Home » नागकुंडातील पाण्याचे रहस्य !

नागकुंडातील पाण्याचे रहस्य !

by Team Gajawaja
0 comment
Nagkund
Share

भारतातील अनेक मंदिरे आजही रहस्यमयी आहेत. या मंदिरांचा हजारो वर्षांचा इतिहास आहे. या मंदिरांना जोडून अनेक गुढ कथा सांगितल्या जातात. असेच एक नागकुंड चमत्कारिक नागकुंड म्हणून ओळखले जाते. हे नागकुंड उत्तरप्रदेशमध्ये आहे. उत्तरप्रदेशच्या मिर्झापूर जिल्ह्यात असलेला विंध्य पर्वत हा रहस्यांचे केंद्र मानला जातो. या विंध्याचलमध्ये असे अनेक तलाव आहेत, ज्यांचा उल्लेख पौराणिक ग्रंथांमध्ये आहे. याच विंध्य पर्वतावर नाग कुंड आजही अस्तित्वात आहे, ज्याला पृथ्वीपासून पाताळात जाण्याचा मार्ग म्हणून ओळखले जाते. हा मार्ग सध्याच्या विंध्याचलमधील पंपापूर या शहरात आहे. सध्या चालू असलेल्या श्रावण महिन्यात या नागकुंडावर भक्तांची मोठी गर्दी होते. हे नागकुंड नागराजानं आपल्या राण्यांच्या स्नानासाठी बांधल्याची कथा येथे सांगितली जाते. या कुंडातील पाणी हे औषधी असून येथे स्नान केल्यास सर्व रोगांपासून मुक्ती मिळते, अशी भावना भक्तांची आहे. त्यामुळेच या नागकुंडात स्नान करण्यासाठी अनेक भाविक गर्दी करतात. (Nagkund)

माता विंध्यवासिनी हे जागृत स्थान आहे. याच माता विंध्यवासिनीच्या मंदिराच्या जवळच असलेले पंपापूर हे नागवंशीय राजांची राजधानी असल्याची माहिती आहे. अडीच हजार वर्षांपूर्वी येथे नागवंशीय राजांचे राज्य होते, असे सांगितले जाते. माता विंध्यवासिनी ही नाग वंशाच्या राजांची कुलदेवी म्हणून पूजली जात होती. त्याच नागवंशीयांनी या नागकुंडाला बांधले. या नागकुंडाचा वापर करत नागवंशीय पाताळात देखिल जात असत. त्यामुळे आजही पाताळलोकापर्यंत जाणारा हा मार्ग म्हणून नागकुंड ओळखले जाते. यासंदर्भात बावन पुराणातही उल्लेख आहे. नागवंशी राजा दानव यांनी नागकुंड बांधल्याचा उल्लेख यात आहे.

यानुसार दानव राजाला ५२ राण्या होत्या. या राण्यांसाठी राजानं भव्य कुंड बांधले. प्रत्येक राणीसाठी स्वतंत्र पाय-या बांधण्यात आल्या. नागकुंडात जाण्यासाठी ५२ पाय-यांचे मार्ग आहेत. या नागकुंडाबाबत अनेक आख्यायिका आहेत. श्रावण महिन्यात या कुंडाची पुजा आणि त्यात स्नान करण्यासाठी मोठी गर्दी होते. या कुंडात कालसर्पयोग नष्ट होतो, असेही सांगितले जाते. या कुंडाभोवती सात विहिरी आहेत. या विहिरींचा तळ शोधण्याला अद्यापही यश आलेले नाही. या कुंडात नागा वंशातील राजांचे प्रतीक म्हणून कोरलेले लेखाचे चित्र आहे. या कुंडाचा आणि त्यातील या शिलालेखांचा अभ्यास करण्यासाठी अनेक अभ्यासकही येथे येतात. (Nagkund)

==============

हे देखील वाचा : चमत्कारी नागवासुकी मंदिर

===============

मिर्झापूर जिल्ह्यातील विंध्याचलच्या खो-यात असलेल्या या दोन हजार वर्ष जुन्या नागकुंडाबाबत आणखी एक आख्यायिका म्हणजे, येथून गरजेच्या वस्तू मिळत असे, सांगितले जाते. नागकुंडाची उभारणी केली, तो दानवराजा उदार होता. कोणीही कितीही दान मागितले तरी राजा देत असे. प्राचीन काळी प्रवासी जेव्हा कुंडामध्ये आपल्या गरजेच्या वस्तू मागत असत. त्या काही काळानंतर कुंडाच्या पाण्यावर तरंगतांना दिसत असत. या कुंडाच्या आसपासच्या गावात असेही सांगितले जाते की, गावात एखादे लग्न असेल तर लग्न घरातील मंडळी या कुंडाजवळ जाऊन प्रार्थना करत असत. मग दुस-या दिवशी या कुंडात लग्नासाठी आवश्यक अशा सर्व वस्तू तंरगत असत. यातील भांड्यांचा वापर करुन झाला की गावकरी ही भांडी पुन्हा कुंडाच्या पाण्यात सोडत असत. ती पुन्हा कुंडामध्ये गायब होऊन जात. मात्र काही वर्षांनंतर लोकांनी वस्तू परत करण्यास टाळाटाळ केली, त्यानंतर या कुंडातून वस्तू येणे बंद झाल्याचे सांगितले जाते. (Nagkund)

सद्यस्थितीत हा कुंड स्वच्छ करावा आणि त्याची डागडुजी करावी अशी मागणी करण्यात येत आहे. या कुंडाची पुजा करण्यासाठी श्रावण महिन्यात येथे हजारो नागरिक येतात. माता विंध्यवासिनीच्या मंदिरात येणारे भाविक हमखास या कुंडाला भेट देतात. त्यातील पाण्यानं स्नान करतात. मात्र आता या कुंडामध्ये काही ठिकाणी कचराही टाकत असल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असते. त्यामुळे अनेक भाविक इच्छा असूनही कुंडाच्या पाण्यात स्नान करीत नाहीत. दोन हजार वर्षापूर्वीचा हा वारसा आता दुर्लक्षित झाला आहे. या कुंडाच्या पाय-याही मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे श्रावणात मोठ्या संख्येनं भाविक आल्यावर येथे अपघात होण्याची भीतीही आहे. (Nagkund)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.