Home » विशाखा सुभेदारची माहेरपणाची ‘ती’ पोस्ट व्हायरल

विशाखा सुभेदारची माहेरपणाची ‘ती’ पोस्ट व्हायरल

by Jyotsna Kulkarni
0 comment
Vishakha Subhedar
Share

दिवाळी सण आपण सर्वांनी मोठ्या आनंदाने आणि जल्लोषाने साजरा केला. मात्र अजूनही दिवाळीचा फिवर सगळ्यांमध्ये दिसून येत आहे. दिवाळीचा सण हा नेहमीच आनंद घेऊन येतो. प्रकाशाचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळीचे अजून एक महत्व आहे. ते म्हणजे आजच्या आधुनिक काळात जिथे आता एकमेकांशी विविध कारणांमुळे भेटी कमी झाल्या, त्याकाळात हीच दिवाळी सर्वाना एकत्र आणते आणि बांधून ठेवते.

अगदी सामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वांच्या कुटुंबाना बांधून ठेवण्याचे काम दिवाळी किंबहुना आपले सण करतात. दिवाळीचा शेवटचा दिवस भाऊबीज नुकतेच साजरा झाला. यादिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते आणि त्याच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करते. यंदाची दिवाळी मोठ्या उत्साहाने साजरी झाली. सोशल मीडियावर देखील कलाकारांनी त्यांच्या दिवाळी सणाचे फोटो पोस्ट केले होते.

मराठी मनोरंजनविश्वातील विनोदाची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विशाखा सुभेदाराने देखील तिची भाऊबीज साजरी केली. अनेक वर्षांनी भाऊबीजेच्या निमित्ताने तिला माहेरवास घडला. विशाखाने याबाबत एक पोस्ट शेअर करत तिच्या जुन्या दिवाळीच्या आठवणींना उजाळा देत यावर्षीची तिची दिवाळी कशी खास झाली याबाबत भावना व्यक्त केल्या.

विशाखाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “अनेक वर्षांनी आमची भाऊबीज साजरी झाली…दादा दिवाळीला दुबईला असायचा कारण सर्व्हिस…यावर्षी मात्र सुट्टी…आणि आमची भाऊबीज साजरी झाली…अचानक दोघांचे रंग जुळले…ट्युनिंग का काय म्हणतात तसं झालं… काल माहेरपण उपभोगलं. एक संपूर्ण दिवस…पूर्वी कसं लांबच्या गावात मुलगी दिलेली असायची…पोर माहेरपणाला आली की चांगलं महिनाभर रहायची…पण ते सुख जवळ लग्न होणाऱ्या पोरींच्या नशिबी फार कमी येतं…आमचं माहेरपण म्हणजे ७/८ तासांचं फारफार, लयं झालं तर चार दिवस..की आम्ही निघालो…अर्थात सासूबाई मागे लागायच्या, नवरा चल म्हणायचा असं काहीच नसायचं…आम्हालाच करमायचं नाही…आपण कधी एकदा आपल्या घरी जातोय असं वाटायचं..”दिल्या घरी सुखी रहा..”

पण खरंच असं खूपदा वाटतं सुट्ट्या काढून माहेरी जाता यायला पाहिजे…(आम्ही जायचो लहानपणी असे आईबरोबर, मावशीबरोबर ) आपापल्या भाच्याबरोबर दुपारी झाडाखाली पत्ते कुटता यायला पाहिजे…सुट्टीत आलेल्या बहिणीच्या उवा काढता आल्या पाहिजेत…भाच्यांचे पाढे पाठ करून घेता आले पाहिजेत…चिंचा फोडता आल्या पाहिजेत, झोके घेता आले पाहिजेत, भांडी घासता घासता आयुष्य बोलता बोलता डोळ्यात पाणी यायला हवं आणि पुसायला बहिणीचा, आईचा पदर असायला हवा…हे सगळं माहेरपण आमच्या आया मावशींनी अनुभवलं…आम्हा बच्चे कंपनीचे लाड करता करता… सकाळी गरम गरम चहा-चपाती, दुपारी आयत गरम त्यांच्या त्यांच्या आयांच्या हाताचं मटण, चिल्लसखेळ, बांगड्या नाचे खेळ आणि पोतपोत गहू निवडून देऊन आईच काम कमी करणं हे सगळे दुपारचे उद्योग आणि रात्री अंगणात गप्पा भावांडाबरोबर आणि मग जायची वेळ यायची. तेव्हा आम्ही रडत गाड्या पकडायचो…काय गंमत होती…पूर्वीच्या शेणाने सारवलेल्या माहेराची.

आजही माहेरची ओढ कायम पण वेळ कमी…धावपळीच आयुष्य…प्रेम आहेच ते असणारच…पण गोंजारायला वेळ नाही…फक्त धावपळ…पण जवळ असल्याने कधीही पाच मिनिटासाठी का होईना आईकडे डोकावत येतं. आईला सुद्धा वाटलं यावंसं तर येता येतं, हेही तितकच खरं…मज्जा असते सणवारी आणि सुट्टी मिळाली तरच मज्जा आहे…थोडं विषयांतर झालं पण मनात आलं ते लिहित गेले…तर भाऊबीज…नानांनंतर आत्ता दादा…तुला खूप खूप प्रेम…ओढ कायम…”

दरम्यान विशाखाच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील तिच्या लिखाणाचे कौतुक करत तिच्या भावना या अगदी आमच्याच भावना असल्याचे म्हटले आहे. तत्पूर्वी विशाखा मराठी मनोरंजनविश्वातील एक अष्टपैलू अभिनेत्री आहे. ‘फुबाईफू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली विशाखा सध्या ‘शुभविवाह’ या मालिकेत खलनायिका रंगवत आहे. यासोबतच तिने अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका केल्या आहेत.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.