सृष्टीचा संहारक म्हणून भगवान शंकराला ओळखले जाते. भगवान शंकरांना आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. संपूर्ण जगभरात भगवान शंकराचे अगणित भक्त आहेत. याच भगवान शंकराचे स्थान मनाला जाणाऱ्या कैलास पर्वताला देखील खूप महत्व आहे. प्रत्येक हिंदू लोकांच्या धार्मिक भावना या पर्वताशी जोडल्या गेल्या आहेत. भारत आणि चीन यांच्या सीमेवर कैलास पर्वत आहे. भगवान शंकरांचे निवास्थान म्हणून कैलास पर्वताला ओळखले जाते.
महादेव शंकर आणि देवी पार्वतीचे निवासस्थान म्हणून कैलास पर्वत ओळखला जातो. या पर्वताबाबत अनेक गोष्टी आपल्या पुराणांमध्ये सांगितल्या गेल्या आहेत. इतकेच नाही तर आपले जुने, मोठे आणि अतिशय महत्वाचे समजल्या जाणाऱ्या स्कंदपुराण, मत्स्यपुराण यांसारख्या अनेक पुराणांमध्ये या पवित्र कैलास पर्वताचे ‘कैलास खंड’ नावाने स्वतंत्र वर्णन करण्यात आले आहे. कैलास पर्वत हा हिंदूंसोबतच जैन, बौद्ध आणि तिबेटी बौद्ध या चार धर्मांच्या लोकांमध्ये अतिशय महत्वाचं असून त्यांचे आध्यात्मिक केंद्र आहे.
आपल्या हिंदू धर्मामध्ये यात्रांना अनन्यसाधारण महत्व दिले गेले आहे. यात चारधाम यात्रा, अमरनाथ यात्रा, वैष्णवदेवी यात्रा आदी अनेक यात्रांचा समावेश होतो. याच सोबतच कैलास मानससरोवर यात्राही अतिशय प्रसिद्ध, पवित्र आणि मानाची मानली गेली आहे. हजारो भाविक या यात्रेला जात असतात. कैलास पर्वताच्या अगदी जवळ हे पवित्र असे ‘कैलास मानसरोवर’ आहे.
मात्र तुम्हाला माहित आहे का…की कैलास पर्वत हा एव्हरेस्ट पर्वतांपेक्षा लहान आहे. जगातील सर्वात उंच पर्वत म्हणून एव्हरेस्ट पर्वत ओळखला जातो. या एव्हरेस्ट पर्वतावर आजपर्यंत अनेक देशी आणि परदेशी लोकांनी यशस्वी चढाई केली आहे. एव्हरेस्ट पार करणे सोपी गोष्ट नसली ती ही बाब अनेकांनी शक्य करत इतिहास रचला आहे. आता जगातील सर्वत उंच शिखर एव्हरेस्ट सर केलेले अनेक लोकं या जगात आहे, मात्र तरीही त्यांना एव्हरेस्टपेक्षा लहान कैलास पर्वत पार करणे जमले नाही.
अनेक मोठ्या, अनुभवी लोकांनी हा पर्वत चढण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी झाला. या कैलास पर्वतावर आणि आसपास अनेक रहस्यमयी बाबी अनुभवण्यात आल्या आहेत. त्या कोणत्या आणि का घडतात किंवा हा पर्वत का कोणालाही सर करता आला नाही याची उत्तरं कोणत्याही शास्त्रज्ञ किंवा संशोधकाकडे नाही. काय आहि कैलास पर्वतावरील रहस्ये चला जाणून घेऊया.
शंकराचे स्थान
कैलास पर्वत शंकराचे निवासस्थान म्हणून ओळखला जातो. आपल्या अनेक पुराणांमध्ये कैलास पर्वताचा उल्लेख आला आहे. काही जुन्या आणि पौराणिक मान्यतांनुसार कैलास पर्वताजवळ कुबेर देवतेची नगरी आहे. जगातील सर्वांत रहस्यमय पर्वत म्हणून कैलास पर्वत ओळखला जातो. रामायणात कैलास पर्वताचा उल्लेख आढळून येतो.
पृथ्वीचा केंद्रबिंदू कैलास पर्वत
शास्त्रज्ञ, संशोधक कैलास पर्वताला पृथ्वीचा केंद्रबिंदू मानतात. कैलास पर्वताचे पृथ्वीवर स्थान चकित करणारे आहे. पृथ्वीच्या एका बाजूला उत्तर ध्रुव तर दुसर्या बाजूला दक्षिण ध्रुव आहे. या दोन्ही ध्रुवांचा मध्य हिमालय पर्वत आहे. हिमालयासह पृथ्वीचा केंद्रबिंदू हा कैलास पर्वत मानला जातो. कैलास पर्वताची ही रचना अगदी अनोखी मानली जाते. जगातील सर्वांत उंच मानल्या जाणाऱ्या माऊंट एव्हरेस्ट शिखरापेक्षा कैलास पर्वत तब्बल २ हजार मीटर उंचीने कमी आहे. एव्हरेस्टची उंची 8,848.86 मीटर आहे, तर कैलास पर्वताची उंची 6,638 मीटर आहे.
कैलास पर्वताची रचना
कैलास पर्वताचा आकार एखाद्या पिरॅमिड प्रमाणे आहे. छोट्या छोट्या आकारातील तब्बल शंभर पिरामिड मिळून कैलास पर्वत बनलेला आहे, असे संशोधकांकडून सांगितले जाते. कैलास पर्वतावर अनेकदा सात प्रकारच्या प्रकाश छटा दिसतात. नासाच्या शास्त्रज्ञांच्या दाव्याप्रमाणे चुंबकीय शक्तींमुळे या प्रकाश छटा वेगवेगळ्या रंगांमध्ये दिसतात. परंतु, नक्की अशी माहिती कोणालाही माहित नाही. कैलास पर्वतावर चढाई करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.
मानससरोवर
कैलास पर्वताच्या एका बाजूला संपूर्ण जगभरातील शुद्ध असा नैसर्गिक पाण्याचा झरा मानससरोवर आहे. दुसऱ्या बाजूला क्षारांनी भरलेले व मनुष्याच्या पिण्यालायक नसलेल्या पाण्याचा स्त्रोत राक्षस सरोवर आहे. मानससरोवराचा आकार सूर्याप्रमाणे आहे, तर राक्षस सरोवराचा आकार चंद्राप्रमाणे आहे. दोन्ही सरोवरांमधून अगदी एक छोटा भाग आहे, जो या सरोवरांना वेगळे करतो. हे देखील एक रहस्यच आहे. कारण अगदी जवळ दोन भिन्न पाण्याचे सरोवर कसे असू शकतात याचा देखील शास्त्रज्ञ विचार करत आहे.
रहस्यमयी कैलास पर्वत
मोठ्या गिर्यारोहकांनी यावर चढण्यास नकार दिला आहे. बरेच लोक सांगतात की या पर्वतावर बरीच अलौकिक शक्ती आहेत. या पर्ववतार चढण्यासाठीही बरेच प्रयत्न केले गेले, परंतु आतापर्यंत कोणालाही यश आले नाही. बर्याच लोकांचे म्हणणे आहे की, हवामानामुळे कोणीही येथे पाय ठेवू शकले नाही. बरेच लोक असा दावा करतात की येथे नेव्हिगेशन करणे खूप अवघड आहे कारण येथे वारंवार दिशाभ्रम होतो.
एका गिर्यारोहकाने त्याच्या पुस्तकात लिहिले होते की, त्याने कैलास पर्वतावर चढण्याचा प्रयत्न केला होता. पण या पर्वतावर राहणे निव्वळ अशक्य होते. कारण इथे शरीरावरील केस आणि नखे वेगाने वाढू लागतात. असे का होते, याबाबत अदयाप काहीच ठोस माहिती नाही.
रशियातील एका गिर्यारोहकाने सांगितले की, जेव्हा मी कैलास पर्वताजवळ गेलो, तेव्हा माझे हृदय वेगाने धडधडत होते. मी त्या पर्वताच्या अगदी समोर होतो. पण मला अचानक अशक्त वाटू लागले आणि माझ्या मनात विचार आला की, मी इथे थांबू नये. त्यानंतर जसजसा मी खाली उतरत गेलो, तसे माझे मन हलके होत गेले. कैलास पर्वताचे शिखर दिसत असते. मात्र, तो त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. पर्वताच्या मध्यावर पोहोचताच हिमवादळे सुरू होतात आणि भयानक परिस्थिती निर्माण होतो, असा अनेकांनी अनुभव सांगितला आहे.
========
हे देखील वाचा : कानून अब अंधा नहीं !
========
ॐ काराचा नाद आणि डमरूचा आवाज
कैलास पर्वताचा आकार शिवलिंगाप्रमाणे असून, चहूबाजूने तयार झालेल्या हिमनद्यांच्या घळ्या या एखाद्या पिंडीप्रमाणे दिसतात. कैलास मानससरोवराजवळील भागात नेहमीच डमरू आणि ओमकार नाद होतो असा अनेकांनी दावा केला आहे. मात्र अजून या आवाजाचा नेमका स्रोत समोर आला नाही.
अनुभवी लोकं सांगतात की, कैलास पर्वत अत्यंत किरणोत्सर्गी आहे. त्याचा उतार ६५ अंशांपेक्षा जास्त आहे. माउंट एव्हरेस्टवर हा उतार ४० ते ६० अंशांपर्यंतचा आहे. या कारणास्तव गिर्यारोहक देखील येथे चढण्यास घाबरतात. कैलास पर्वतावर चढण्याचा शेवटचा प्रयत्न सुमारे १८ वर्षांपूर्वी म्हणजे २००१ साली झाला होता. त्यावेळी चीनने एका स्पॅनिश संघाला कैलास पर्वत चढण्याची परवानगी दिली होती. बौद्ध भिक्षू योगी मिलारेपा 11 व्या शतकात कैलास पर्वतावर चढला असे म्हणतात. या पवित्र आणि रहस्यमय पर्वतावर भेट देऊन जिवंत परत येणारा तो जगातील पहिला माणूस होता. पौराणिक कथांमध्येही याचा उल्लेख आहे.