मिकोयान गुरेविच अर्थात मिग २१ (MiG-21) हे भारतीय हवाईदलाच्या ताफ्यातील एक महत्त्वाचं लढाऊ विमान आहे. हवाईदलाच्या अनेक मोहिमांमध्ये मिग २१ आणि त्यांच्या प्रशिक्षित पायलट्सनी दिलेलं योगदान हे देशाच्या संरक्षण दलामध्ये वेळोवेळी अधोरेखित झालं आहे.
भारतीय हवाईदलांच्या ताफ्यातील मिग २१ हे लढाऊ विमान म्हणजे हवाईदलाच्या ताफ्यातलं एक महत्त्वाचं विमान मानलं जातं. असं असलं तरी मिग २१ विमानांच्या अपघातांच्या बातम्यांच्या निमित्तानेच सतत हे नाव आपल्या समोर येतं.
नुकताच राजस्थान जवळच्या बाडमेर भागात हवाईदलाचं मिग २१ (MiG-21) विमान कोसळून अपघात झाला. या अपघातात दोन वैमानिक शहीद झाले. विमानातील तांत्रिक बिघाडाची जाणीव होताच, हे विमान नागरी वस्तीपासून दूर घेऊन जाण्याचं प्रसंगावधान या वैमानिकांनी दाखवल्यामुळे परिसरातील नागरिकांची जीवित हानी टळली. गुरुवारी झालेल्या या अपघातात विंग कमांडर एम. राणा आणि फ्लाईट लेफ्टनंट अद्वितीय बल या विमानाचं सारथ्य करताना शहीद झाले आहेत.

मिग २१ (MiG-21) विमानांनी आजपर्यंत जगातील सुमारे ६० देशांच्या हवाईदल ताफ्यात स्थान मिळवलं आहे. १९६४ मध्ये मिग २१ विमानं भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात दाखल झाली. भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात दाखल होणारं ‘सुपसरसॉनिक फायटर जेट’ प्रकारातलं हे पहिलं लढाऊ विमान ठरलं. सोव्हिएत युनियन आणि भारतामध्ये झालेल्या करारानुसार संपूर्ण तांत्रिक हस्तांतरण करण्यात आलं.
१९६५ च्या भारत पाकिस्तान युद्धात मिग २१ च्या वैमानिकांचं प्रशिक्षण पूर्ण न झाल्यामुळे त्या युद्धात त्यांचा सहभाग मर्यादित राहिला, मात्र त्या काळात करण्यात आलेल्या काही प्रतिबंधात्मक उड्डाणांचा अनुभव वैमानिकांसाठी महत्त्वाचा ठरला. पुढे १९७१ सालच्या भारत – पाकिस्तान युद्धात आणि १९९९ सालच्या कारगिल युद्धात मात्र मिग २१ लढाऊ विमानांचं योगदान महत्त्वाचं राहिलं. पण मिग २१ आणि अपघात हे समीकरण या सगळ्यापेक्षा कितीतरी अधिक दृढ झालं, हे दुर्दैवाने नमुद करायला हवं.
भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात दाखल झाल्यापासून ते आतापर्यंत मिग २१ च्या (MiG-21) अपघातांची संख्या दीर्घ आहे. १९७० पासून आतापर्यंत सुमारे १७० वैमानिक आणि ४० नागरिक या अपघातांमध्ये मृत्यूमुखी पडले आहेत. २०१० ते २०१३ या काळात अपघात ग्रस्त झालेल्या मिग २१ विमानांची संख्या किमान १४ एवढी आहे. उत्कृष्ट दर्जाच्या स्पेअर पार्ट्सचा अभाव आणि निकृष्ट निगराणी यांमुळे मिग २१ सातत्याने अपघातग्रस्त होत असल्याचं, या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतात.

सातत्याने अपघात, त्यामध्ये होणारी प्रशिक्षित विमानांची प्राणांची हानी, नागरिकांचे मृत्यू ही किंमत मोजून मिग – २१ विमानांचा वापर भारतीय हवाईदलात का केला जातोय असा प्रश्नही सध्या विविध स्तरांतून विचारला जात आहे.
येत्या काळात नवीन आणि अद्ययावत लढाऊ विमानांचा भारतीय हवाईदलात समावेश करण्यासाठी मिग २१ विमानांच्या सध्या कार्यरत असलेल्या चार स्क्वॉड्रन टप्प्याटप्प्याने हवाईदलाच्या सेवेतून मागे घेतल्या जाणार असल्याचं भारतीय हवाईदलानं स्पष्ट केलंय.
============
हे देखील वाचा – अद्भुत, विलक्षण आणि इच्छापूर्ती करणारे मध्यप्रदेशातील शारदा देवी मंदिर
============
यामधली पहिली स्क्वॉड्रन ही जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगरमध्ये तैनात आहे. सप्टेंबर २०२२ मध्येच ती हवाईदलातून निवृत्त केली जाणार आहे. पाठोपाठ २०२५ पर्यंत उर्वरित स्क्वॉड्रन्सबाबतही हा निर्णयहोणार आहे. हवाई दल अद्ययावत करण्याच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून हे पाऊल उचललं जाणार असं अधिकृतरित्या सांगण्यात येत असलं तरी मिग २१ (MiG-21) विमानांचे वाढते अपघात आणि त्यातून निर्माण होणारी असुरक्षितता हाही यामागचा एक विचार असण्याची शक्यता नाकारता येत नाही.