Home » भव्य प्रेमकहाणीची साठ वर्षे

भव्य प्रेमकहाणीची साठ वर्षे

by Correspondent
0 comment
Share

मुगले आजम हा चित्रपट 5 ऑगस्ट रोजी साठ वर्षाचा होईल. अजरामर संगीत, दिलिप कुमारचा अजोड अभिनय… मधुबालाचं सौदर्य… यांनी सजलेला भव्य…दिव्य….शानदार असा हा चित्रपट तयार व्हायला 14 वर्ष लागली. एक शहजादा आणि त्याची सौदर्यवती दासी….यांची प्रेमकहाणी…त्यात मुगल साम्राज्याची परंपरा…दुःखाची किनार असलेली ही प्रेमकहाणी भव्य अशा मुगले आजमनं अजरामर केली आहे. 

अमर प्रेमाची साठी

हिंदी चित्रपट सृष्टीचा इतिहास एका चित्रपटाशिवाय कधीही परिपूर्ण होणार नाही…हा चित्रपट म्हणजे, मुगले आजम.  5 ऑगस्ट 1960 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला.  मुगले आजम बनवतांना जेवढे रेकॉर्ड झाले तेवढेच तो प्रदर्शित झाल्यावर झाले.  मुगल शहजादा आणि त्याची कनिज यांच्या प्रेमाची ही दुःखद दास्तान….पण के आसिफ या वेड्या दिग्दर्शकाच्या हट्टापायी ही दुःखी प्रेमकहाणी सोनेरी झाली.  आज चित्रपटाला साठ वर्ष पूर्ण होत आहेत.  या साठ वर्षात मुगले आजम आणि त्यातील सदाबहार गाण्यांची जादू कणभरही कमी झाली नाही….तब्बल 14 वर्ष लागलेल्या मुगले आझम चित्रपटाकडे हिंदी चित्रपट सृष्टीतील सोनेरी पान म्हणून पाहिले जाते. 

मुगल सम्राट अकबरचा मुलगा सलीम आणि त्याची सौदर्यवान दासी अनारकली यांच्या प्रेमाची ही दास्तान प्रथम उर्दू नाटककार इम्तियाज अली ताज यांच्या लेखणीतून 1922 साकारली.  अर्देशिर इराणी यांनी 1928 मध्ये  अनारकली हा मूक चित्रपट बनविला.  शहजादा सलिम आणि अनारकली यांच्या या प्रेमकहाणीची भूल करीमुद्दीन आसिफ अर्थात के आसिफ यांना पडली.  हिंदी चित्रपट सृष्टीत आसिफ यांना विक्षिप्त म्हटले जायचे.  उत्तर प्रदेशच्या विटावा जिल्ह्यातील के आसिफ यांचं शिक्षण फक्त आठवी पर्यंत झालेलं.  पण या माणसाच्या कल्पना एवढ्या उत्तुंग होत्या की त्याला तोड नाही.  सलीम आणि अनारकलीच्या प्रेमकहाणीवर असा चित्रपट करायची की पुढच्या शंभर पिढ्या तो कायम लक्षात ठेवतील….हे के आसिफ यांनी ठरवले.   त्यासाठी निर्माता म्हणून त्यांनी शिराझ अली हकीम यांना घेतलं.  अर्थात हा अवाढव्य खर्चाचा चित्रपट होणार होता,  त्यासाठी लागणारी गुंतवणूक शिराझ अली करत होते.  एकदा कथा नक्की झाल्यावर आसिफ यांनी चक्क चार संवाद लेखकांना पटकथा आणि संवाद लेखनाची जबाबदारी सोपवली.  त्यात अमानुल्ला खान, वजाहत मिर्झा, कमल अमरोही आणि एहसान रिझवी यांचा समावेश होता. 

चित्रपटात चंद्रबाबू, डी.के सप्रू आणि नर्गिस यांच्या भूमिका नक्की झाल्या.  चित्रपटाचे शूट 1946 मध्ये बॉम्बे टॉकीजमध्ये सुरु झालं.  पण तेव्हाच भारत पाकिस्तान फाळणी झाली.  यात शिराज अली पाकिस्तानमध्ये गेले.  के आसिफ यांना आपला मित्र सोडून गेल्याचं खूप दुःख झालं.  शिराज अली गेल्यामुळे आर्थिक सहाय्य थांबले.  मुगले आजमचं शूट थांबलं.  त्यांनंतर त्यांनी 1952 मध्ये पुन्हा मुगले आजमची जमवाजमव केली.  नव्या निर्मात्याला घेण्यात आलं.  त्यातच अभिनेते चंद्रमोहन यांचे ह्दयविकाराच्या धक्यानं निधन झालं होतं.  त्यामुळे चित्रपटाची कास्ट पूर्णपणे बदलली.  बादशहा अकबर पृथ्वीराज कपूर झाले.  त्यांनी या चित्रपटात बादशहा अकबराची छबी निर्माण केली. ती कायमचीच झाली.  शहजादा सलीमच्या भूमिकेत ट्रॅजिडी किंग दिलीप कुमार आले.  अनारकली या सौदर्यवतीची भूमिका मधुबालाकडे आली.  तिच्याशिवाय अनारकलीची भूमिका कोणी केली असती का यावर वाद झाले…पण तिच्याएवढं सुंदर मात्र कोणीच दिसू शकलं नसतं यावर सर्वांचे एकमत होते.  याशिवाय मुगले आजममध्ये दुर्गा खोटे, अजीत, निगार सुलताना, कुमार यांच्या भूमिकाही महत्त्वाच्या होत्या.  शहजादा सलीमच्या लहानपणीच्या भूमिकेसाठी तबला उस्ताद जाकीर हुसेन यांचं नाव घेण्यात आलं होतं.  पण नंतर हा रोल जलाल आगा यांनी केला.  जलाल आगा यांचा हा  पहिला चित्रपट. 

आसिफ यांच्या डोक्यात मुगले आजम कसा असावा याची पक्की फिल्म तयार होती.  त्यामुळे त्यांनी या चित्रपटाच्या सर्व बाजूंवर अगदी बारकाईनं काम केलं.  मुगले आजमचे सेट आजही भूरळ घालतात.  तर संगीत आजही नव आणि गुणगुणावंसं वाटतं ते त्यामुळेच.  नौशाद यांना मगले आजमसाठी संगीत देण्यासाठी सांगण्यासाठी जेव्हा आसिफ त्यांच्या घरी गेले तेव्हा पैशांची बॅग घेऊनच गेले होते.  ती बॅग नौशाद यांच्याकडे देऊन कायम संस्मरणीय होतील अशी गाणी बनवा, म्हणून त्यांनी नौशाद यांना आग्रह केला.  नौशाद यांना आसिफ यांचा हा अंदाज आवडला नाही.  कला पैशांनी विकत घेता येत नाही, हे सांगून त्यांनी आसिफ यांना नकार दिला.  शेवटी आसिफ यांनी नौशाद यांची माफी मागितली…मगच नौशाद मुगले आझमच्या संगिताकडे वळले.  आसिफ आणि नौशाद यांनी एकूण 20 गाणी तयार केली होती.  त्यांचं शूटही झालं.  पण यामुळे चित्रपटाची लांबी अवाढव्य वाढली.  परिणामी बरीच गाणी चित्रपटातून काढण्यात आली.  आसिफ हे गायकांबाबतही आग्रही होते. प्रेम जोगन…या गाण्यासाठी त्यांनी बडे गुलाम अली यांना विचारणा केली.  तेव्हा त्यांनी मी फिल्मी गाणी गात नाही म्हणून प्रथम नकार दिला.  पण आसिफ यांनी आग्रह केल्यावर त्यांनी दोन गाण्यांसाठी तेव्हा पंचवीस हजार मानधन घेतलं.  विशेष म्हणजे लता मंगेशकर आणि महमद रफी यांच्यासारखे गायकही तेव्हा एका गाण्सासाठी 400 ते 500 रुपये मानधन घेत असत.  मुगले आजमचं हद्य म्हणजेच या चित्रपटातील गाणी.  मोहक रुपातील मधुबाला  प्यार किया तो डरना क्या म्हणत अकबर बादशहा समोर कशी उभी रहाते हे पहाण्यासाठीच अनेकांनी मुगले आजम अनेकवेळा पाहिला.  या गाण्याच्या शूटसाठी 10 लाख रुपये खर्च करण्यात आले.  अर्थात साठ वर्षापूर्वी ही रक्कम म्हणजे निव्वळ वेडेपणा होतं.  कारण तेव्हा एवढ्या पैशात एक संपूर्ण चित्रपट तयार होत असे.  या गाण्यात जो इको इफेक्ट आहे, त्या इफेक्टसाठी गाणं स्टुडीओमध्ये नाही तर बाथरुमध्ये रेकॉर्ड करण्यात आलं.  या गाण्यासाठी के आसिफ यांनी जो शिशमहलचा सेट केला आहे, तो पाकिस्तानमध्ये असलेल्या लाहोर किल्ल्यातील शिश महलाची डुप्लीकेट होता.  यातील विशिष्ट आरसे तर बेल्जियममधून मागवण्यात आले.  मात्र त्यातील आरशामुळे शुटींग होऊ शकत नव्हते.  मधुबालाची छबी एकाचवेळी सर्वत्र येत नव्हती.  यासाठी अनेक रिटेक झाले.  पण के आसिफ यांचं समाधान झालं नाही.  कोणी अन्य दिग्दर्शक असता तर आपला हट्ट मागे घेतला असता.  पण आसिफ यांनी आपला हट्ट सोडला नाही.  त्यांनी या दृष्याच्या चित्रिकरणाठी चक्क ब्रिटीश दिग्दर्शक डेव्ही़ड लीन यांना बोलावले. पण त्यांनाही या शिशमहालात लावलेल्या लाखो काचांमधील रिफ्लेक्शन रोखता आलं नाही.  शेवटी सिनेमेटोग्राफर आर डी माथूर यांनी या काचांवर झिरमिळीत कपडा टाकून शूट केलं.  शिशमहलाला तब्बल 500 ट्रंकचे हेडलाईट आणि 100 रिफलेक्टर्स लावून प्रकाशित करण्यात आले होते.  लता मंगेशकर यांचा जादूई स्वर आणि मधुबालाचं सौदर्य यांनी प्यार किया तो डरना क्या हे गाणं अजरामर झालंय.  यातील जिंदाबाद जिंदाबाद ऐ मोहब्बत जिंदाबाद हे गाणं मोहमद रफी यांनी गायलं.  त्यांना कोरस देण्यासाठी तब्बल 100 गायकांनी साथ दिली.  हा सुद्धा एक रेकॉर्ड होता. 

आर्ट डायरेक्टर एम. के. सय्यद यांच्या नेतृत्वात या चित्रपटाचे प्रॉडक्शन डिझाईन झाले.  काही सेट तयार होण्यासाठी तर सहा आठवड्यांचा कालावधी लागला. मुगल राजवाड्याच्या आतील बाजु तयार करण्यासाठी अवाढव्य खर्च आला.  त्यासाठी  फिरोजाबादमधून कामगार मागवण्यात आले.  या वाढत्या खर्चामुळे चित्रपटाच्या फायनान्सरना दिवाळखोरीची भीती वाटयला लागली होती.  मुगले आजममध्ये कपड्याचे डीझाईनही खास होते.  त्यासाठी खास भारतभरातील कारागीर भरती करण्यात आले. पोशाखांची रचना माखनलाल आणि कंपनी यांनी केली.  जरदोजी भरतकाम दिल्लीतील कुशल कलाकारांकडून करुन घेण्यात आले.  पादत्राणे आग्रा येथून मागविण्यात आली.   दागदागिने हैदराबादमधील सोनारांनी बनवले.  मुकुट कोल्हापुरात डिझाइन केले होते.  राजस्थानमधील लोहारांनी शस्त्रे तयार केली सूरतच्या डिझाइनर्सनी वेशभूषावरील जरदोजी काम केले…त्यात काही ठिकाणी सोन्याच्या धाग्याचाही वापर झाला.   भगवान श्रीकृष्णाची मूर्ती, ज्यावर जोधाबाईंनी प्रार्थना केली, ती सोन्याची होती.  

मुगले आजममधील युद्ध आठवतं का…राजकुमार सलीम आणि अकबर बादशहा यांच्यात झालेलं.  या युद्धातील दृष्यासाठी चक्क सैन्यातील हत्ती, घोडे आणि उंट घेण्यात आले होते.  यासाठी तत्कालिन संरक्षण मंत्री कृष्णा मेनन यांच्याकडून रितसर परवानगी काढण्यात आली.  लढाईसाठी 2000 ऊंट, 400 घोडे, आणि 8000 सैन्य वापरण्यात आलं.  राजस्थानमधील वाळवंटात हे चित्रिकरण झाले.  संपूर्ण चिलखत घालून दिलिप कुमार आणि पृथ्वीराज कपूर यांनी हे शूट पूर्ण केले.   या दोघांनाही राजस्थानच्या उष्णतेचा प्रचंड त्रास झाला.  पण आसिफ यांच्या हट्टापुढे त्यांचे काहीच चालले नाही.

5 ऑगस्ट 1960 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटासाठी 1.5 करोड खर्च झाला.  एवढ्या मोठ्या बजेटचा चित्रपट म्हणून मुगले आजम विषयी सर्वसामान्यांमध्ये मोठी उत्सुकता होती.  चित्रपट एवढा अवाढव्य केल्यावर त्याचे प्रदर्शनही तेवढ्याच शाही थाटात करण्यात आले.  देशभरातील 150 चित्रपटगृहामध्ये मुगले आजम प्रदर्शित झाला.  मुंबईमध्ये मराठा मंदिरमध्ये त्याचा भव्य शो झाला.  चित्रपटाची प्रिंट चक्क सजवलेल्या हत्तीवरुन आणण्यात आली.  मराठा मंदिरला मुगल राजवाड्याप्रमाणे सजवण्यात आलं होतं.  पृथ्वीराज कपूरचे 40 फूटाचे कट-आउट उभे केले गेले होते. प्रीमियरची आमंत्रण पत्रिकाही खास होती.  त्याच्यावर रॉयल आंमत्रण असे लिहिण्यात आले होते.  प्रिमिअरला सर्वच चित्रपट सृष्टी उपस्थित होती.  अपवाद फक्त दिलीप कुमार यांचा होता.  असिफ यांच्याबरोबर झालेल्या वादामुळे शहजादा सलीम या भव्य प्रिमियमपासून दूर राहीले.   दिलिप कुमार यांनी हा चित्रपट 34 वर्षांनी, जेव्हा त्याची रंगीत आवृत्ती आली, तेव्हा प्रिमिअरला जाऊन पाहिला. 

मराठा मंदिर आणि इतरही चित्रपटगृहांबाहेर मुगले आजम बघण्यासाठी हजारो प्रेक्षकांनी गर्दी केली होती.  अगदी दोन ते तीन दिवस रांगेत उभं रहाण्याचीही रसिकांची तयारी होती.  सर्वसामान्यांमध्ये मुगले आजम बघण्यासाठी मोठी उत्सुकता होती.  जणू काही आपण त्याच काळात गेलो की काय असा भास हा चित्रपट बघितल्यावर अनेकांना झाला.  त्यामुळे चित्रपटगृहाबाहेर प्रेक्षकांच्या रांगाच रांगा असायच्या.  इतकेच काय एकदा चित्रपट बघितल्यावर परत तिच मंडळी नव्यानं तिकीटाच्या रांगेत उभी रहायची…पुन्हा मुगले आजम बघण्यासाठी… अगदी पाकिस्तान, श्रीलंका, म्यांनमार येथूनही प्रेक्षक हा चित्रपट बघण्यासाठी आले होते. 

मुगले आझम सर्वाधिक कमाईचा चित्रपट ठरला.  के आसिफ यानंतर मात्र दुसरा चित्रपट बनवू शकले नाहीत.  भविष्यात चित्रपट सृष्टी कितीही आधुनिक झाली तरी या मुगले आझमची पुरुरावृत्ती नक्की होणार नाही…सलीम आणि अनारकली यांच्या प्रेमासारखा हा चित्रपट राहील….अजरामर….

– Bhushan Patki


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.