आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक सण, अनेक महत्वाचे दिवस, काळ सांगण्यात आले आहेत. हिंदू कॅलेंडरप्रमाणे अनेक तिथ्या, अनेक सण, अनेक शुभ-अशुभ काळ वर्षभरात येत असतात. यातलाच एक महत्वाचा काळ म्हणजे चातुर्मास. आषाढ महिन्यातील एकादशीपासून हा चातुर्मास सुरु होतो. आषाढ महिन्यातील सर्वात मोठी तिथे म्हणजे आषाढी एकादशी अथवा देवशयनी एकादशी.
या आषाढ एकादशीची मोठी परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभली आहे. पंढरपूरच्या विठोबाकडे संपूर्ण राज्यातून वारकरी पायी जातात, चंद्रभागेत स्नान करून त्याचा आशीर्वाद घेतात. ज्याच्या चरणात विष्णू आणि शिव अशा दोन्ही देव वास करतात अशा पांडुरंगाच्या पायावर मस्तक टेकून मागणे मागितले जाते. या दिवसापासून देव निद्रिस्त होतात आणि पुढील चार महिने ते निद्रेत असतात अशी मान्यता आहे. याच चार महिन्यांच्या कालावधीला चातुर्मास म्हणतात. आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य मिथुन राशीत येतो तेव्हा चातुर्मासाची सुरुवात होते.
हिंदू धर्मातील कालगणेनुसार आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंतचा जो काळ असतो त्याला चातुर्मास म्हणतात. हा चार महिन्यांचा काळ अत्यंत पवित्र समजला जातो. या चातुर्मासात आषाढ महिन्याचे वीस दिवस, श्रावण, भाद्रपद आणि अश्विन या तीन महिन्यांचे संपूर्ण ३० दिवस आणि कार्तिक महिन्याचे पहिले अकरा दिवस समाविष्ट असतात.
आपल्या शास्त्रानुसार मनुष्याचे एक वर्ष म्हणजे देवांचा एक दिवस आणि रात्र असते. त्यामुळे चातुर्मासाचा चार महिन्यांचा हा काळ देवांच्या निद्राधीन होण्यापासून निद्रेतून जागेपर्यंतचा काळ समजला जातो. देवशयनी एकादशीच्या दिवसापासून देवांचा निद्रावस्थेत जाण्याचा काळ सुरु होतो तो कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत असतो. या कार्तिक एकादशीला बोधिनी अथवा प्रबोधिनी एकादशी म्हणतात. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाचे आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशी हे दोन महत्वाचे दिवस आहेत.
चातुर्मासात देव झोपत असल्याने या काळात वाईट शक्तींपासून आपले रक्षण व्हावे या हेतूने या काळात व्रते, विधी, दान आणि तप केली जातात. या काळात अनेक सप्ताहांचे, सत्यनारायणाच्या पूजांचे आयोजन करण्यात येते. भविष्यपुराण, स्कंदपुराण, निर्णयसिंधु, धर्मसिंधू, कार्तिक माहात्म्य, देवलस्मृती, गार्ग्यस्मृती आदी आपल्या हिंदू धर्मांच्या ग्रंथांमध्ये चातुर्मासाचे महत्व सांगण्यात आले आहे.
शुभ मुहूर्त आणि तिथीला होणारी विवाह, मुंडन, जनेऊ विधी, विवाह, गृहप्रवेश, नामकरण आदी मांगलिक कार्ये चातुर्मासात वर्ज्य असतात. या महिन्यांत सूर्य, चंद्र आणि प्रकृतीचे तेज कमी होते. संत चातुर्मासात प्रवास करत नाहीत. ते त्यांच्या आश्रमात किंवा मंदिरात उपवास आणि साधना करतात.
चातुर्मासात काय करावे
- चातुर्मासात उपवास, तप, जप, पवित्र नद्यांमध्ये स्नान, दान, पानावर भोजन करणे हे अत्यंत फलदायी मानले जाते. या महिन्यात धार्मिक कार्य करण्यास विशेष महत्व आहे.
- चातुर्मासात अनेक लोकं चार महिने एकच जेवण घेतात आणि राजसिक, तामसिक भोजनाचा त्याग करतात.
- चातुर्मासाच्या काळात भगवान विष्णू, माता लक्ष्मी, भगवान शिव आणि माता पार्वती, श्रीकृष्ण, राधा आणि रुक्मिणीजी, पितृदेव, भगवान गणेश यांची सकाळ-संध्याकाळ पूजा करणे शुभ मानले जाते.
- चातुर्मासात दान करणे विशेष फलदायी मानले जाते. तसेच या काळात पितरांसाठी पिंडदान किंवा तर्पण करणे चांगले असते.
=======
हे देखील वाचा : जाणून घ्या आषाढी एकादशी महात्म्य आणि व्रत
=======
चातुर्मासात काय करू नये
- चातुर्मासात कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे. तसेच या चार महिन्यात केस आणि दाढी कापू नयेत आणि काळे व निळे कपडे घालू नयेत.
- चातुर्मासात निंदेचा विशेष त्याग करावा आणि निंदा ऐकणारी व्यक्तीही पापी समजली जाते. या महिन्यात प्रवास करणे देखील टाळावे आणि अनैतिक कृत्यांपासून दूर राहावे.
- चातुर्मासात तेलाने बनवलेल्या वस्तूंपासून दूर राहा. यासोबतच दूध, साखर, वांगी, पालेभाज्या, खारट, गोड, सुपारी, तामसिक अन्न, दही, तेल, लिंबू, मिरची डाळिंब, नारळ, उडीद, हरभरा डाळ यांचाही त्याग करावा.
- श्रावण सारख्या चातुर्मासाच्या चार महिन्यांत पालेभाज्या जसे पालक व हिरव्या भाज्या, भाद्रपदात दही, आश्विनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात कांदा, लसूण, उडीद डाळ इत्यादींचा त्याग करावा.