भारतीयांसाठी भगवान विष्णू हे परम श्रद्धेचे स्थान आहे. या भगवान विष्णूचे सर्वात मोठे मंदिर कुठे आहे, याचे उत्तर आपल्याला माहित आहे का? या प्रश्नाचे उत्तर भारतात नाही, तर भारतापासून 4800 किमी दूर असलेल्या एका देशात आहे. हा देश आहे, कंबोडिया. (Largest Hindu temple)
कंबोडियामधील अंगकोरमध्ये सर्वात मोठे विष्णू मंदिर असून 12 व्या शतकातील या मंदिराची भव्यता थक्क करणारी आहे. अत्यंत नियोजनबद्ध बांधलेले हे मंदिर काही वर्ष काळाच्या ओघात हरवले होते. मात्र 19 व्या शतकाच्या मध्यात फ्रेंच संशोधक हेन्री यांनी हे मंदिर शोधून काढलं. त्यासाठी हेन्री पाच दिवस या परिसरात भटकत होता. तेव्हा कुठे त्याला या मंदिराची भव्यता मोजता आली. भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनीही या मंदिराला भेट दिली आणि त्याची भव्यता पाहून आर्श्चय व्यक्त केलं. तसेच या मंदिराच्या संवर्धनासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासनही दिलं.

१२ व्या शतकाच्या आसपास, राजा सूर्यवर्मा द्वितीय यांनी हे भगवान विष्णूचे मंदिर उभारले. राजा सूर्यवर्मा भगवान विष्णूंचा भक्त आणि कलेचा उपासक होता. त्यामुळे मंदिर उभारताना अत्यंत सुंदर दिसावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले. फक्त मंदिराचाच नाही तर, राजानं मंदिराची सुरक्षाही महत्त्वाची मानली. त्यासाठी मंदिर एका गोलाकार खंदकाने संरक्षित करण्यात आले. या खंदकाची रुंदी सुमारे 700 फूट आहे. हा खंदक लांबून एखाद्या तलावासारखा दिसतो. (Largest Hindu temple)
खंदक ओलांडण्यासाठी मंदिराच्या पश्चिमेला पूल आहे. हा पूल ओलांडल्यावर सुमारे 1,000 फूट रुंद मंदिरात प्रवेश करता येतो आणि त्यासोबत अतिभव्य अशा मंदिराची कला पाहता हरवून जायला होतं. राजा सूर्यवर्मन द्वितीय यांनी 1112 ते 1153 इसवी सन दरम्यान बांधण्यास सुरु केले पण मंदिर राजा धरिंद्रवर्मन यांच्या कारकिर्दीत पूर्ण झाल्याचा उल्लेख आढळतो. मंदिराभोवती खंदकाबाबत काही कथा प्रसिद्ध आहेत, त्यामध्ये प्रमुख कथा म्हणजे राजा इंद्रदेवानं आपल्या मुलाच्या इच्छेखातर एका रात्रीत हा खंदक तयार करुन मंदिराला सुरक्षित केले.
कंबोडियामधील अंगकोर या शहराचे जुने नाव यशोदपूर होते. मिकांक नदीच्या काठावर असलेल्या सिम्रीप शहरात स्थापित या मंदिराचा गौरव ‘टाइम मॅगझिन’ने जगातील पाच आश्चर्यांपैकी एक मंदिर म्हणून केला आहे. अंगकोर येथील हे भगवान विष्णूचे मंदिर 8 लाख 20 हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर उभारण्यात आले आहे. यातूनच त्याची भव्यता किती असेल याचा अंदाज येतो. या मंदिराला युनेस्कोने जागतिक वारसा म्हणूनही घोषित केले आहे.

इसवी सन १११२ ते ११५३ या काळात बांधल्या गेलेल्या या मंदिराचे आता अवशेष बाकी राहिले असले तरी त्यातूनही त्याकाळच्या संपन्नतेचा इतिहास उलगडला जातो. विशेष म्हणजे जगातील मोठे मंदिर म्हणून ओळख मिळालेल्या या विष्णू मंदिराचा आकार दिल्लीच्या अक्षरधाम मंदिराच्या 4 पट आहे. (Largest Hindu temple)
जवळपास 162.6 हेक्टर जागा या मंदिरांनी व्यापली आहे. यशोधरपूर म्हणून ओळख असलेला हा परिसर सम्राट सूर्यवर्मनच्या काळात अतिसंपन्न होता. मिकांक नदीच्या काठावर वसलेले सिम्रीप शहर तेव्हा राजधानीचे शहर होते. आता या मंदिराला कंबोडियाच्या राष्ट्रध्वजातही स्थान देण्यात आले आहे. हे मंदिर मेरू पर्वताचेही प्रतीक मानण्यात येते.
=====
हे देखील वाचा – भारतातील ‘ही’ आहेत नागदेवतेची मंदिरे
=====
अतिशय सुंदर मंदिरांचा समूह असलेला हा सर्व परिसर हिंदू धर्मग्रंथातील कथांच्या चित्रांनी सजवण्यात आला आहे. रामायणातील काही कथा येथे चितारण्यात आल्या असून, असूर आणि देवतांमधील समुद्रमंथनाचं दृश्यही साकारण्यात आलं आहे. पर्यटक येथे केवळ वास्तुशास्त्राचे अनोखे सौंदर्य पाहण्यासाठी येत नाहीत, तर येथील सूर्योदय आणि सूर्यास्त याचे दृश्यही अत्यंत विलोभनीय असते.

या मंदिराचा उल्लेख स्थानिक जलमग्न मंदिर उद्यान म्हणून करतात. मंदिर परिसरातील पाण्याचे खंदक आणि पाण्याच्या नियोजनाची व्यवस्था यांचाही अभ्यास करण्यासाठी अभ्यासक या मंदिराला भेट देतात. हे विष्णू मंदिर एका उंच आणि मोठ्या व्यासपीठावर उभारले आहे. मंदिराचे विभाजन तीन भागात करण्यात आले आहे. प्रत्येक भागात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या पायऱ्या आजही चांगल्या स्थितीत असून त्यातून हे बांधकाम करताना किती काळजी घेतली असेल, याचा अंदाज येतो. (Largest Hindu temple)
मंदिराच्या प्रत्येक विभागात आठ घुमट आहेत. त्यापैकी प्रत्येकाची उंची 180 फूट आहे. मुख्य मंदिर तिसर्या विभागाच्या रुंद परिसरात वसलेले आहे. हा शिखर 213 फूट उंच असून हा सर्व भाग अत्यंत भव्य अशा शिल्पांनी सजवण्यात आला आहे. पौराणिक कथेनुसार, या राज्याचा संस्थापक कौंदिन्य नावाचा ब्राह्मण शासक होता. एका संस्कृत शिलालेखात या ब्राह्मण शासकाचा उल्लेख आढळतो.
जयवर्मा तिसरा हा नवव्या शतकात कंबुजाचा राजा झाला आणि त्याने 860 च्या सुमारास अंगकोर्थोम नावाची राजधानी स्थापन केली. सुमारे चाळीस वर्ष राजधानीच्या उभारणीचं काम सुरु होतं. 900 च्या सुमारास राजधानी तयार झाली. या भागात आढळणाऱ्या जुन्या संदर्भ ग्रंथात या राजधानी उभारणीबाबत अनेक उल्लेख आढळतात. संपन्न असलेल्या कंबुजवर 14 व्या शतकाच्या मध्यात अनेक आक्रमणं होऊन राजधानीचे शहर अंगकोर्थोम लुटण्यात आले. त्यानंतर हे शहर उजाड झाले. नंतर शोधकर्त्यांनी या भव्य शहराचे अवशेष शोधून काढल्यावर आर्श्चय वाटेल असा इतिहास उलगडला आहे.

या मंदिर परिसरात फक्त मंदिरेच आहेत असं नाही, तर इमारती, प्राचीन राजवाडे, तलाव सापडले असून त्यातून समृद्ध अशा मानवी संस्कृतीच्या खुणा अभ्यासकांना मिळाल्या आहेत. आता या मंदिराला हिंदू पर्यटक भेट देतात. त्याचप्रमाणे या संस्कृतीवर काही काळ बौद्ध संस्कृतीचा प्रभाव असल्यानं बौद्ध पर्यटकही या भागाला मोठ्या प्रमाणात भेट देतात. हा मंदिराचा परिसर एका दिवसात बघता येत नाही, इतकी त्याची व्यापकता आहे. (Largest Hindu temple)
येथील शिलालेखही अभ्यासकांची उत्सुकता वाढवतात. येथील दगडावरच्या चित्रांमध्ये राम कथा चित्रित केली आहे. मंदिर परिसरात तत्कालीन सम्राट, बळी-वामन, स्वर्ग-नरक, समुद्रमंथन, देव-दानव युद्ध, महाभारत, हरिवंश पुराण आणि रामायण यांच्याशी संबंधित अनेक शिलालेख आहेत. ही शिलालेखांची मालिका रावणाच्या वधासाठी देवतांनी केलेल्या पूजेपासून सुरू होते. त्यानंतर सीता स्वयंवराचा देखावा आहे. पुढील शिलालेखात राम धनुष्यबाण घेऊन सोन्याच्या हरणाच्या मागे धावताना दिसतो. राम-रावण युद्ध, सीतेची परीक्षा आणि रामाचे अयोध्येला परतणे अशी चित्र या भींतीवर रेखाटण्यात आली आहेत. अत्यंत दुर्मिळ असलेली ही चित्रे तेवढीच रेखीव आहेत.
आता या मंदिराच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. या मंदिराला लाखो पर्यटक भेट देत असल्यानं पर्यटनदृष्ट्याही मंदिर महत्त्वाचे ठरले आहे. भारतातील भगवान विष्णूचे भक्तही आता या मंदिराची भव्यता बघण्यासाठी आणि भगवान विष्णूचे दर्शन घेण्यासाठी कंबोडियामध्ये जात आहेत. तरीही या मंदिराचा माहिती सर्वत्र पोहचवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे झाल्यास या मंदिराची किर्ती पूर्वीप्रमाणेच सर्व जगात होणार आहे.
– सई बने