देशातील नव्हे तर जगातील हुशार, सर्वात आदरणीय आणि यशस्वी उद्योजक म्हणून ओळख असलेल्या रतनजी टाटा यांचे दुःखद निधन झाले. टाटा समूहाचे माजी अध्यक्ष असलेले रतन टाटा यांच्या निधनामुळे आमपासून खासपर्यंत सर्वच लोकं हळहळली. अतिशय चाणाक्ष, दूरदृष्टी आणि कठोर परिश्रम करणाऱ्या रतन टाटा यांनी एक उतत, उद्योजक ओळख कमावली. मात्र सोबतच सामाजिक कामातून एक हळवे आणि माणुसकीने ओतप्रोत भरलेल्या टाटा यांची ही दुसरी बाजू देखील जगाला दिसली. जागतिक स्तरावर त्यांनी त्यांच्या कामातून एक यशस्वी उद्योजक आणि उत्तम माणूस मोठी प्रतिष्ठा मिळवली.
उद्योग जगतातील पितामह अशी त्यांची ओळख होती. मात्र हा प्रवास त्यांच्यासाठी सोपा नव्हता. अनेक पिढ्यांपासून त्यांच्या घराण्यात व्यवसाय होता. टाटा समूहाचे संस्थापक असणारे जमशेदजी टाटा हे रतन टाटा यांचे आजोबा होते. असे असूनही त्यांनी अगदी खालून सुरुवात करत आपल्या कौशल्याने टाटा समूहाला आज शिखरावर पोहचवले. जाणून घेऊया रतन टाटा यांच्या संपूर्ण कारकिर्दीबद्दल.
२८ डिसेंबर १९३७ रोजी रतन टाटा यांचा जन्म मुंबई येथे एका पारशी कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण मुंबई आणि अमेरिकेत झाले. रतन टाटा यांनी त्यांचे सुरुवातीचे आठवीपर्यंतचे शिक्षण मुंबईतील कॅम्पियन स्कूलमधून घेतले. त्यानंतर ते कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमध्ये गेले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी १९६२ मध्ये कॉर्नेल विद्यापीठातून स्ट्रक्चरल अभियांत्रिकीसह आर्किटेक्चरमध्ये बीएस पूर्ण केले. पुढे रतन टाटा यांनी उच्च शिक्षणासाठी हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये प्रवेश घेतला. रतन टाटा यांनी कॅम्पियन स्कूल, मुंबई, कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल, बिशप कॉटन स्कूल, शिमला आणि न्यूयॉर्क शहरातील रिव्हरडेल कंट्री स्कूलमध्ये शिक्षण घेतले.
रतन टाटा यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर परत भारतात आल्यावर १९६१ च्या दरम्यान टाटा स्टील कंपनीत सामान्य कर्मचारी म्हणून काम करण्यास सुरुवात केली. १९९१ मध्ये रतन टाटा यांची टाटा ग्रुपच्या चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली. रतन टाटांकडे टाटा समूहाचे चेअरमनपद आल्यानंतर त्यांनी या समूहातील सर्व कंपन्यांमध्ये स्वतःची हिस्सेदारी वाढवली.
टाटा यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक चांगले बदल समूहामध्ये घडवले. रतन टाटांचे स्वप्न असलेली संपूर्णपणे भारतीय बनावटीची ‘इंडिका’ कार टाटा मोटर्सने १९९८ मध्ये बनवली. ही कार खूपच लोकप्रिय झाली. त्यानंतर एकदिवस एका कुटुंबाला मोटारसायकलवर प्रवास करताना पाहून रतन टाटा यांच्या मनात स्वस्तातली कार बनवण्याची कल्पना आली. जी सर्वसामान्य नागरिकांना देखील परवडेल.
यावरच काम करून २००८ मध्ये रतन टाटांच्या मार्गदर्शनात टाटा मोटर्सने टाटा नॅनो ही सर्वात छोटी आणि सगळ्यांना परवडेल अशी कार बाजारात आणली. त्यामुळेच रतन टाटांनान नॅनो कारचे जनक देखील म्हटले जाऊ लागले. रतन टाटा यांच्या कार्यकाळात टाटा समूहाने अनेक विविध क्षेत्रांमध्ये प्रवेश करत यश मिळवले.
२०१२ मध्ये रतन टाटांनी टाटा समूहाच्या चेयरमनपदाचा राजीनामा दिला आणि संपूर्ण कार्यभार सायरस मेस्त्रीकडे सोपवला. सर्व काही सुरळीत चालू असताना रतन टाटा यांचा सायरस मेस्त्रींबरोबर वाद झाल्याने, पुन्हा वर्षभरासाठी २०१६ साली रतन टाटा टाटा समूहाच्या चेअरमनपदी आले. सध्या राजन चंद्रशेखरन हे टाटा समूहाचे चेअरमन म्हणून कार्यभार पाहत आहे.
========
हे देखील वाचा : टाटा समूहाच्या विविध क्षेत्रातील कंपन्या
========
रतन टाटा यांनी १९६१ मध्ये टाटा समूहात सामान्य कर्मचारी म्हणून काम करण्यास सुरुवात केली. रतन टाटा यांनी टाटा समूहामध्ये काम करताना अनेक बदल घडवले, अनेक नवनवीन गोष्टी तयार केल्या, विविध क्षेत्रांमध्ये, देशांमध्ये, शहरांमध्ये टाटा यांनी कंपनीचा विस्तार केला. उद्योग जगतात यश मिळवत असताना टाटा यांनी त्यांचे सामाजिक भान देखील जपले. त्यांनी सामान्य, गरजू लोकांसाठी अनेक कामं केली. त्यांचे उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील काम बघता रतन टाटा यांना २००८ मध्ये पद्मविभूषण आणि २००० मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कोणत्याही पदावर नुसूची रतन टाटा त्यांचे सामाजिक काम करताना सतत दिसायचे. नोव्हेंबर २००७ मध्ये, फॉर्च्युन मासिकाने त्यांचा व्यवसायातील २५ सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समावेश केला होता.