कारगिल! हा शब्द ऐकून प्रत्येक भारतीयाच्या मनात आसू आणि हसू एकाच वेळी दाटून येतं. कारण याच दिवशी १९९९ साली भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. एकीकडे विजयाचा आनंद तर, दुसरीकडे सैन्यात शहीद झालेल्या सैनिकांबद्दलचं दुःख मनात दाटून येतं.
कारगील म्हणजे लेह आणि श्रीनगरमधील राष्ट्रीय महामार्गावरील या रस्त्यावर वसलेलं एक छोटंसं गाव. लष्कराच्या अनेक चौक्या या भागात आहेत. कारगील सोबतच आग्नेयेकडील द्रास व नैरूत्येकडील मश्को खोऱ्यातील तसेच बटालिक विभागातील चौक्यांवरही पाकिस्तानने घुसखोरी केली होती. द्रास व मश्को खोऱ्यांमध्ये उन्हाळा सामान्य तापमानाचा तर, हिवाळा एकदम कडक. हिवाळ्याच्या दिवसांत इथे सैन्य तैनात करून ठेवणं अत्यंत अवघड असल्यामुळे हिवाळ्यापूर्वी दोन्ही देशांचे सैन्य माघारी फिरत असे आणि उन्हाळ्यात हवामान सामान्य झाल्यावर दोन्ही देशांचं सैन्य आपापल्या चौक्यांमध्ये परत येत असे. एक प्रकारचा अलिखित समझौता या दोन देशांमध्ये कारगील युद्धाच्या आधीपर्यंत होता.
पण १९९९ साली मात्र भारताच्या भविष्यात काही वेगळंच घडणार होतं. भारतीय सैन्य चौक्यांवर परतण्यापूर्वीच पाकिस्तानी घुसखोरांनी ऐन हिवाळ्यात चौक्यांचा ताबा घेतला. यामुळे चौक्यांचा ताबा घेतला गेल्याने राष्ट्रीय महामार्ग १ अ तोफगोळ्यांच्या टप्प्यांत आला. इथेच कारगिल युद्धाची ठिणगी पडली.
४ मे १९९९ रोजी कारगिल चौकीवर पाकिस्तानी सैन्याने ताबा मिळवल्याची बातमी भारतीय सैन्याला मिळाली आणि भारतीय सैन्य सावध झाले. भारतीय सैन्याने संरक्षणास सुरुवात केली. सर्वेक्षणासाठी गेलेले कॅप्टन सौरभ कालिया बेपत्ता झाले. यानंतर २६ मे रोजी भारतीय हवाई दलाने कारगिलमधील पाकिस्तानी सैन्याच्या छावण्यांवर हवाई हल्ले सुरु केले. २७ मे ला मिग विमान दुर्घटना झाली. त्यामधील वैमानिकाला पाकिस्तानने युद्धकैदी म्हणून बंदी बनवून ठेवले. अर्थात नंतर आठ दिवसांनी त्याला भारतीय सैन्याच्या ताब्यात देण्यात आले. परंतु त्याआधीच ३१ मे १९९९ रोजी अटल बिहारी वाजपेयी यांनी कारगिलमध्ये युद्धसदृश्य परिस्थिती असल्याचं जाहीर केलं.
युद्धाच्या बातमीने संपूर्ण देश हादरला. भारतीय मीडियाने कारगिलमध्ये जाऊन युद्धाचं लाइव्ह स्ट्रीमिंग केलं. संपूर्ण जगाने टीव्हीवर बघितलेलं हे पहिलं युद्ध होतं. १० जून रोजी पाकिस्तानकडून छिन्नविछिन्न अवस्थेतील विटंबना केलेले सहा भारतीय जवानांचे मृतदेह भारतामध्ये पाठवण्यात आले आणि सैन्यासह तमाम देशवासीयांच्या संतापाचा उद्रेक झाला.
यानंतर १२ जून रोजी दिल्लीमध्ये दोन्ही देशांच्या तत्कालीन परराष्ट्र मंत्र्यांची म्हणजेच जसवंत सिंग आणि सरताज अजीज यांची बैठक झाली परंतु त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. पाकिस्तानच्या आठमुठेपणासमोर भारत झुकला नाही. अटलबिहारी वाजपेयी सरकारने तेव्हा “झुकेना नही…’ ही भूमिका घेतली.
पाकिस्तान समझोता करायला तयार नव्हता. अगदी त्यावेळचे अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांची विनंतीही पाकिस्तानने धुडकावून लावली. आपल्या साथीदारांच्या देहाच्या विटंबनेमुळे भारतीय सेनाही संतप्त झालेल्या सैन्याने आक्रमक पवित्र घेतला.
अटलजींचा ठाम पाठिंबा
ज्यावेळी पाकिस्तानी सैन्य नियंत्रण रेषा ओलांडून भारताच्या सैन्याच्या रिकाम्या चौक्यांवर ताबा मिळवल्याची माहिती भारतीय सैन्याला मिळाली त्यावेळी भारतीय सैन्याला पाकिस्तानशी युद्ध करण्यासाठी तातडीने सरकारी परवानगी हवी होती. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना यासंदर्भात गृह आणि संरक्षण मंत्रालयाकडून संपूर्ण परिस्थितीची माहिती देण्यात आली. त्यावेळी गृहमंत्री, संरक्षण मंत्री आणि लष्करातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये युद्धाची परवानगी तर देण्यात आलीच शिवाय युद्धाच्या रणनीतीचाही विचार करण्यात आला. या बैठकीनंतर पाकिस्तानच्या या नापाक कृत्यावर भारताने आक्रमक भूमिका घेतली.
निवृत्त मेजर जनरल सी. प्रकाश यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, त्यावेळी पंतप्रधान अटलजी यांची भूमिका पूर्णपणे आक्रमक होती. कारगिलमध्ये एलओसी ओलांडून पाकिस्तानी लष्कराच्या हल्ल्याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ पाकिस्तानला हद्दपार करण्याचे आदेश दिले. तसंच या युद्धात सैन्याला कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सर्व सुविधा पुरविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी अटलबिहारी वाजपेयी स्वतः रणभूमीवर गेले. तीन दिवस तिथे राहून त्यांनी अधिकारी आणि सैनिकांना प्रोत्साहन दिलं. या साऱ्यामुळे भारतीय सैन्याचा आत्मविश्वास आणि हिम्मत वाढली. भारतीय लष्कराने टायगर हिल्स प्रदेशातील दोन महत्त्वाच्या चौक्या ताब्यात घेऊन ४ जुलै रोजी संपूर्ण टायगर हिल्स प्रदेशावर ताबा मिळवला
=====
हे देखील वाचा: National Flag Code मध्ये बदल, जाणून घ्या संबंधित महत्वाच्या गोष्टी
=====
यानंतर मात्र पाकिस्तानला जोरदार चपराक बसली. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी वॉशिंग्टनमध्ये जाऊन बिल क्लिंटन यांची भेट घेतली. या भेटीनंतर नवाज यांनी ५ जुलै रोजी पाकिस्तान कारगिलमधून सैन्य मागे घेत असल्याची घोषणा केली. यानंतर तब्बल ६ दिवसांनी म्हणजेच ११ जुलैला पाकिस्तानने आपलं सैन्य मागे घ्यायला सुरवात केली. १४ जुलै रोजी कारगिल युद्ध भारताने जिंकल्याचे तर २६ जुलै रोजी युद्ध संपल्याची औपचारिक घोषणा करण्यात आली.
सैनिकांचे अंत्यसंस्कार
याआधी १९६२, १९६५ आणि १९७१ मध्येही युद्ध झाली होती. परंतु या युद्धांत मृत्युमुखी पडलेल्या जवानांचे मृतदेह त्यांच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था नव्हती. ज्या ठिकाणी सैनिक आणि अधिकारी शहीद झाले, त्याच ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करून त्यांच्या अस्थी घरी पाठवण्यात आल्या होत्या. परंतु कारगिल युद्धाची रणनीती ठरल्यावर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी यासंदर्भातही आदेश दिला.
या आदेशानुसार, कोणत्याही ठिकाणी अगदी दुर्गम शिखरावर शहीद झालेला सैनिक किंवा अधिकाऱ्यांचे पार्थिव त्याच्या घरी पोचवण्यात येईल. त्यासाठी जी काही साधनसामुग्री लागेल, ती सर्व सरकारतर्फे उपलब्ध करून दिली जाईल. पंतप्रधानांच्या यांच्या आदेशानंतर लष्कराने कारगिलमधील शहीद जवानाचे पार्थिव स्ट्रेचरद्वारे बेस कॅम्पवर आणले व त्यावर तिरंगा लपेटून लष्कराची विशेष वाहने आणि विमानांद्वारे त्यांच्या घरी पोचविण्यात आले. या आदेशांनंतर आजही शहीद जवानाचे किंवा अधिकाऱ्याचे पार्थिव त्यांच्या घरी पाठविण्यात येते.
– मानसी जोशी
=====
क फॅक्टस चे युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :