हिंदू धर्मात कार्तिक पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. देव दिवाळी कार्तिक पौर्णिमेला साजरी केली जाते. याच कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात. भगवान शंकरानं त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा याच दिवशी वध केल्याची आख्यायिका आहे. या दिवशी दिवे दान करणे आणि विशेषत: देवी लक्ष्मीची पूजा करणे, शुभ मानले जाते. शिख धर्मीयांसाठीही हा दिवस खास आहे. या दिवशी गुरु नानक देवजी यांचा जन्म झाला होता. त्यामुळे हा दिवस शीख धर्मात तो गुरु पर्व म्हणून साजरा केला जातो. कार्तिक पौर्णिमेला राजस्थानमधील पुष्करच्या ब्रह्मदेवांच्या एकमात्र देवळातही दिपोत्सव साजरा होतो. शिवाय काशीमध्ये मोठ्या प्रमाणात दिपोत्सव साजरा होतो. अवघ्या देशभरात या कार्तिक पौर्णिमेला दिव्यांची आरास केली जाते. नदीच्या घाटावर लक्ष दिप लावले जातात. आरती होते, अगदी किल्ले आणि गावातील मंदिरांमध्येही रोषणाई करुन ही पौर्णिमा साजरी होते. (Bihar)
सगळीकडे दिव्यांचा हा उत्सव सुरु असतांना कार्तिक पौर्णिमा बिहारमध्ये काही वेगळ्याच वातावरणात होते. इथे चक्क या कार्तिक पौर्णिमेला भुतांचा मेळा भरवण्यात येतो. भुतांचा मेळा हा शब्दच ऐकला तरी भीती वाटते. मात्र बिहारमध्ये गेल्या अनेक वर्षापासून होणा-या या मेळ्याला देशभरातील हजारो नागरिक उपस्थित असतात. यावर्षीही असाच भुतांचा मेळा येथे झाला. देशभरातील तांत्रिकांच्या उपस्थितीनं या मेळ्याला गुढ स्वरुप प्राप्त होतं. कार्तिक पौर्णिमेच्या संध्याकाळी देशभर दिव्यांची आरास चालू असतांना बिहारच्या हाजीपूरामध्ये भुतांचा मेळा भरवण्यात आला होता. हाजीपूरा येथील वैशाली, कौंहारा घाटावर दरवर्षी हा भुतांचा मेळा भरवण्यात येतो. या मेळ्यासाठी हजारो लोक उपस्थित होते. गंगाघाटाजवळील स्मशानभूमी हे या मेळ्याचे स्थान असते. येथे आलेले लोक प्रथम गंगा नदीमध्ये स्नान करतात, त्यानंतर जळत्या चितांमध्ये यावेळी प्रार्थना कऱण्यात येते. या मेळ्यात येणा-यांमध्ये महिलांची संख्याही अधिक असते. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी येथे येऊन पूजा केल्याने सर्व आजार बरे होतात, तसेच कुटुंबावरही कुठले आरिष्ठ येत नाही, असे सांगितले जाते. (Social News)
यावर्षीही या कौंहारा घाटावर हजारो नागरिक उपस्थित होते. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांचा अद्भुत संगम असलेल्या या भुतांच्या मेळ्यामध्ये येणा-या हजारो नागरिकांना मोक्ष प्राप्तीसाठी गंगेमध्ये स्नान करायचे असते. त्यामुळे रात्रीच्यावेळी येथे विशेष पथक तैनात ठेवण्यात आले होते. भूत आणि तंत्र-मंत्राशी संबंधित परंपरा अनुभवायला, आसपासच्या गावांमधून पिठ्यानं पिठ्या लोक येत असतात. यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा समावेश असतो. यावर्षी ही गर्दी अधिक वाढली होती. सायंकाळपासून सुरु झालेला हा मेळा दुस-या दिवशी सूर्य आकाशात येईपर्यंत चालू राहिला. अलिकडे या मेळ्याबाबत अधिक माहिती पसरल्यामुळे हा भूतांचा मेळा म्हणजे, नेमकं काय, हे बघायलाही येणा-यांची संख्या अधिक होती. येथे येणा-या भाविकांच्या मते, गंगेत स्नान करुन आपल्या आत्म्याच्या शुद्धीचा अनुभव घ्यायचा असेल तर हा भूतांचा मेळा अनुभवायला हवा. (Bihar)
======
हे देखील वाचा : कार्तिकी पौर्णिमेला ‘या’ वस्तू दान करा आणि शुभ लाभ मिळवा
====
या मेळ्यात तंत्र-मंत्र विद्यांचा समावेश असला तरी स्वतःच्या आत्मिक शुद्धीचा मार्ग म्हणून या भुतांच्या मेळ्याकडे बघितले तर अधिक लाभ होतो, असे भाविकांचे म्हणणे आहे. या मेळ्यात रहस्यमय प्रथाही पाळणारे अनेक आहेत. कोणी तोंडात बल्ब चघळताना दिसतो तर कोणी रक्त न सांडता पायात लोखंडी सुया टाकणार असतो. हे सर्व देवाच्या आशीर्वादानं चालू असल्याचा दावा ही मंडळी करतात. काही मंडळी अगम्य भाषेत एकमेकांवर संवाद साधतांना दिसतात. या सर्वांना बघण्यासाठी मेळ्यात मोठी गर्दी होते. फक्त पुरुषच नाही तर या मेळ्यात येणा-या महिलाही अद्वितीय पराक्रम करतात. अर्थात भारतानं वैज्ञानिक प्रातांत मोठी प्रगती केली असली तरी काही पारंपारिक गोष्टींना आव्हान देता येत नाही, तसेच या मेळ्याबाबत होत आहे. यावर्षीही मोठ्या प्रमाणात भाविक या मेळ्यात आले होते. त्यांनी गंगास्नान करुन गंगा घाटावर दिवे लावले आणि मग चितेच्या अग्निभोवती फे-याही मारल्या. विशेष म्हणजे, या सर्व कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येते. मोक्षप्राप्तीच्या उद्देशानं आलेल्या हजारो नागरिक आणि तांत्रिकांना सामावणारा हा मेळा दुस-या दिवशीपर्यंत मोठ्या उत्सावात संपन्न झाला. (Social News)
सई बने