Home » तिरंग्याचा राखा मान

तिरंग्याचा राखा मान

by Correspondent
0 comment
Indian Flag | KFacts
Share

आज १५ ऑगस्ट २०२०, भारताचा ७४ वा स्वातंत्र्यदिन. यावर्षी कोरोनाच्या संकटात, लॉकडाऊन परिस्थितीत हा दिवस साजरा करावा लागत आहे. दरवर्षी या दिवशी भारतात ठिकठिकाणी झेंडावंदन केलं जातं. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेजण पांढरे शुभ्र पोषाख परिधान करतात. “सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा”, “भारत हमको जान से प्यारा है”, “मा तुझे सलाम” यासारख्या देशभक्तीपर गाण्यांचे सूर गावातल्या गल्लीबोळापासून ते शहरातल्या मोठमोठाल्या रस्त्यापर्यंत सगळीकडे दुमदुमत असतात. भगवा, पांढरा, निळा, हिरवा या रंगांनी सभोवतालचा संपूर्ण परिसर न्हाऊन निघालेला असतो.

याच आनंदात भर म्हणून आणि भारताबद्दल वाटणारा अभिमान दर्शवण्यासाठी बरेच जण छोटे झेंडे, तिरंगा बॅचेस, बँड्स इत्यादी गोष्टी विकत घेत असतात. ह्या सर्व गोष्टी आपल्या छातीवर लावून मिरवत देखील असतात. पण झेंडावंदनाचा कालावधी संपला की मग मात्र हेच झेंडे, तिरंगा बॅचेस, बँड्स इत्यादी गोष्टी रस्त्यावर इतरस्त्र पडलेल्या दिसतात. त्यामुळे कित्तेकदा त्या नकळत पायदळी तुडवल्या जातात.

काहींच्या लेखी झेंडे मिरवण ही निव्वळ एक गंमत असल्याकारणाने मिरवून झाल्यानंतर ही मंडळी ते झेंडे झाडाच्या फांदीत, बस स्टॉप च्या छतावर, बागेतल्या बाकड्यांच्या कोपऱ्यावर, कठड्यावर जिथे मिळेल त्या ठिकाणी खोचून, खुपसून, किंवा तसेच टाकून निघून येतात. बरं काहींची कृत्य ही तर शरमेने मान खाली घालायला लावतात. कारण कचरा पट्टी, थुंकून थुंकून गचाळ झालेले कोपरे, गटार अशा अप्रशस्त ठिकाणीही दुसऱ्या दिवशी झेंडे आढळून येतात.

आपला तिरंगा अखंड निर्भीडपणे फडकत रहावा म्हणून देशाचे सैनिक आपल्या जिवाचीही पर्वा करीत नाहीत. आपल्या देशाचा झेंडा क्रीडा क्षेत्रात सदैव अग्रेसर रहावा म्हणून खेळाडूसुद्धा शर्थीचे प्रयत्न करत असतात. देशाची मान उंच व्हावी म्हणून वैज्ञानिक, साहित्यिक, कलाकार आपापल्या परीने प्रयत्न करत असतात. अशा वेळी कळत किंवा नकळतपणे झेंड्यांचा हा असा अवमान व्हावा, भारताच्या अभिमान चिन्हाची अशी पायमल्ली व्हावी हे कितपत योग्य आहे..? झेंड्याचा हा असा अपमान जाणून-बुजून झाला तर तो गुन्हाच आहे, पण असे कृत्य नकळत पणे जरी झाले तरी ती चूकच ठरते. तेव्हा भारताचे सुजाण नागरिक म्हणून आपल्या हातून हे असे कृत्य होत नाही ना किंवा आपल्यासमोर एखादी व्यक्ती कळत किंवा नकळत पणे असे कृत्य करत नाही ना याची दक्षता घेणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.

गेली काही वर्ष १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी च्या दिवशी ठाणे मुंबईतील काही संस्था हे काम करण्यासाठी कार्यरत आहेत. या दोन्ही दिवशी संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी या संस्थांची मंडळी एकत्र जमतात आणि आपल्या आसपासच्या परिसरात पडलेले झेंडे गोळा करून त्यांचा अवमान होण्यापासून थांबवतात. हे झेंडे गोळा करत असताना त्यांना अक्षरशः कचरापेटीत गटारात उतरावे लागते. पण या कशाचीही पर्वा न करता ही मंडळी झेंडे गोळा करतात.

यंदा लॉकडाऊन परिस्थितीमुळे या संस्थांना मोठ्या प्रमाणावर काम करणे जमू शकत नाही याची खंत त्यांना नक्कीच जाणवते. आणि म्हणूनच यातील काही संस्थांनी यंदा सोशल मीडियाच्या डिजिटल माध्यमातून लोकांना आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद मिळून, आपल्या राष्ट्रध्वजाचा होणारा अपमान टाळला जावा आणि एक दिवस असा यावा की या संस्थांना हे काम करण्याची वेळच येऊ नये, हीच काय ती प्रार्थना! कारण आपल्या देशाचा मान ठेवणे ही आपली जबाबदारी आहे, जय हिंद, जय भारत.

————– © कल्पिता पावस्कर


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.