आपल्याकडे अनेक आजार हे केवळ डासांच्या चावण्यामुळे होतात. भारतात डास ही मोठी समस्या आहे. डास बहुतकरून ओलावा, घाण यांमुळे होतात. त्यामुळे अनेकांना वाटते ती डासांची जास्त समस्या पावसाळ्यात निर्माण होते. मात्र असे नाही. बऱ्याच ठिकाणी बाराही महिने डासांचा त्रास सहन करावा लागतो.
या डासांच्या चावण्यामुळे त्रास होतो, झोप येत नाही हे तर आहेच मात्र यामुळे अनेक गंभीर आणि मोठ्या कधी कधी जीवघेण्या आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे या डासांपासून बचावासाठी अनेक लहान मोठे उपाय केले जातात. डास घरात येऊ नये यासाठी संध्याकाळ होत आली की दारं खिडक्या लावल्या जातात. घरात धूप जाळले जातात. शिवाय विविध क्रीम, नानाविध प्रकारच्या वनस्पती, मच्छरदाणी आदी अनेक गोष्टींचा वापर सर्रास केला जातो.
या सगळ्या उपायांमध्ये आपण पाहिले तर एक उपाय जवळपास सगळ्याच घरांमध्ये केला जातो आणि तो म्हणजे कॉइल लावणे. डास येऊ नये म्हणून अनेक घरांमध्ये संध्याकाळच्या वेळेला किंवा रात्री झोपताना कॉइल लावली जाते. या उपायामुळे डासांचे प्रमाण कमी होत असेलही, मात्र ही कॉइल आपल्या शरीराच्या दृष्टीने अतिशय घातक ठरू शकते. कारण या कॉइलच्या धुरामुळे, वासामुळे अनेक त्रास होऊ शकतात. नक्की ही कॉइल आपल्यासाठी कशी घटक आहे आणि कॉइलचे कोणते दुष्परिणाम होतात हे आपण जाणून घेऊया.
डासांची कॉइल जाळून डास पळून जात असले तरी त्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. एका संशोधनात असे आढळून आले की, एक कॉइल १०० सिगारेट्सइतकी धोकादायक आहे आणि त्यातून सुमारे पीएम २.५ धूर निघतो, जो खूप जास्त आहे. म्हणजे ते शरीरासाठी हानिकारक आहे.
मुख्यत्वे ही डासांची कॉइल रात्रीच्या वेळी झोपताना घरात जाळली जाते. जेव्हा घरातील सर्वच दारं आणि खिडक्या बंद असतात आणि वातावरण बंदिस्त असते. वारा आतबाहेर करण्यासाठी जास्त जागा नसते. त्यामुळे अशा वेळी मॉस्किटो कॉइलपासून तयार झालेला धूर रात्रभर घरातच राहतो. आपण झोपेत असताना तो धूर आपण आपल्या श्वासासोबतच नाकावाटे, तोंडावाटे आपल्या शरीरात घेतो. हा धूर आपल्या शरीरात गेल्यामुळे आपल्याला मोठे आणि गंभीर आजार होण्याच्या शक्यता वाढते. कधी कधी श्वास घेण्याच्या त्रासामुळे माणसाचा मृत्यू होण्याची शक्यता देखील दाट असते.
या मॉस्किटो कॉइलमध्ये अनेक केमिकल्स असतात जे आपल्या फुप्फुसांमध्ये शिरतात. ज्यामुळे फुप्फुसांचे नुकसान होते. यामुळे बऱ्याचदा भविष्यात श्वास घेण्यासंबंधी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ज्यात दम्याचाही समावेश आहे. अनेकांना या धुरामुळे त्वचेसंबंधी एलर्जी देखील होते. हा विषारी धूर आपल्या मेंदुचं देखील नुकसान करतो.
याशिवाय डासांच्या कॉइलमधून बाहेर पडणाऱ्या धुराच्या संपर्कात आल्याने डोळ्यात जळजळ आणि डोकेदुखीचा त्रास होतो. घरात लहान मूल असेल तर त्याला या कॉइलमुळे जास्त नुकसान होऊ शकते. त्यामुळे डास घालवण्यासाठी अशा रासयनिक उपायांपेक्षा नैसर्गिक उपाय अंमलात आणणे नक्कीच श्रेयस्कर ठरू शकते.