Home » ‘या’ मंदिरात रचले गेले महाकाली स्तोत्र

‘या’ मंदिरात रचले गेले महाकाली स्तोत्र

by Team Gajawaja
0 comment
Mahakali Stotra
Share

मध्यप्रदेशमधील इंदौर आणि उज्जैन ही दोन शहरे अनेक धर्मस्थळांनी प्रसिद्ध आहेत. उज्जैनमधील श्री महाकालेश्वर हे भारतातील बारा प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.  महाकाल नगरी म्हणून गौरवलेल्या उज्जैनमधील गढकालिका माता मंदिरही भक्तांसाठी कायम वंदनीय राहिले आहे. आता नवरात्रीच्या दिवसांमध्ये या गढकालिका मातेला वंदन करण्यासाठी फक्त भारतातीलच नव्हे तर परदेशातील मातेचे भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत.  या गढकालिका माता मंदिराची अनेक वैशिष्टे आहेत.  कवी कालिदास हे या मातेचे उपासक होते.  मुख्य म्हणजे,  कवी कालिदास लिखित महाकाली स्तोत्रही याच मंदिरात लिहिले गेल्याचे सांगितले जाते.  तांत्रिकांची देवता म्हणूनही या गढकालिका मातेचा उल्लेख केला जातो.  या मंदिराची स्थापना सत्ययुगात झाली असून सम्राट हर्षवर्धन यांनी या मंदिराची पुर्नबांधणी केल्याची माहिती आहे. या देवीच्या चरणी येणा-या भक्तांचे दुःख माता दूर करते, अशी धारणा आहे.  आता नवरात्रीच्या नऊ दिवसात या मंदिरामध्ये दिवसरात्र होमहवन आणि पूजांचे आयोजन करण्यात आले आहे. (Mahakali Stotra)

बाबा महाकालची नगरी असलेल्या उज्जैनमध्ये महाकाल मंदिरापासून काही अंतरावर गढकालिका माता मंदिर आहे.  या मातेचे लाखो भक्त आहेत.  मातेच्या भक्तांमध्ये प्राचीन कवी कालिदास यांचाही समावेश होता.  कवी कालिदास हे  गढ कालिका देवीचे उपासक होते.  देवीची सेवा करण्यासाठी ते काय मंदिरात पूजा करण्यात कालिदास एवढे गुंग होऊन जात की, त्यांच्या मुखातून कायम देवीची स्तुती बाहेर येत असे. त्यांनी जेव्हापासून गढकालिका मातेची पुजा सुरु केली, तेव्हापासून मातेची मुर्ती अधिक तेजस्वी झाल्याचे सांगण्यात येते. (Mahakali Stotra)

कवी कालिदास यांनी देवीची स्तुती गात असताना  श्यामला दंडक‘ हे महाकाली स्तोत्र रचले गेले.  हे स्तोत्र थोर कवीच्या मुखातून प्रथम याच मंदिरात आले.  त्यामुळेच दरवर्षी कालिदास उत्सवापूर्वी कालिका देवीची पूजा केली जाते. गढकालिका माता ही तांत्रिकांची देवताही मानली जाते.  मुळात गढकालिका मातेची मुर्ती ही स्वयंभू असल्याची आख्यायिका सांगण्यात येते.  हे मंदिर महाभारत काळात बांधण्यात आल्याचेही सांगितले जाते.  पण या मंदिरातील मुर्ती ही सत्ययुगातील असल्याचा उल्लेख आहे. या मंदिराचा स्थानिक राजांनी वेळोवेळी जिर्णोद्धार केला. सम्राट हर्षवर्धन यांनी या मंदिराच्या पुर्नबांधणीसाठी मोठा खर्च केल्याची नोंद आहे. त्यानंतरही ग्वाल्हेरच्या महाराजांनी मंदिरामध्ये वेळोवेळी सुधारणा केल्या आणि मंदिराचे सुशोभिकरण केले.  त्यामुळेच हे मंदिर बघण्यासाठीही मोठी गर्दी होते. गढकालिका माता मंदिराची मोठी ख्याती आहे. या मंदिर परिसरातील वातावरण अतिशय धार्मिक असते. मंदिर परिसरात असलेल्या दोन दिपस्तंभांवरील रोषणाई पाहण्यासाठीही भाविकांची गर्दी असते.  गढकालिका मातेचा महिमा एवढी आहे की, मातेच्या दर्शनासाठी पहाटे पासून गर्दी होते. रात्री उशीरापर्यंत मातेच्या दर्शनासाठी गर्दी असते. तंत्रसाधकांची देवी असलेल्या या गढकालिका मातेच्या मंदिरात तंत्र साधनेसाठी देशाच्या कानाकोप-यातून अनेक तांत्रिकही येतात. (Mahakali Stotra) 

या मंदिराचे स्थापत्यशास्त्रही वैशिष्टपूर्ण आहे. अनेक राजांनी या मंदिराच्या उभारणीत सहाय्य केल्यानं मंदिराची स्थापत्यशैली नेमकी कुठल्या दशकातील आहे, हे सांगणं कठीण आहे.  या मंदिरात प्रवेशद्वारासमोर सिंहाची मूर्ती असून आजूबाजूला धर्मशाळा आहेत. या धर्मशाळांमध्ये अत्यंत माफक दरात रहाण्याची सोय होऊ शकते. या धर्मशाळांच्या मधोमध हे मंदिर आहे. या मंदिराजवळ एक गणेश आणि हनुमान मंदिर आहे.  मंदिर परिसरात  विष्णूची चारमुखी मूर्ती आहे. गणेश मंदिरापासून जवळच शिप्रा नदी असून घाटावर सतीच्या अनेक मूर्ती आहेत.  उज्जैनमध्ये झालेल्या सतींचे येथे स्मारक बांधण्यात आले आहे. या गढकालिका मंदिराचा उल्लेख अनेक पौराणिक ग्रंथांमध्येही आहे. शक्ती-संगम-तंत्रामध्ये गढ कालिकेचा उल्लेख अवंति संग्यके देश कालिका तंत्र व्यष्टतिअसा आहे.  तर लिंग पुराणातही या गढकालिका मातेच्या मंदिराबाबत उल्लेख आहे.  

============

हे देखील वाचा : काशीमध्ये कालभैरवाला पहिला मान का दिला जातो ?

============

या मंदिरात नवरात्रौत्सवानिमित्त मोठी जत्रा भरते. आता नवरात्रौत्सवात मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी लहान मुलांना आणण्यात येते.  नवरात्रीला मातेला धागा चढवून तोच धागा मुलांना आशीर्वाद म्हणून देण्यात येतो.  त्यामुळे माता सदैव लहान मुलांवर आपला आशीर्वाद ठेवते, अशी धारणा भक्तांमध्ये आहे.  मातेच्या मंदिरात प्रसाद म्हणून लिंबू वाटण्याची परंपरा आहे.  दस-याला देवीच्या मंदिरात मोठा उत्सव होतो. या उत्सवालाही भाविकांची मोठी गर्दी होते.  

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.