लहान मुलं हा आपल्या समाजाचा एक मोठा आणि महत्वाचा भाग आहे. लहान मुलांशिवाय आपण आपल्या आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही. लहान मुलं आवडत नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. अतिशय निरागस, लाघवी असणारी ही मुलं म्हणजे आपला, देशाचा, समाजाचा भविष्यकाळ आहे. या मुलांवर लहान असतानांच उत्तम संस्कार करणे, होणे आवश्यक आहे. आपल्याकडे एक वाक्य अनेकदा म्हटले जाते, ‘लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा जसा आकार देऊ तसे घडणार’.
लहान मुलांना त्यांच्या लहानपणीच योग्य शिकवण दिली तरच आपला, त्यांचा भविष्यकाळ चांगला असणार आहे. याच लहान मुलांना त्यांच्या कमी वयातच बाल हक्कांबाबत माहिती देण्यासाठी, शिक्षण, आरोग्य, आपली संस्कृती, आपला देश, आपला इतिहास आदी अनेक गोष्टींबद्दल हळूहळू जागरूक करण्यासाठी प्रत्येक जणं प्रयत्नशील असतो. मात्र तरीही एक खास दिवस फक्त याच लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तो दिवस म्हणजे ‘बालदिन.’
दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस आपण बालदिन म्हणून साजरा करत असतो. हा दिवस साजरा करण्यामागचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मुलांना त्यांच्या लहान वयातच अनेक गोष्टींची सोप्या पद्धतीने जाणीव करून देणे हा आहे. आजच्या काळात तर याच वयात मुलांना अनेक ऍडव्हान्स गोष्टींबद्दल देखील सजग करण्याचे देखील काम आता या दिवशी केले जाते.
१४ नोव्हेंबर रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी केली जाते. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत भारतात बालदिन साजरा करण्यात येतो. १४ नोव्हेंबर १८८९ रोजी उत्तरप्रदेशमधील प्रयागराज इथे नेहरू यांचा जन्म झाला होता. लहान मुल म्हणजे नेहरूंचा जीव की प्राण. नेहरू नेहमीच एक वाक्य म्हणायचे ‘मुलं म्हणजे देवा घरची फुलं’ असतात. याच लहान मुलांवरील त्यांचे खूपच प्रेम होते. ते लहान मुळांमध्ये खूप रमायचे. त्यांचे लहान मुलांवरील प्रेम पाहूनच नेहरूंचा जन्मदिन हा दिवस भारतात बालदिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो.
जगात पहिल्यांदा १८५६ साली इंग्लंडमध्ये चेल्सी इथे बालदिन साजरा करण्यात आला होता. तेव्हा त्या दिवशी चर्चमध्ये लहान मुलांसाठी एक संपूर्ण दिवस खास पद्धतीने विचारपूर्वक प्लॅन करण्यात आला होता. त्या दिवशी लहान मुलांसाठी त्यांच्या आवडीच्या गोष्टी, वेगवेगळे खेळ, आवडते पदार्थ आदी अनेक गोष्टी आयोजित करून त्यांचा हा खास दिवस साजरा करण्यात आला होता. त्यानंतर हळूहळू जगातील इतर देशांमध्ये देखील बालदिन साजरा करण्यास सुरूवात झाली.
संयुक्त राष्ट्राने मुलांचे अधिकार आणि त्यांचे हक्क लक्षात घेऊन १९५४ साली २० नोव्हेंबर हा दिवस जागतिक बालदिन म्हणून घोषित केला. त्यानंतर जगातील सर्व देशांमध्ये २० नोव्हेंबर रोजी बालदिन म्हणून साजरा करण्यास सुरूवात झाली.
असे असले तरी जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरु यांचे १९६४ रोजी निधन झाले त्यानंतर भारतात बालदिनाची तारिख बदलली गेली. नेहरू यांना आदरांजली म्हणून आणि त्यांचे मुलांवरील प्रेम आणि त्यांच्यासाठी केलेले कार्य पाहून १४ नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून घोषित करण्यात आला. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्ताने भारतात बालदिन साजरा करण्यास सुरूवात झाली. नेहरू त्यांनी त्यांच्या कार्यकाळात आपल्या विकासकार्यात बाल कल्याण उपक्रमांना खूप आणि मोठे प्राधान्य दिले. या सर्व गोष्टींचा विचार करून २७ मे १९६४ रोजी भारतात सर्वानुमते १४ नोव्हेंबर हा दिवस ‘बालदिन’ म्हणून साजरा होईल अशी अधिकृत घोषणा करण्यात आली.
तसे पाहिले तर केवळ भारतच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये २० नोव्हेंबर ऐवजी वर्षातील इतर वेगवेगळ्या तारखांना बालदिन साजरा करण्यात येतो. अनेक देशांमध्ये १ जून रोजी बालदिन साजरा करण्यात येतो. चीनमध्ये ४ एप्रिल रोजी, पाकिस्तानात १ जुलै रोजी, अमेरिकेत जून महिन्याच्या दुसऱ्या रविवारी, ब्रिटनमध्ये ३० ऑगस्ट रोजी, जापानमध्ये ५ मे रोजी, पश्चिम जर्मनीत २० सप्टेंबर रोजी बालदिन साजरा करण्यात येतो.
पंडित सरू नेहमीच “आजची मुले उद्याचा भारत घडवतील आणि आपण त्यांचा ज्या पद्धतीने विकास करू, त्याच स्तरावर देशाचाही विकास होईल”, असे ते नेहमी म्हणायचे. त्यामुळे बालदिवसाच्या निमित्ताने देशभरात शाळांमध्ये लहान मुलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम, खेळांचे आयोजन करण्यात येतात. अनेक ठिकाणी मुलांना भेटवस्तू सुद्धा दिल्या जातात. यासोबतच या दिवशी मुलांना बाल हक्कांबाबत जागरूक केले जाते. मुलांसाठी शिक्षण, आरोग्य, संस्कृती हे फारच महत्वाचे आहे. हीच मुले आपल्या देशाचे भविष्य आहे.
पंडित नेहरू यांनी त्यांच्या कार्यकाळात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यासारख्या मोठ्या शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळेच त्यांनी मुलांच्या शिक्षणावर भर दिला आणि शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे, असे त्याचे मत होते.