कॅनडाच्या जंगलात आजवरची सर्वात मोठी आग लागली असून जवळपास 33 हजार चौरस किलो मिटर क्षेत्रातही आग पसरली आहे. अगदी सोप्या भाषेत या आगीचे क्षेत्र सांगायचे झाले तर बेल्जयम देश जेवढा आहे, तेवढ्याहून अधिक क्षेत्रात आग पसरली असून ती तासागणीक वाढत आहे. या आगीमुळे अनमोल वृक्षसंपदा नष्ट होत असून पशुपक्षांनाही आगीची झळ बसली आहे. आगीमुळे सुमारे 1.20 लाख नागरिकांनी घर सोडले आहे. पण यापेक्षाही हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या आगीची भयानकता येवढी आहे की, यातून येणा-या धुरामुळे न्युयॉर्क शहरही काळवंडले आहे. कॅनडाच्या जंगलातील ही आग विझवण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र त्याला अद्यापही अपेक्षित यश आले नाही. (Canada wildfire)
कॅनडाच्या जंगलात लागलेल्या आगीनं उग्र रुप धारण केलं आहे. कॅनडामध्ये सध्या 413 जंगलात ही आग पसरली आहे. त्यापैकी 249 जंगलातील आग नियंत्रणाबाहेर गेली आहे. या आगीमुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. आगीमुळं धुर खूप पसरला असून तो कॅनडापाठोपाठ अमेरिकेतील अनेक राज्यात पसरु लागला आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क, मिनेसोटा, क्वीन्स आणि मॅसॅच्युसेट्स शहरात एअर अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. ही आग विझवण्यासाठी कॅनडामधील बहुतांश अग्निशामक यंत्रणा कामाला लागली आहे. पण त्यांचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. त्यामुळे कॅनडाच्या मदतीला आता अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेसह अनेक देशांतील एक हजाराहून अधिक अग्निशामक दले दाखल झाली आहे. ही परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे खुद्द कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी जाहीर केले आहे. या आगीची सुरुवात कॅनडाच्या नोव्हा स्कॉशिया प्रांतातील जंगलापासून झाली. तेथे लागलेली आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आले. तरीही या आगीचा फटका 200 घरांना बसला. ही घरं आगीत जळून खाक झाली. तेव्हा आटोक्यात आलेली आग, पुन्हा अचानक भडकली आणि ती अन्य जंगलातही लगेच पसरली. या आगीत सुमारे 16 हजार नागरिकांना त्यांची घरे सोडावी लागली आहेत. क्युबेक प्रांतात परिस्थिती कठीण झाली आहे. या भागात सुरमारे 164 जंगलात आग पूर्णपणे पसरली आहे. सुमारे 10,000 नागरिकांनी आपली घरे सोडली आहेत. आग जसजशी पसरणार तशीच विस्थापीत होणा-या नागरिकांची संख्या वाढण्याची भीती आहे. (Canada wildfire)
कॅनडात लागलेल्या आगीमुळे पर्यावरणाची गंभीर समस्या उभी राहिली आहे. या आगीत हजारोंची वृक्षसंपदा नष्ट झाली आहे. यामुळे निर्णाणे झालेल्या धुराने न्यूयॉर्कमधील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीलाही घेरलं आहे. कॅनडामध्ये निसर्गाच्या आपत्तींची ही दुसरी घटना आहे. कॅनडात याआधी मोठ्या प्रमाणात पूर आला होता. त्यानंतर जंगलात आग लागली आहे. दरवर्षी कॅनडाच्या जंगलात अशा घटना होतात. मात्र यावर्षी लागलेली आग ही आजवरची भीषण आग ठरली आहे. यात करोडो प्राणी-पक्षी जळून खाक झाले आहेत. कॅनडा या देशाचा मोठा भाग जंगलांनी व्यापलेला आहे. दरवर्षी कॅनडाचा 40 लाख चौरस किलोमीटरचा परिसर जंगलाला लागलेल्या आगीमुळे जळून खाक होतो. मात्र यावर्षी लागलेल्या आगीचे स्वरुप उग्र आहे. आता या आगीची धडकी शेजारील देशांनाही भरली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आग वेगाने पसरत आहे. जंगलातील आगीच्या धुराचा ईशान्य आणि मध्य-अटलांटिक भागांवर परिणाम होत आहे. येथील आकाशाचा रंगही चक्क बदलला आहे. ईशान्य आणि मध्य-अटलांटिकमध्ये आकाश निळ्या रंगाचे असते. पण या आगीच्या धुरामुळे हा निळा रंग हरवला आहे. हे आकाश पांढ-या रंगाचे दिसत आहे. आगीमुळे धूर एवढा वाढला आहे की, नागरिकांना श्वास घ्यायलाही त्रास होत आहे. या भागात धुरापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना मास्क घालण्याचे आवाहन करण्यात येत आहे. (Canada wildfire)
========
हे देखील वाचा : यूएफओची पृथ्वीवर नजर
========
कॅनडा या देशाचे एकूण क्षेत्रफळ 99.8 लाख चौरस किलोमीटर आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशियानंतर कॅनडा हा जगातील दुसरा सर्वात मोठा देश आहे. कॅनडाचा बहुतांश भाग जंगलांनी व्यापलेला असून तेथे नानाविध प्रकारचे पशु पक्षी आहेत. या आगीमुळे असे करोडो पशुपक्षी जळून खाक झाले आहेत.
सई बने