जात आहे. हजारो वर्षाचा इतिहास असलेले हे मंदिर तमाम हिंदुच्या आस्थेचे स्थान आहे. येथील देवी भद्रकालीचे प्रसन्न रुप बघण्यासाठी भक्तांची गर्दी होतेच. पण यासोबत याच ठिकाणी माता सितेचे अपहरण करुन लंकेत जाणा-या रावणासोबत जटायुने युद्ध केले होते. (Lepakshi Temple)
शिवाय हे मंदिर म्हणजे, भारतीय वास्तुशास्त्राचा अजोड नमुना आहे. या मंदिरातील खांब हेवत लटकलेल्या स्थितीता आहेत. हजारो वर्षांचे हे रहस्य अद्यापही कोणाला उलगडता आलेले नाही. शिवाय साक्षात प्रभू श्रीराम आणि मात सीतेच्या हाताचे ठसे येथे असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच लेपाक्षी मंदिरात जगभरातून भाविक येतात.
भारताच्या प्रत्येक कानाकोप-यात भव्य आणि विशाल अशी मंदिरे आहेत. असेच एक विशाल मंदिर आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात आहे. या मंदिराची सर्वात रहस्यमय गोष्ट म्हणजे या मंदिरातील खांब हवेत लटकलेल्या स्थितीत आहे. आजपर्यंत या लटकलेल्या खांबाचे रहस्य कोणालाही उलगडलेले नाही. या खांबामुळेच लेपाक्षी मंदिराला हॅंगिग पिलर टेंम्पलही म्हटले जाते. हे लेपाक्षी मंदिर म्हणजे, सुंदर खांबांचे मंदिर आहे. या मंदिरात एकूण 70 खांब आहेत. (Lepakshi Temple)
भारतीय वास्तुकलेचा अजोड नमुना असलेले हे मंदिर रामायण काळापेक्षाही पुरातन असल्याचे सांगण्यात येते. या मंदिराची ओळख ही त्यातील लटकलेल्या खांबांमुळे आणि मंदिरातील अप्रतिम अशा नक्षीकामामुळे आहे. लेपाक्षी मंदिराचे खांब आकाशस्तंभ म्हणूनही ओळखले जातात. या खांबाखालून एखादे वस्त्र बाहेर काढल्याने घरात सुख-समृद्धी येते, अशी श्रद्धा आहे. यामुळेच येथे येणारे भाविक या खांबांच्या खालून वस्त्र काढतात आणि त्याती पुजा करतात.
या मंदिरातील प्रमुख देवता म्हणून वीरभद्र यांची पूजा करण्यात येते. भगवान वीरभद्र हे भगवान शंकराचे उग्र रूप आहे. दक्षाच्या यज्ञानंतर भगवान शंकराचे उग्र रुप समोर आले, तेच वीरभद्र महाराज. येथे असलेल्या देवीला भद्रकाली म्हणतात. देवी भद्रकालीचे रुपही अत्यंत सुंदर आहे. या देवीला फुलांनी कायम सजवण्यात येते. हे मंदिर लेपाक्षी शहराच्या दक्षिणेला असलेल्या एका टेकडीवर, ग्रॅनाईट खडकावर उभारले आहे. त्याचा आकार कासवासारखा आहे. मंदिर 1530 मध्ये बांधले गेल्याचा उल्लेख काही ग्रंथात आहे. विजयनगरच्या राजासाठी काम करणाऱ्या विरुपण्णा आणि विरन्ना नावाच्या दोन भावांनी हे मंदिर बांधल्याचे सांगण्यात येते.
मात्र अगस्त्य ऋषींनीही हे मंदिर बांधले असाही उल्लेख काही ग्रंथांत आहे. प्रत्येक काळात मंदिराच्या उभारणीसाठी तत्कालीन राजा आणि ऋषींनी सहय्य केल्याची माहिती आहे. या मंदिराला त्रेतायुगाचा साक्षीदार मानले जाते. त्रेतायागातील या मंदिरात रामायण, महाभारत आणि पुराणातील महाकथांमधील अनेक दृष्य बघायला मिळतात. या मंदिरापासून सुमारे 200 मीटर अंतरावर भगवान शंकराचे वाहन असलेल्या नंदिची मोठी प्रतिमा आहे. ही प्रतिमा जगातील सर्वात मोठी नंदीप्रतिमा म्हणूनन ओळखली जाते. लेपाक्षी मंदिराची स्थापत्यशास्त्रानुसार तीन भागात विभागणी झाली आहे. सभागृह, गर्भगृह आणि मंदिराची तटबंदी. या मंदिराला तीन दरवाजे आहेत. मंदिराच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर अनेक शिल्पे आणि चित्रे आहेत. गंगा आणि यमुना देवींच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या सभामंडपाचे बाह्य खांब कोरलेले आहेत. (Lepakshi Temple)
===========
हे देखील वाचा : तुम्ही प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिता का? अभ्यासातून झालाय हा धक्कादायक खुलासा
===========
सभामंडपातील खांबांच्या शेजारी ब्रह्मदेवाची मुर्तीही आहे. शिवाय गायन आणि नृत्य करणा-या अप्सरांच्यांही मुर्ती आहेत. मंदिराच्या सभामंडपाच छत पूर्णपणे भित्तीचित्रांनी कोरलेले आहे. त्यात महाभारत, रामायण आणि पुराणातील अन्य दृश्य चित्तरण्यात आली आहेत. मंदिराच्या भिंतीवरील चित्रेही भाविकांना मोहून घेतात. यात भगवान शंकराच्या 14 अवतारांची भित्तिचित्रे आहेत. या मंदिरातीलगर्भगृहात एक गुहा कक्षही आहे. येथे अगस्त्य ऋषींनी वास्तव्य केल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या गर्भगृहात तिरुपती येथील कृष्णदेवरायांच्या कांस्य पुतळ्याप्रमाणे राजेशाही वस्त्रे परिधान केलेले आणि शिरोभूषण घातलेले विरुपण्णा आणि विरन्ना याचे लोभस रुप बघण्यासाठी भाविकांची सदैव गर्दी असते. या मंदिराची वास्तुकला आणि त्याचा हजारो वर्षाचा इतिहास आता पुन्हा पंतप्रधान मोदी यांच्या दौ-यानंतर पुन्हा चर्चेत आला आहे.
सई बने