अयोध्येमध्ये 22 जानेवारी 2024 रोजी तमाम हिंदूंसाठी गौरवगाथा लिहिली गेली. या दिवशी हजारो वर्ष ज्या सुर्वणक्षणाची वाट बघितली, तो सुवर्णक्षण याची देही याची डोळा अनुभवता आला. हा सुवर्णक्षण म्हणजे, अयोध्येतील श्रीरामलल्ला यांचे मंदिर. 22 जानेवारी 2025 रोजी या सुर्वणक्षणाला वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षपूर्तीसाठी अयोध्येत आत्तापासूनच मोठ्या प्रमाणात कायक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आता अयोध्येत थंडीचा पारा कमालीचा उतरला आहे. अशा परिस्थितीतही राम मंदिराच्या वर्षपूर्तीसाठी मोठ्या प्रमाणात भाविक अयोध्येत दाखल होत आहेत. या सर्व भाविकांसाठी राममंदिर ट्रस्टतर्फे मोठे आवाहन करण्यात आले आहे, ते म्हणजे, राममंदिराचा प्राणप्रतिष्ठा महोत्सव 22 नाही तर 11 जानेवारीला साजरा होणार आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट हिंदी दिनदर्शिकेनुसार 11 जानेवारी 2025 रोजी हा सोहळा साजरा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी येणा-या भाविकांनी 22 साठी नाही तर 11 जानेवारीला अयोध्येत यावे असे आवाहन करण्यात आले आहे. अयोध्या नगरीमध्ये राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला वर्ष पूर्ण झाल्यामुळे मोठा उत्सव साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी होम, यज्ञ होत असून मान्यवर कलाकार अयोध्येत जाऊन प्रभू रामाच्या चरणी आपली सेवा देणार आहेत. हा सर्व सोहळा 9 जानेवारीपासून सुरु होणार असून 11 जानेवारीपर्यंत चालणार आहे. (Ram Mandir)
वास्तविक 22 जानेवारी 2024 रोजी भगवान श्री राम त्यांच्या भव्य मंदिरात विराजमान झाले होते. मात्र, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट हिंदी दिनदर्शिकेनुसार 11 जानेवारी 2025 रोजी हा सोहळा साजरा होणार आहे. हिंदी तिथीनुसार, भगवान श्री राम पौष महिन्याच्या द्वादशी तिथीला विराजमान झाले होते. तो योग 2025 मध्ये 11 जानेवारी रोजी आहे. त्यामुळेच अयोध्येत 9 जानेवारी ते 11 जानेवारी या तीन दिवसात प्रतिष्ठा महोत्सव होणार आहे. श्री रामलल्लांच्या या मंदिराच्या पहिल्या वर्धापन दिनासाठी अयोध्या नगरी त्रेतायुगाप्रमाणे सजवण्यात येणार आहे. 13 जानेवारीपासून प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरु होणार आहे. यामुळे 11 जानेवारीला अयोध्येत या महाकुंभमेळ्यासाठी आलेले साध संत उपस्थित राहणार आहे. श्री रामलल्लांचे दर्शन घेऊन हे साधू संत मग महाकुंभमेळ्यासाठी रवाना होणार आहेत. त्यामुळे हा प्राणप्रतिष्ठा वर्षपूर्ती सोहळा अधिक भव्य दिव्य होणार आहे. यासाठी आत्तापासून संपूर्ण अयोध्या नगरीला रंगीबेरंगी दिव्यांनी सजवण्यात येत आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने याचे मोठ्या प्रमाणात नियोजन करत असून येणा-या प्रत्येक भाविकाला रामलल्लांचे दर्शन विनाविलंब दर्शन होईल अशी व्यवस्था करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी स्वतंत्र पूजा समिती स्थापन कऱण्यात आली आहे. या समितीतर्फे वेद पठण, रामचरितमानसाचे पठण, विशेष यज्ञ, भगवान श्रीरामाचा अभिषेक असे कार्यक्रमांचे आयोजन कऱण्यात येणार आहे.
========
हे देखील वाचा : पंच दशनाम आवाहन आखाडा
======
राम मंदिरामधील या सर्व सोहळ्याला अयोध्या नगरीच्या कानाकोप-यातून प्रत्यक्ष बघण्याचा अनुभव भक्तांना देण्यात येणार आहे. त्यासाठी अयोध्या नगरीमध्ये लावण्यात आलेल्या टिव्हीमध्ये हा सोहळा लाईव्ह दाखवण्यात येणार आहे. यासोबतच अयोध्येतील अन्य मंदिरांमध्येही अभिषेक आणि आरती सोहळा आयोजित केला आहे. या 18 मंदिरांमधील आरती सोहळाही लाईव्ह दाखवण्यात येणार आहे. याशिवाय श्री राम लला सेवा समितीतर्फे 1.25 लाख रामरक्षा स्तोत्राचे पठण केले जाणार असून, यामध्ये देशभरातील 1100 वैदिक विद्वान सहभागी होणार आहेत. या सोहळ्यासाठी देशविदेशातील पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. अयोध्येतील या सोहळ्यानंतर प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यासाठी हे परदेशी पाहुणे जाणार आहेत. या सर्वांसाठी अयोध्येतील हॉटेलमध्ये बुकींग फुल होत आले आहे. शिवाय येथील टेंट सिटीमध्येही मोठ्याप्रमाणात परदेशातून बुकींग कऱण्यात येत आहे. या सोहळ्यासाठी अयोध्येतील बाजारपेठाही सजल्या आहेत. अयोध्येमध्ये सध्या रामलल्लांच्या मुर्तीची मागणी मोठी वाढली आहे. परदेशामधूनही रामलल्लांच्या मुर्तीची मागणी वाढल्याची माहिती आहे. शिवाय राममंदिराच्या प्रतिकृतींनाही पुन्हा मागणी आली आहे. (Ram Mandir)
सई बने