प्रयागराज येथे होणा-या महाकुंभमेळ्यासाठी येत असलेल्या साधू संतांनी अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. नव्या वर्षात होणा-या या जगातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यासाठी लाखो साधू रोज प्रयागराज येथे येत आहेत. महाकुंभमेळ्यासाठी आलेल्या 14 आखाड्यांनी त्यांचा धर्मध्वज विधीवत पुजा करुन उभारला असून आता हे आखाडे होमहवन करण्यासाठी यज्ञशाळा उभारत आहेत. या सर्व साधुंमध्ये नागा साधुंबाबत जनमानसात मोठी उत्सुकता असते. (Prayagraj)
हे नागा साधु कुठे राहतात आणि ते कुठलिही सूचना न देता महाकुंभमेळ्यात कसे हजर होतात, याची चर्चा होते. यासोबत अनेकवेळा नागा साधू म्हणजे, चिलिम पिणारे आणि अफू गांजा खाणारे, असा अप्रचारही केला जातो. मात्र या सर्वांविरोधात साधूंचे आखाडे काम करत आहेत. असाच एक आखाडा म्हणजे, श्री पंचायती महानिर्वाणी आखाडा. 1200 वर्षापूर्वी स्थापन झालेला हा आखाडा अंमलीपदार्थांविरोधात गेली अनेक वर्ष काम करत आहे. देशाच्या रक्षणाची शपथ घेतलेले या श्री पंचायती महानिर्वाणी आखाड्यातील साधू हे अत्यंत कठोर व्रताचे पालन करतात. (Social News)
श्री पंचायती महानिर्वाणी आखाड्यानं प्रयागराज महाकुंभस्थानी आपली ध्वजपताका उभारली असून आता या आखाड्यातील साधू महायज्ञाची तयारी करत आहेत. शाहीस्थानात अग्रभागी असलेल्या या आखाड्यातील साधूसंतांनी अंमलीपदार्थांविरुद्ध युद्ध घोषित केले आहे. या आखाड्यातही याबाबत कडक नियम असून चिलीम किंवा धुम्रपान करणा-यांना या आखाड्यात कधीही प्रवेश दिला जात नाही. साधू म्हणून मान्यता मिळाल्यावरही संबंधित चिलीम ओढतांना किंवा धुम्रपान करतांना आढळला तर त्याला या आखाड्यातून लगेच काढण्यात येते. 13 जानेवारी 2025 रोजी प्रयागराजमध्ये 12 वर्षांनंतर होणाऱ्या या महाकुंभात सहभागी होण्यासाठी आलेले आखाड्यांच्या पेशवाई आता निघत आहेत. म्हणजेच हे साधू संत मोठ्या शाही मिरवणुकीतून प्रयागराज शहरात प्रवेश करत आहेत. या सर्वांमध्ये नागा साधू बघण्यासाठी खूप गर्दी होत आहे. (Prayagraj)
सोशल मिडियामधील प्रतिनिधीही या नागा साधूंचे व्हिडिओ काढण्यासाठी गर्दी करत आहेत. या साधूंबद्दल अनेक गैरसमजही पसरवले जात आहेत. या सर्वांनी श्री पंचायती महानिर्वाणी आखाड्याची नियमावली बघण्याची नक्की गरज आहे. अंमली पदार्थांच्या विरोधात लढा देण्यासाठी श्री पंचायती महानिर्वाणी आखाडा ओळखला जातो. या आखाड्यासोबत देशभरातील 7 हजारांहून अधिक छोटे-मोठे आखाडे जोडले गेले आहेत. श्री पंचायती महानिर्वाणी आखाड्याची स्थापना विक्रम संवत 805 मध्ये झाल्याची माहिती आहे. हा आखाडा आठ संतांनी मिळून स्थापन केला. हे आठ संत अटल आखाड्याशी संबंधित होते. बिहारमधील हजारीबाग जिल्ह्यातील गडकुंडाच्या सिद्धेश्वर महादेव मंदिरात या आखाड्याची स्थापना झाली. प्रयागराजला आल्यानंतर आखाड्याचे नाव श्री पंचायती महानिर्वाणी आखाडा असे झाले. यानंतर अटल आखाड्याचे संत त्यामध्ये सामील झाले. (Social News)
ज्या संतांनी या आखाड्याची स्थापना केली होती, त्या संतांनी आखाड्याला दोन भाले दिले आहेत. आजही या भाल्यांची पूजा भक्तीभावानं करण्यात येते. या भाल्यांना शक्तीरुपात पुजले जाते. शाहीस्नानापूर्वी या दोन भाल्यांना स्नान करुन मग आखाड्यातील साधू शाही स्नान करतात. 1200 वर्षांचा इतिहास असलेल्या श्री पंचायती महानिर्वाणी आखाड्यातील दोन शक्तीरुपी भाले ही खरी ओळख आहे. आखाड्याच्या स्थापनेपासून असलेले हे भाले बघण्यासाठी लाखो भक्त महाकुंभमेळ्यातील आखाड्याच्या मंडपाला भेट देतात. आखाड्यांच्या प्रमुख देवतेच्या पुजेसोबत या दोन भाल्यांची पूजा केली जाते. या आखाड्यात अनेक कडक नियम आहेत. त्यातील एक म्हणजे, आखाड्यात कुठल्याही प्रकारचे धुम्रपान करता येत नाही. सध्या या आखाड्याचे प्रमुख महामंडलेश्वर रवींद्रपुरी आहेत. त्यांनी आखाड्यात अंमली पदार्थविरोधी मोहीम सुरु केली आहे. श्री पंचायती महानिर्वाणी आखाड्याचा कोणताही साधू चिलीम ओढतांना दिसला तर त्याला प्रथम कडक ताकीद दिली जाते. पण दुसऱ्यांदाही या साधुनं अशीच चूक केली तर त्याला आखाड्यातून बाहेर काढण्यात येते. (Prayagraj)
====================
हे देखील वाचा :
Maha Khumbh Mela : महाकुंभमेळ्याला हायटेक सुरक्षेचे कवच
Uttar Pradesh : महाकुंभमध्ये 12 ज्योतिलिंग !
====================
आखाड्याच्या नियमांबाबत कोणीही असला तरी तडजोड करण्यात येत नाही. असे कडक नियम असल्यामुळेच या आखाड्यात सामील होण्यासाठी अनेक परीक्षा द्याव्या लागतात. या आखाड्याचे सदस्य होण्यासाठी आलेल्यांची कसून चौकशी करण्यात येते. यानंतर त्या व्यक्तीचे वर्तन कसे आहे, याचे अवलकन केल्यावरच त्याला आखाड्यात काही पद दिले जाते. आखाड्यात सामील झालेल्या साधू संतांना धर्मग्रंथांचे अध्ययन करावे लागते. आखाड्यातील ऋषी-मुनींच्या देखरेखीखाली सात्विक आणि पौष्टिक आहार तयार केला जातो. या आखाड्यात मोठ्या प्रमाणात गायींचाही सांभाळ करण्यात येतो. आत्ताही महाकुंभस्थळी श्री पंचायती महानिर्वाण आखाड्याचा भव्य मंडप घालण्यात आला असून त्यात रोज हजारो भाविकांसाठी प्रसाद सेवा देण्यात येणार आहे. (Social News)
सई बने