Home » अवघ्या सात वर्षात नाशिकमध्ये उभं केलं मानव निर्मित जंगल; आता जंगलात आढळतात बिबटे, मोर, तरस

अवघ्या सात वर्षात नाशिकमध्ये उभं केलं मानव निर्मित जंगल; आता जंगलात आढळतात बिबटे, मोर, तरस

by Team Gajawaja
0 comment
The Jungle Man Shekhar Gaikwad
Share

पावसाळा आला म्हणजे झाडं लावण्याचा उत्साह अगदी गल्लीबोळात दिसतो. झाडं लावण्यासाठी आता सारेच उत्सुक असतात. अनेकजण रस्त्यांच्या कडेला, इमारतीच्या कोपऱ्यात, आपल्या गॅलरीत फुल झाडं लावतात. ही उत्सुकता, उत्साह वाखाणण्याजोगा आहे. मात्र यातून पर्यावरणाचा समतोल सांभाळला जात आहे, असं काही म्हणता येत नाही. 

नुसतं झाड लावलं म्हणजे पर्यावरणाला मदत झाली, असं म्हणता येत नाही, याची जाणीव मला नाशिकमध्ये मानव निर्मित देवराई जंगलाला भेट दिल्यानंतर झाली. पर्यावरण प्रेमी शेखर गायकवाड, यांना ‘जंगल मॅन’ अशा नावाने ओळखलं जातं. त्यांनी साकारलेला उपक्रम पाहणं म्हणजे एक अनोखा अनुभव आहे. (The Jungle Man Shekhar Gaikwad)

5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनी नाशिकमधील अनेक वृत्तपत्रांनी देवराईच्या उपक्रमाची माहिती दिली होती. हा उपक्रम प्रत्यक्षात पाहायला पाहिजे असा विचार आला आणि शेखर गायकवाड यांच्याशी संपर्क करून त्यांचा उपक्रम पाहायला गेलो. यावेळी माझ्यासोबत एका मित्राला घेऊन गेलो की, जे या उपक्रमाच्या सुरुवातीच्या क्षणांचे साक्षीदार होते. शेखर गायकवाड ही तिथे पोहोचले होते. समोर एक हिरवागार डोंगर दिसत होता. फाशीचा डोंगर नावानं प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी वनविभागाची जमीन आहे. या 100 एकर जमीनीपैकी 55 एकर जमिनीवर जंगल उभे राहिले आहे.

आपण नाशिक शहरात आहोत याची जराही कल्पना गेटमधून आत शिरल्यानंतर येत नव्हती. आम्ही पायात शूज घातले होते. आम्हाला वाटलं की असतील काही झाडं, आमराईल सारखं वैगरे मात्र तिथं गेल्यावर त्यांनी सांगितलं की, शूज काढा आणि इथं असलेले गमबूट (मोठे शूज) घाला. आता आम्हाला पूर्ण कल्पना आली की, आम्ही खऱ्या जंगलात प्रवेश करत आहोत.

चालता बोलता आमचा जंगल प्रवास सुरू झाला. जंगल निर्मितीची कहाणी ऐकताना मध्येच मोरांची म्याssव, म्याssव, अन्य पक्ष्यांचे आवाज जंगलाचा पूर्ण अनुभव देत होते. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेल्या शेखर गायकवाड यांनी फाशीच्या डोंगावर वनविभागाने एक्झॉटिक झाडं लावल्याचं पाहिलं होतं. अशा झाडांमुळे केवळं हिरवळ दिसते मात्र त्यात पर्यावरण फुलत नाही, उलट धोके अधिक वाढतात हे त्यांच्या लक्षात आलं. ही झाडं वगळता बराचसा भाग हा मोकळाच होता. म्हणजे एक प्रकारचं मृत जंगल होतं. 

अगदी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पाझर तलावाच्या बाजूनं डोंगरावर उभ्या असलेल्या व्यक्तीही स्पष्ट दिसायच्या अशी स्थिती होती. ही जागा जर आपल्याला उपलब्ध झाली, तर आपण इथं जंगल उभारू शकू या विचारानं शेखर गायकवाड यांना पछाडलं होतं. अखेर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांनी परवानगी मिळवली आणि वनविभागाचे नियम पाळून 5 जून 2015 रोजी या उपक्रमाची सुरुवात केली. हा केवळ दिखाऊ उपक्रम नव्हता, तर ही धरणी मातेची पूजाच होती.

====

हे देखील वाचा – मुंबईतल्या चोर बाजाराला ‘चोर बाजार’ हे नाव कधी आणि कसं पडलं? 

====

शेखर गायकवाड यांचा भाव इतका सच्चा होता की, इथं रोपं लावण्यासाठी त्यांनी नाशिककरांना आवाहान केल्यानंतर या फाशीच्या डोंगरावर सुमारे 11 हजार लोकांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत वृक्षारोपण केलं. यावेळी शेखर यांनी सर्वांना सांगितलं होतं की, रोप आपल्या मनाने आणायचं नाही, तर मी सांगेन ते आणायचं किंवा मी देईन तेच लावायचं. त्यांची दीर्घदृष्टी होती. त्यांना फक्त दिखाऊ वृक्षारोपणाचा कार्यक्रम करायचा नव्हता, तर एक आख्खं जंगल निर्माण करायचं होतं. म्हणून जंगलात एकाच प्रकारची झाडं नसतात हे त्यांनी ओळखून आधीच विविध प्रकारची भारतीय हवामानाला पूरक अशी रोपं लावली. (The Jungle Man Shekhar Gaikwad)

एवढं करून ते थांबले नाहीत, तर यातून जोडले गेलेल्या काही सहकाऱ्यांसह त्यांनी दर शनिवार-रविवारी सकाळी 8 ते संध्याकाळी 4 पर्यंत वृक्षांना पाणी घालणं, खतं घालणं, नको असलेल्या वनस्पती तृण काढणं, वाढवलेलं गवत कापून त्याला नियंत्रित ठेवणं त्यांनी सुरू ठेवलं. दोन तीन वर्षांत झाडांची वाढ चांगली व्हायला लागली. वड, पिंपळ, आंबापासून विविध भारतीय वृक्ष इथं वाढू लागले. या प्रदेशनिष्ठ वृक्षांमुळे इथं फुलपाखरं, चिमण्या, कावळे असे पक्षी दिसायला लागले.

लोकांचं, कंपन्यांचं लक्ष त्यांच्या या उपक्रमाकडे आकर्षिलं गेलं. अनेकजण त्यांना जमेल तशी आर्थिक मदत करत गेले. त्यासोबत वाढदिवसाच्या दिवशी या जंगलात नवं झाड लावणं किंवा देवराईत पडेल ते काम करण्यास येऊ लागले. खुद्द शेखर गायकवाड स्वत:च्या कमाईतले रुपये या उपक्रमासाठी बाजूला काढत होते. हे वृक्ष लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवून लावली आहेत तेव्हा त्याची काळजी आपण कायम घेतली पाहिजे. हे लक्षात घेत त्यांनी कोणत्याही शनिवार – रविवारी सुट्टी न घेता देवराईत हजेरी लावली. 

इथं त्यांनी दोन वॉचमन ठेवले जे त्यांच्यासोबत इथं काम करतात. या देवराईचं रक्षण करतात. त्याचबरोबर सुजाता काळे ताईंचीही गायकवाड यांना मोठी साथ लाभली आहे. त्या देखील देवराईसाठी आवर्जून वेळ काढतात. गेल्या सात वर्षात आठ दहा लोकं सतत सोबत असल्यामुळे झाडं चांगली वाढली. आता जवळपास दाट जंगल वाटू लागलं आहे. आता इथं वड-पिंपळाची संख्या पूर्ण झाली असल्यानं आता अन्य झाडं लावली जात आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. (The Jungle Man Shekhar Gaikwad)

त्यानंतर शेखरजींनी जंगलात फिरता फिरता विविध औषधी वनस्पतींची झाडं दाखवली. त्यासोबतच त्यांनी जंगलात असणाऱ्या वेली देखील इथं लावल्याचं सांगितलं. दोन तीन तास जंगलातून चालता चालता अचानक एक लांडोर दिसला. बराच वेळ तो आमच्या सोबतच चालत होता. बोलता बोलता शेखरजी म्हणाले आता या देवराई जंगलात बिबट्याही येतो. दोन तीन वेळा दिसला. तरसही आहे. आम्ही थोडं दचकून विचारलं बिबट्या! ते म्हणाले अहो घाबरू नका, इतकी माणसं असताना तो समोर येणार नाही. मात्र बिबट्या, तरस असे प्राणी आले म्हणजे पर्यावरणीय साखळी पूर्ण झाली आणि खऱ्या अर्थानं हे आता जंगल झालं आहे.

त्यांच्या सोबतचा हा जंगल प्रवास करताना समजलं कोणतंही झाड कुठेही लावू नये. केवळ हिरवं दिसलं म्हणजे पर्यावरण टिकलं असं नाही. तिथं प्रदेशनिष्ठ विविध वृक्ष वेलींसोबत किटक, फुलपाखरं, प्राणी एकत्र वाढू लागले म्हणजे जैवविविधता वाढली, तर खऱ्या अर्थानं पर्यावरण फुललं. (The Jungle Man Shekhar Gaikwad)

जंगलातून बाहेर यावसं वाटत नव्हतं. पण वेळेच्या कमतरतेमुळे बाहेर आलो. इथं कुणीही, कधीही येऊ शकत नाही. तर अभ्यासक, पर्यावरणप्रेमी, जंगलात काम करण्यासाठीच तेही शनिवार-रविवारीच येऊ शकतात असं त्यांनी सांगितलं. पुन्हा असेच या जंगलात सेवेसाठी येत जाऊ असा निश्चय करून आम्ही बाहेर पडलो. पण बाहेर पडताना संत तुकाराम महाराजांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती’, हा अभंग डोक्यात घोळत होता. संतांच्या अभंगातील जैवविविधता या देवराईत शेखर गायकवाड फुलवत असल्याचं जाणवत होतं. या जंगलात फिरण्यासाठी नाही, तर सेवा करण्यासाठी एखाद्या शनिवार-रविवारी नक्की या! निसर्ग तुम्हाला भरभरून आनंद देईल.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.