तू आमचा राजा नाहीस, तू एक खूनी आहेस. तू लुटारु आहेस. आमच्या भूमीत तू नरसंहार केला आहेस. लूट केली आहेस. आमच्या लोकांच्या अस्थी आम्हाला परत कर आमच्याकडून नेलेली लूट परत दे मी तुला राजा मानत नाही एकेकाळी अवघ्या जगावर राज्य करणारा या ब्रिटीश राजघराण्याला हे दाहक बोल ऐकावे लागले आहेत. ब्रिटनचे राजे, चार्ल्स तिसरा आणि राणी कॅमिला हे ऑस्ट्रेलियाच्या दौ-यावर आहेत. ऑस्ट्रेलियाच्या संसदेत राजा आणि राणी आल्यावर त्यांचा भव्य स्वागत समारंभ ठेवला होता. या समारंभात ऑस्ट्रेलियन महिला सिनेटर लिडिया थॉर्प यांनी राजा चार्ल्सला जाहीर आव्हान दिले. ब्रिटीश राजवटीत ऑस्ट्रेलियातील मुळ रहिवाशांवर अनेक अत्याचार करण्यात आले होते. मोठा नरसंहार ब्रिटीश सैन्यानं केला. (King Charles And Queen Camilla)
याची आठवण करुन देत सिनेटर लिडिया थॉर्प यांनी जाहीरपणे चार्ल्स यांना खडे बोल सुनावले. थॉर्प यांची ही वाक्य जगभर पसरली आणि एकच खळबळ उडाली. आजही ब्रिटनच्या राजघराण्याला ऑस्ट्रेलियामध्ये राजेपदाचा दर्जा आहे. ब्रिटनचे राजे चार्ल्स यांना ऑस्ट्रेलियात राजाचा मान आहे. मात्र वसाहतवादाच्या स्पर्धेत ब्रिटनच्या राजघराण्यानं केलेली हिंसा कधीच विसरता येणार नाही, हे लिडिया थॉर्प यांनी जाहीरपणे सांगून राजघराण्याविरोधी आपली भूमिका जगासमोर ठेवली. यामुळे लिडिया थॉर्प या कोण आहेत, आणि ब्रिटनच्या राजघराण्याला त्यांचा विरोध का, याची जगभर चर्चा सुरु झाली. थॉर्प या वसाहतवाद आणि ब्रिटनच्या राजसत्तेविरोधात काम करत आहेत. ब्रिटन राजघराण्यानं सत्तेसाठी ऑस्ट्रेलियातील मुळ रहिवाशांची केलेली कत्तल त्यांनी जगासमोर आणली आहे. (International News)
ब्रिटनचे राजे चार्ल्स आणि राणी कॅमिला हे ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या दौ-यावर आहेत. हा दौरा त्यांच्या चांगलाच लक्षात राहणार आहे. कारण ऑस्ट्रेलियन संसंदेत अपक्ष खासदार लिडिया थॉर्प यांनी त्यांचे स्वागत ब्रिटिश राजवटीनं केलेल्या अत्याचाराची यादीच वाचून केले. राजा चार्ल्स आणि राणी कॅमिला यांनी कॅनबेरा येथे संसद भवनातील स्टँडमध्ये एका चित्राचे अनावरण केले. तेव्हाच लिडिया थॉर्प यांनी ‘तू माझा राजा नाहीस’ अशी गर्जना करत ब्रिटनने ऑस्ट्रेलियावर केलेल्या अत्याचाराची यादीच वाचली. ‘आमची जमीन परत करा, तुम्ही जे घेतले ते परत करा, राजघराणे लुटारू आहे. आमच्या मौल्यवान वस्तू परत करा. आमच्या लोकांना तुम्ही ठार केलं आहे. त्याबद्दल माफी माग अशा मागण्या थॉर्प यांनी खड्या बोलात करायला सुरुवात केली आणि एकच खळबळ उडाली. सुरक्षा रक्षकांनी राजा आणि राणीला सुरक्षित स्थळी नेले. या कार्यक्रमाला जगभरातील पत्रकार आणि मान्यवर उपस्थित होते. (King Charles And Queen Camilla)
त्यामुळे थॉर्प यांनी केलेले वक्तव्य काही क्षणात जगातील कानाकोप-यात पोहचले. अनेकांनी थॉर्प यांच्या कृतीचे अभिनंदन केले. आताच्या जगात राजेशाही हवीच कशाला. आणि ब्रिटीश राजेशाही ही लुटारु आहे, जगातील प्रत्येक देशातून नेलेल्या वस्तूंनी त्यांचे महाल सजले आहेत, अशा शब्दात थॉर्प यांना पाठिंबा दिला. अर्थात थॉर्प यांना संसदेतील सुरक्षा रक्षकांना बाहेर काढले. मात्र त्यानंतर राजा आणि राणीचा नियोजीत कार्यक्रम रद्द झाला. या सर्व प्रकारानं खासदार लिडिया थॉर्प या चर्चेत आल्या आहेत. 51 वर्षीय लिडिया यांचा जन्म 1973 मध्ये कार्लटन, व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया येथे झाला आहे. त्या गुन्नई, गुंडितजमारा आणि जॅब वुरांड वांशिक या समुदायातील आहेत. हे समुदाय ऑस्ट्रेलियातील मुळ रहिवासी आहेत. (International News)
ऑस्ट्रेलियातील स्थानिक समस्यांसाठी लढणा-या थॉर्प यांनी स्विनबर्न युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीमधून कम्युनिटी डेव्हलपमेंटमध्ये डिप्लोमा आणि सार्वजनिक क्षेत्र व्यवस्थापनाची पदवी घेतली आहे. ऑस्ट्रेलियातील राजेशाहीला त्यांनीच पहिला प्रखर विरोध केला आहे. लिडिया थॉर्प 2017 मध्ये पहिल्यांदा व्हिक्टोरियन विधानसभेत पोहोचल्या. 2020 मध्ये, व्हिक्टोरियन ग्रीन्स सदस्यांनी लिडिया थॉर्पला फेडरल सिनेटमध्ये निवडले. व्हिक्टोरियाचे प्रतिनिधित्व करणा-या लिडिया या पहिल्या आदिवासी महिला आहेत. किंग चार्ल्सने आपल्या भाषणात ऑस्ट्रेलियाच्या फर्स्ट नेशन्सच्या लोकांचा उल्लेख केल्यामुळे लिडिया या संतप्त झाल्या. कारण याच मुळ आदिवासी नागरिकांची हत्या ब्रिटीश राजवटीत झाली होती. ब्रिटिश वसाहती काळातील वेदना कधीही दूर होणार नाही असे लिडिया सांगतात. 2022 मध्येही शपथविधी समारंभात त्यांनी ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांना राणी म्हणण्यास नकार दिला होता. ऑस्ट्रेलिया ही 100 वर्षांहून अधिक काळ ब्रिटिशांची वसाहत होती. ऑस्ट्रेलियाला 1901 मध्ये स्वातंत्र्य मिळाले, परंतु ते अद्याप पूर्ण प्रजासत्ताक नाही. ऑस्ट्रेलिया ही घटनात्मक राजेशाही आहे आणि राजा चार्ल्स त्याचा प्रमुख आहे. (King Charles And Queen Camilla)
======
हे देखील वाचा : क्रूर लष्करी हुकूमशहा, खुनी ते राष्ट्रपती !
======
राजा चार्ल्स हे ब्रिटन आणि इतर 13 देशांचे राजे आहेत. या देशांना कॉमनवेल्थ देश म्हणतात. यामध्ये अँटिग्वा आणि बारबुडा, ऑस्ट्रेलिया, बहामास, न्यूझीलंड, पापुआ न्यू गिनी, सेंट किट्स आणि नेव्हिस, बेलीझ, कॅनडा, ग्रेनाडा, जमैका, सेंट लुसिया, सोलोमन बेटे, तुवालू आणि सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स यांचा समावेश आहे. 2021 पर्यंत, बार्बाडोस देखील ब्रिटीश राजेशाहीचा भाग होता, परंतु नंतर त्यापासून वेगळे झाले. आता बार्बाडोस हे जगातील सर्वात नवीन प्रजासत्ताक आहे. कॉमनवेल्थला ब्रिटनशी संबंधित देशांचा समूह म्हणतात. हे असे देश आहेत जे एकेकाळी ब्रिटनच्या ताब्यात होते. यामुळेच ब्रिटनचा राजा हा ऑस्ट्रेलियाचा राजा मानला जातो कारण तो कॉमनवेल्थ देशांमध्ये समाविष्ट आहे. (International News)
सई बने