कमलेश नानासाहेब घुमरे आणि पीयूष बन्सल (Peyush Bansal), कालपासून सोशल मीडियावर चर्चा आहे, ती या दोन नावांची आणि “KGAgrotech” या नव्या कंपनीची!
देशाला जर महासत्ता बनायचं असेल, तर देशात मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे निर्माण व्हायला हवेत. हाच विचार करून सरकारने ‘मेक इन इंडिया’ ही महत्वपूर्ण योजना सुरू करत, स्टार्ट अपला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली आणि भारतात मोठ्या प्रमाणावर स्टार्ट अप्स सुरू झाले. इतकंच काय तर ‘१६ जानेवारी’ हा दिवस ‘स्टार्ट अप डे’ म्हणून जाहीर करण्यात आला.
सध्या सोनी टीव्हीवर चालू असलेल्या ‘शार्क टॅंक इंडिया’ या कार्यक्रमातून भारतामध्ये ‘टॅलेंटेंड’ लोकांची काही कमी नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. या शो मध्ये अनेकजण आपल्या बिझनेस आयडिया शोमधील ‘शार्क्स’समोर म्हणजेच मोठ्या उद्योगपतींसमोर सादर करून त्यांच्याकडून फंडिंग मिळवत आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना संपूर्णपणे ‘कमर्शिअल’ आहे. परंतु, कालच्या भागात झालेल्या ‘डील’ने मात्र तमाम भारतीयांची मनं जिंकली.
नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील ‘देवारपाडे’ या गावात राहणाऱ्या एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा कमलेश नानासाहेब घुमरे, या कार्यक्रमाच्या स्टेजवर आला आणि स्टेजवरचं वातावरण एकदम उत्साही आणि मराठमोळं होऊन गेलं.
‘जुगाडू कमलेश’ म्हणून आपली ओळख करून देत त्याने आपल्या प्रॉडक्टची माहिती सर्वांना सांगितली. शेतकऱ्यांना पीकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना १७ ते २० लिटरचा टॅंक पाठीवर घ्यावा लागतो. शिवाय त्यामधील केमिकलमुळे आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतात. कमलेशने जेव्हा आपल्या वडिलांना झालेला त्रास बघितला, तेव्हा त्याने ठरवलं, यासाठी काहीतरी करायला हवं.
कमलेशचा मोठा भाऊ भारतीय सैन्यामध्ये आहे, तर कमलेश शेती सांभाळतो. कमलेश फक्त २७ वर्षांचा आहे. तो इंजिनिअर नाही, इतकंच काय, तर त्याने ग्रॅज्युएशनही पूर्ण केलेलं नाही. पण त्याच्याजवळ होती, ती शेतकऱ्यांचा त्रास वाचविण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती. कमलेशच्या डोक्यात कीटकनाशक फवारणीसाठी मशीन बनविण्याचा विचार आला आणि त्याच्या जुगाडू डोक्यात विचारचक्र गरागरा फिरू लागलं.
सुरुवातीला भंगाराच्या दुकानातून सामान आणून त्याने आपलं काम सुरू केलं. सर्वांना त्याचं काम म्हणजे ‘टाईमपास’ वाटत होतं. तो नक्की काय करतोय, हे कोणालाच माहिती नव्हतं. मुळात कोणी त्याला गांभीर्याने घेतलंच नव्हतं. पण या कामात त्याच्या साथीला होता तो त्याच्या मोठ्या भावाचा मुलगा ‘नरु’!
कमलेशने एक, दोन नाही, तर तब्बल ७ वर्ष मेहनत करून अगदी सहज सोपं आणि शेतकऱ्यांना पेरणी, फवारणी आदी तीन प्रक्रियांसाठी उपयोगी पडू शकेल, असं एक मशीन तयार केलं. तीन चाकी सायकलसारखं दिसणारं हे मशीन वापरायला अगदी सोपं आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखंही आहे.

काही मोठे शेतकरी फवारणीसाठी ‘ड्रोन’ वापरू शकतात, पण छोट्या शेतकऱ्यांचं काय? त्यांना हा पर्याय परवडणारा तर नाहीच, शिवाय फारसा उपयुक्तही नाही. पण कमलेशने तयार केलेलं मशीन मात्र अगदी छोट्यातला छोटा शेतकरीही वापरू शकतो.
या शो पर्यंत पोचण्यासाठीचा कमलेशचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. शो मधल्या शार्क्सनी कमलेशला अनेक प्रश्न विचारले. सर्व प्रश्नांची उत्तरं कमलेशने अत्यंत प्रामाणिकपणे दिली. कमलेशने तयार केलेल्या या मशीनचा व्हिडीओ त्याच्या भावाने पोस्ट केला आणि त्याला प्रचंड व्ह्यूअरशीप आणि शेअर्स मिळाले. न्यूज चॅनेल्स आणि वर्तमानपत्रातही त्याच्याबद्दल छापून आलं. हजारो शेतकऱ्यांनी ते विकत घेण्यात रस दाखवला.
कमलेशला पेंटटची माहिती नसल्यामुळे कमलेशने या मशीनचे पेंटट घेतले नव्हते. काही कंपन्यांनी कमलेशच्या या मशीनचे हक्क खरेदी करण्यासाठी त्याला पाच -सहा लाखांची ऑफर दिली. परंतु, ज्या मशीनसाठी त्याने ७ वर्षांची मेहनत घेतली होती, त्याचे सर्व हक्क पाच – सहा लाखात द्यायची कमलेशची तयारी नव्हती.
सुमारे ३० लाख रुपयांचं फंडिंग आणि १०% इक्विटी असं प्रपोजल घेऊन आलेला कमलेश आपला बिझनेस प्लॅन पटवून देताना म्हणाला, “जर मला फंडिंग मिळालं, तर गावातल्या कित्येक तरुणांना नोकऱ्या मिळतील. त्यांना गावाबाहेर जायची गरजच पडणार नाही.”
कमलेशने बनवलेल्या मशीनचं, त्याच्या मेहनतीचं आणि हुशारीचं कौतुक करणाऱ्या शार्क्सना मात्र त्याचं बिझनेस प्रपोजल फारसं आकर्षक वाटलं नाही. परंतु, एका व्यक्तीने मात्र त्याला मदतीचा हात द्यायचं ठरवलं, ती व्यक्ती म्हणजे लेन्सकार्ट (lenskart) कंपनीचे सह-संस्थापक ‘पीयूष बन्सल!
मशीन बनवताना सावलीसारखा सोबत राहिलेला ‘नरू’ म्हणजे कमलेशचा उजवा हात. डीलच्या वेळीही कमलेश नरूला अजिबात विसरला नाही. जे काही बिझनेस डील असेल, त्यामध्ये नरूही माझ्यासोबत असेल, असं त्याने ठामपणे सांगितलं.
पीयूष बन्सल ( (Peyush Bansal) यांनी कमलेशला ४०% भागीदारीसह सुमारे १० लाख रुपयांचं फंडिंग ऑफर केलं. यानंतर त्यांनी कमलेशला विचारलं, “या प्रोजेक्टसाठी तू बँकेकडून कर्ज का घेतलं नाहीस?” संपूर्णवेळ स्टेजवर आत्मविश्वास आणि उत्साहाने वावरणारा कमलेश यावेळी मात्र भावूक झाला. त्याचे डोळे भरून आले. “मला कर्ज कोण देणार?” असा प्रतिप्रश्न करून त्याने या प्रश्नाचे उत्तर दिले.
कमलेशच्या बोलण्यावर, “मै दूंगा लोन”, असं म्हणत पीयूष बन्सल यांनी कोणत्याही अटी व शर्थी न ठेवता कमलेशला तब्बल २० लाख रुपये रक्कम कर्ज म्हणून दिली, तीसुद्धा बीनव्याजी!
पीयूष यांनी तब्बल २० लाख रुपये बिनव्याजी कर्ज, रु. १० लाख फंडिंग आणि ४०% प्रॉफिट शेअर, अशी ऑफर देत कमलेशचा शेअर ५०% आणि नरुचा शेअर १०% असं म्हणत डील पक्कं केलं. या डीलसोबत पीयूष बन्सल यांनी तमाम भारतीयांची आणि सोबत असणाऱ्या इतर शार्क्सचीही मनं जिंकली.
हे ही वाचा: या महत्वाच्या कारणांसाठी आवर्जून बघा ‘शार्क टॅंक इंडिया'(Shark Tank India)
पाकिस्तानमध्ये नवा इतिहास रचणाऱ्या आयशा मलिक (Ayesha Malik) नक्की आहेत तरी कोण?
एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा केवळ २७ वर्षाचा मुलगा. कोणतीही डिग्री आणि अनुभव नसताना, सलग ७ वर्ष मेहनत घेतोय, ही गोष्ट पीयूष बन्सल यांना भावली. त्यांनी याकडे केवळ एक ‘बिझनेस डील’ म्हणून न बघता, मानवतावादी दृष्टिकोनातून बघितलं. त्यामुळे पीयूष यांनी केलेलं डील पाहून एका उत्तम व्यवसायिकामध्ये एक सहृदय माणूसही दडलेला असतो, ही गोष्ट प्रेक्षकांना नव्याने समजली. निव्वळ ‘बिझनेस डील’ या कारणासाठी प्रसिद्ध असणाऱ्या ‘शार्क टॅंक इंडिया‘ या शोमध्ये झालेलं हे ‘डील’ पाहून कमलेश इतकाच आनंद सर्वसामान्य प्रेक्षकांनाही झाला आहे.
– मानसी जोशी