Home » जाणून घ्या ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवणाऱ्या मनू भाकेरबद्दल

जाणून घ्या ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवणाऱ्या मनू भाकेरबद्दल

by Jyotsna Kulkarni
0 comment
Manu Bhaker
Share

सध्या पॅरिस हे शहर सर्व खेळाडूंसाठी आणि खेळप्रेमींसाठी पंढरीच बनले आहे. स्पोर्ट्स जगातील सर्वत महत्वाच्या, प्रतिष्ठेच्या आणि मानाच्या अशा ऑलम्पिक स्पर्धा येथे सुरु आहेत. ऑलम्पिकमध्ये जाण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. या स्पर्धांमध्ये जात आपल्या देशासाठी मेडल मिळवावे आणि देशाचे नाव मोठे करावे अशी सगळ्याच खेळाडूंची इच्छा असते. मात्र अशी संधी खूप कमी जणांना मिळते आणि या मिळालेल्या संधीचे सोने करण्याचे भाग्य अजून कमी लोकांना लाभते. (Manu Bhaker)

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अशीच एक खेळाडू ठरली जिने २०२१ मध्ये टोकियो ऑलम्पिकमध्ये मेडल जिंकता न आल्याचा वचपा आता पॅरिस ऑलम्पिकमध्ये काढला आणि मेडल पटकावले. भारतीय नेमबाज मनू भाकरने इतिहास रचला असून, तिने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकले. ऑलिम्पिकच्या इतिहासात नेमबाजीत पदक जिंकणारी मनू ही पहिली भारतीय महिला आहे. तिने अंतिम फेरीत 221.7 गुणांसह कांस्यपदक जिंकले. महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात दक्षिण कोरियाच्या दोन खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले. भारताला हे पदक जिंकून देणारी ही नेमबाज मनू भाकेर नक्की आहे कोण? चला जाणून घेऊया तिच्याबद्दल अधिक माहिती.

मनू भाकेर ही मूळची हरियाणा राज्यातील झज्जर जिल्ह्यातील गोरिया गावातील रहिवासी आहे. अतिशय सामान्य कुटुंबातील मनूने २०१८ आयएसएसएफ (ISSF) विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी दोन सुवर्णपदकांची कमाई केली होती. मनूने वयाच्या केवळ १६ व्या वर्षी २०१८ मध्ये संपन्न झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतासाठी दोन सुवर्णपदके जिंकली होती. २०२१ मध्ये टोकियो येथे संपन्न झालेल्या ऑलम्पिक स्पर्धेत तिच्या तिच्या पिस्तूलमध्ये बिघाड झाल्यामुळे दुर्दैवाने पदक जिंकू शकली नव्हती. या स्पर्धेत ती सातव्या स्थानावर राहिली.

Manu Bhaker

आतापर्यंत मनूने ५० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय आणि ७० पेक्षा जास्त राष्ट्रीय स्पर्धा खेळात पदके जिंकली आहेत. २०२३ मध्ये मनूने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अनेक वैयक्तिक स्पर्धांमध्ये भाग घेणारी २२ सदस्यीय भारतीय नेमबाजी संघातील ती एकमेव खेळाडू आहे. मनू भाकरने तिच्या शालेय जीवनात टेनिस, स्केटिंग आणि बॉक्सिंगसह इतरही अनेक खेळांमध्ये भाग घेतला आहे. तिला खेळांची खूप आवड असल्याने ती सतत विविध खेळ खेळायची. यात स्केटिंग, मार्शल आर्ट्स, कराटे, कबड्डी आदी अनेक खेळांचा समावेश होता. मनूला बॉक्सिंगमध्ये देखील रस होता. मात्र एकदा बॉक्ससिंग करताना तिच्या डोळ्याला दुखापत झाल्यामुळे तिचा बॉक्सिंगमधील प्रवास संपला होता.

======

हे देखील वाचा : जाणून घ्या ऑलिंपिक खेळांची इत्यंभूत माहिती

======

मनूच्या वडिलांनी राम किशन भाकेर यांनी तिला नेहमीच तिच्या प्रत्येक निर्णयात पाठिंबा दिला. सुरुवातीला शाळेत जाणाऱ्या मनूला नववीत असताना डॉक्टर व्हायचे होते. ती सुरुवातीपासूनच खेळात आणि अभ्यासात चांगली होती. दहावीला असताना मनू वर्गात प्रथम तर आलीच सोबतच तिची नेमबाजीसाठी राष्ट्रीय संघात निवड देखील झाली. अकरावीला असताना मनूने तिचे प्रशिक्षक असलेल्या अनिल जाखड यांच्या सांगण्यावरून आयएसएसएफ विश्वचषक, राष्ट्रकुल खेळ आणि युवा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेतला आणि इथे तिने भरीव कामगिरी करत सुवर्णपदकांची कमाई केली होती.

दरम्यान मनू भाकरने तब्बल 12 वर्षांनंतर भारताला ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी या खेळात पदक मिळवून दिले आहे. या खेळात भारताला शेवटचे पदक 2012 मध्ये झालेल्या ऑलिम्पिक खेळांमध्ये विजय कुमार यांनी 2012 मध्ये रौप्य आणि गगन नारंग यांनी कांस्यपदक जिंकले होते. तत्पूर्वी राज्यवर्धन सिंग राठोड यांनी 2004 मध्ये रौप्य, 2008 मध्ये अभिनव बिंद्रांनी सुवर्ण पदक जिंकले आहे. नेमबाजीत भारताचे हे आतापर्यंतचे 5वे पदक आहे. (Manu Bhaker)

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.